लहान मुलं अनेकदा खूप खा-खा करतात, झोपेत आणि जागेपणीही दात खातात. इतकेच नाही तर काही मुलं सतत आजारी पडतात, अचानक त्यांचे वजन खूप कमी होते, पोटदुखी, थकवा अशी लक्षणे दिसायला लागतात. अशावेळी मुलांचा- झोप सगळं व्यवस्थित असून सारखं असं काही ना काही का होतंय असा प्रश्न आपल्याला पडतो. अशावेळी कृमी किंवा जंत हे यामागील मुख्य कारण असते हे लक्षात घ्यायला हवे. लहान मुलांना ठराविक अंतराने जंताचे औषध द्यायला हवे असे डॉक्टरही आवर्जून सांगतात. मात्र कधी कामाच्या व्यापात तर कधी इतर गोष्टींच्या नादात आपण ते विसरुन जातो आणि मग मुलांच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्यावर आपल्याला जंताचे औषध द्यायला हवे होते असे लक्षात येते. पण बाजारात मिळणारी जंताची औषधे देण्यापेक्षा घरच्या घरी पारंपरिक उपाय केले तर जंत निघून जाण्यास मदत होते. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार जंत जाण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी महत्त्वाची माहिती शेअर करतात (Home Remedies for D-worming in Ayurveda).
१. काळी मिरी
झोपताना चिमूटभर मिरपूड मधासोबत घेतल्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो.
२. हिंग
जेवणाच्या सगळ्या पदार्थांमध्ये हिंगाचा आवर्जून वापर करावा. त्यामुळे पोटातील कृमी नष्ट होण्यास चांगली मदत होते.
३. तुळस
तुळस आपल्या सगळ्यांच्याच घरात असते. ४ ते ५ पानांचा रस काढून त्यामध्ये मध आणि चिमूटभर सुंठ पावडर घालून मिश्रण तयार करावे. सकाळी उठल्या उठल्या हे मिश्रण घेतल्यास जंत कमी होण्यास फायदेशीर ठरतात.
४. आलं
आलं हा स्वयंपाकघरातील एक अतिशय उत्तम अशी औषधी गुणधर्म असलेली गोष्ट आहे. आल्याचा चहा, भाज्या यांमध्ये उपयोग केल्यास पोटातील जंत नाहीसे होण्यास त्याचा चांगला उपयोग होतो.
५. हळद
हळदीमध्ये अँटीसेप्टीक गुणधर्म असतात हे आपल्याला माहित आहे. चिमूटभर हळद, चिमूटभर मिरपूड आणि मध हे मिश्रण झोपताना कोमट पाण्यासोबत घ्यावे. त्याचा चांगला उपयोग होतो.
वरील पाचही गोष्टी एकत्रितपणे घेतल्यासही त्याचा लहान मुलांच्या पोटातील जंत कमी होण्यास चांगला उपयोग होतो. जंतांपासून दूर राहण्यासाठी आठवड्यातून एकदा हे सगळे आवर्जून घ्यायला हवे. तर जंत झाले असतील तर १५ दिवस सलग हे उपाय केल्यास जंत निघून जाण्यास फायदा होतो.