-डॉ. योगिता आपटे
फोन सारखा वापरू नये. तो वापरल्यामुळे काय दुष्परिणाम होतात असं मुलांना सांगितलं की ते म्हरतात पण अभ्यास करतांना माहिती शोधायला, प्रोजेक्ट बनवायलासुद्धा फोन वापरू द्या. ते सोपे होते. अभ्यास करण्यासाठी फोन का नाही वापरायचा?
अभ्यास करण्यासाठी तुम्ही मुलांनी मधली दोन वर्षं म्हणजेच कोरोना काळात खूप प्रमाणात फोन वापरला आहे. त्याचा तुम्हाला खूप उपयोगही झाला आहे. पण मधल्या दोन वर्षातली परिस्थिती वेगळी होती. तेव्हा आपल्याला गरज म्हणून फोन वापरावा लागत होता. पण आता तशी परिस्थिती नाही.
आता नेहेमीसारख्या शाळा आणि कॉलेजेस सुरु झाली आहेत. आपण पूर्वीसारखे मित्रमैत्रिणींना भेटू शकतो. शिक्षक समक्ष शाळेत शिकवतात. परीक्षासुद्धा ऑफलाईन होतात. आणि आपल्याला मात्र अभ्यास करतांना फोन वापरायची सवय सोडता येत नाही हा प्रॉब्लेम खूप मुलांचा झाला आहे.
त्याचं मुख्य कारण असं, की मोबाईल वापरून, प्रत्येक गोष्टीसाठी गूगल करून उत्तरं शोधणं सोपं असतं. नुसता प्रश्न सर्चला टाकला की झालं. उत्तर समोर हजर! इतकंच नाही, तर त्या उत्तराचं टेक्स्ट, इमेज, व्हिडीओ सगळं काही इंटरनेटवर मिळतं. त्यासाठी तुम्हाला काहीही कष्ट पडत नाहीत, विचार करावा लागत नाही, डोकं वापरावं लागत नाही. म्हणून ते वापरावंसं वाटतं. आणि नेमक्या याच कारणाने अभ्यास करतांना फोन वापरू नका असं सांगावं लागतं.
अभ्यासासाठी फोन का वापरु नये?
१. कारण फोन वापरून उत्तरं शोधतांना मुलं स्वतः विचार करत नाही. इतकंच नाही, तर तुम्हाला साधी साधी स्पेलिंग्जसुद्धा येत नाहीत. कारण फोन स्पेलिंग ऑटोकंप्लीट करून घेतो. शिवाय प्रश्नसुद्धा ऑटोकंप्लिट करतो. आणि मग हळूहळू साधीसुधी वाक्य आणि स्पेलिंगसुद्धा येईनाशी होतात. त्यामुळे आत्ता अभ्यास करताना जरी ते सोयीचं वाटलं, तरी परीक्षेच्या वेळी मुलांना ती उत्तरं येत नाहीत.
२. अभ्यास करतांना फोन वापरण्याचा अजून एक तोटा म्हणजे फोनमधली नोटिफिकेशन्स! पुस्तकात बघून अभ्यास करतांना आपण एकाग्रपणे लक्ष देऊ शकतो. पण गूगलवर एखादं उत्तर शोधताना व्हाट्सअँप / इन्स्टा असं काहीतरी नोटिफिकेशन येतं किंवा एखादं रील समोर दिसतं आणि मग आपलं सगळं लक्ष तिकडे जातं. आणि मग सलग अभ्यास काही होत नाही.
३. तिसरा मोठा तोटा म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीचं उत्तर फोनमध्ये शोधायला जातो. म्हणजे गूगल मॅप उत्तम वापरता येतो. पण फोनची बॅटरी संपली तर साधे सोपे पत्तेसुद्धा शोधता येत नाहीत. शिवाय आपल्या आयुष्यात असे अनेक प्रश्न येत असतात ज्यांची उत्तरं फोनवर नसतात. ते प्रश्न कसे सोडवायचे याचा विचार करायला आपण शिकत नाही.
४. आणि प्रत्येक उत्तरासाठी फोनवर अवलंबून राहण्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा, की गूगलवरची सगळी उत्तरं बरोबर नसतात. एकाच प्रश्नाची अनेक उत्तरं असतात. त्यातलं कुठलं चूक - बरोबर किंवा कुठली माहिती खरी - खोटी हे आपलं आपल्यालाच विचार करून ठरवावं लागतं. आणि तो विचार करण्यासाठी आधी हातातलं गूगल बंद करावं लागतं!
yogeeta.apte@gmail.com
(लेखिका मानसशास्त्रात डॉक्टरेट असून समुपदेशिका आहेत.)