ऋता भिडे
उन्हाळ्याची सुट्टी लागली की मुलं २४ तास घरात असतात. बाहेर ऊन असल्याने त्यांना दिवसा बाहेर सोडता येत नाही. मग दिवसभर घरात टीव्ही पाहा, नाहीतर मोबाईल पाहा असे सुरू राहते. इतकेच नाही तर घरात असल्याने ते विनाकारण सतत खायला मागतात नाहीतर कंटाळा आलाचा धोशा लावतात. पण मुलांची उन्हाळ्याची सुट्टी छान आनंददायी जावी असे वाटत असेल तर मुलांना आवडतील, ते रमतील अशा अॅक्टीव्हीटीज त्यांना द्यायला हव्यात. खेळ हा लहान मुलांच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे. तसंच ते जितके खेळतील तसे ते शारीरिक आणि मानसिक, बौद्धिकदृष्ट्या जास्त अॅक्टीव्ह राहतात. आधीच मागचे २ वर्ष लॉकडाऊन असल्याने मुलांना फारसे बाहेर पडता आले नाही. मात्र यावर्षी तसे काही नसल्याने उन्हाळ्याची सुट्टी ते मनसोक्त एन्जॉय करु शकतात. उन्हाळ्यामध्ये पालकांना मुलांबरोबर काही वेगळे आणि नाविन्यपूर्ण खेळ खेळता येतील. या खेळामुळे मुलांची शारीरिक, पंचेंद्रियांची, सामाजिक आणि भावनिक प्रगती तर होतेच पण मुलांच्या मेंदूचा विकासही चांगल्या पद्धतीने आणि सकारात्मकरित्या होतो.
मुलांच्या बरोबर घरात आणि घराबाहेर काय खेळ खेळू शकता?
१. मुलांना पाण्यात खेळायला द्या - पाण्यामध्ये खेळणी टाकून ती एका मोठ्या चमच्याने दोन्ही हातानी काढणे, लहान गोष्टी चिमट्याने काढणे अशा गोष्टी मुलांना करायला द्या. बर्फामध्ये काही खेळणी ठेऊन ती खेळणी सोडवायला मुलांना खूप मज्जा येईल. एरवी थंडी असते किंवा पावसाळा असतो अशावेळी सर्दी होईल म्हणून आपण पाणी, बर्फ यांच्या संपर्कात मुलांना फरसे नेत नाही. पण उन्हाळ्यात हे आपण सहज करु शकतो.
२. मुलांमधल्या कुतुहलाला प्रेरणा द्या - मुलांना प्रश्न पडत असतील तर त्यांची उत्तरं खेळातून, व्यावहारिक अनुभवातून द्या. तुम्ही मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्या स्थळांची ओळख करून देऊ शकता तिथल्या गोष्टींचा अनुभव देऊ शकता. त्यात एखादा हटके पर्याय म्हणजे एखाद्या नर्सरीला भेट देऊन तिथल्या झाडांची ओळख, माहिती मुलांना करून द्या. एखादं रोपटं घेऊन त्याची काळजी घ्यायला सांगा. हॉस्पिटल, बस डेपो, रेल्वे स्टेशन, सरकारी कार्यालय अशाठिकाणी मुलांना नेल्यास त्यांनाही या गोष्टींची माहिती होईल.
३. मुलांमधल्या ताकदीचा योग्य वापर करा - लहान मुलांमध्ये खूप ऊर्जा असते. मुलांमधली ही ऊर्जा योग्य पद्धतींनी जर वापरली गेली नाही तर ती ऊर्जा खर्च करण्यासाठी मुलं चुकीच्या गोष्टी करत राहतात. त्यामुळे मुलांना वेगवेगळे शारीरिक खेळ मुलांना खेळूद्या. तुम्हीही त्यांच्यासोबत या खेळांमध्ये सहभागी व्हा. त्यामुळे तुमचाही व्यायाम होईल आणि मुलांनाही आई-वडील आपल्यासोबत खेळतात म्हणून छान वाटेल. खेळायला सोसायटीत मुले नसतील तर संध्याकाळी किमान दोन तास खेळाचे ग्राऊंड लावा. लपाछपी, पकडापकडी, विषामृत, लगोरी असे विस्मृतीत गेलेले खेळ मुलांना आवर्जून शिकवा.
४. नवीन गोष्टी निर्माण करा - मुलांना बाहेर उन्हात न पाठवता घरात बिझी ठेवायचे असेल तर मुलांना पाठवायचं नसेल आणि मुलांना बिझी ठेवायचं असेल तर घरातल्या गोष्टींमधून तुम्ही काय नवीन बनवू शकता याचा विचार करा. मुलं लहान असतील तर एकाद्या जुन्या कुंडीला रंग देणे, टाकाऊ मधून टिकाऊ गोष्ट कशी बनवायची याचे धडे मुलांना दिलेत तर मुलं त्यांची कल्पनाशक्ती वापरून काहीतरी नवीन गोष्ट बनवण्याचा विचार करू शकतील.
५. मुलांना नवीन कला शिकवा - उन्हाळ्यात मुलांना वेगवेगळ्या कलांची ओळख करून द्या. नाट्य, नृत्य, गायन, वादन ह्याच बरोबर वेगवेगळ्या कलाकृतीकच्या प्रदर्शनाला अथवा कार्यक्रमांना मुलांना घेऊन जा. मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारं एखादं नाटुकलं, संभाषण चातुर्य वाढवण्यासाठी एखादा प्रसंग सांगून त्यावर बोलणं अथवा चित्र काढणं, एखादी वेगळी पाककृती करून पाहणं अशा वेगवेगळ्या कला मुलांना आवर्जून शिकवा. यामुळे मुलांची कौशल्ये विकसित होतात.
(लेखिका पालक व मुलांच्या समुपदेशक आणि मेंदू व भाषाविकासतज्ज्ञ आहेत.)