Lokmat Sakhi >Parenting > मुलं नेमकी शिकतात कशी? काय केलं म्हणजे हुशार होतात? खरंच मुलं ढ असतात?

मुलं नेमकी शिकतात कशी? काय केलं म्हणजे हुशार होतात? खरंच मुलं ढ असतात?

How kids learn and become intelligent : प्रत्येक मूल स्वतंत्र असतं, त्याचं आकलन, शिकणं वेगळं असतं ते समजून घेतलं तर मुलांच्या शिकण्याची प्रक्रिया समजते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2022 04:38 PM2022-06-18T16:38:04+5:302022-06-18T16:40:07+5:30

How kids learn and become intelligent : प्रत्येक मूल स्वतंत्र असतं, त्याचं आकलन, शिकणं वेगळं असतं ते समजून घेतलं तर मुलांच्या शिकण्याची प्रक्रिया समजते.

How kids learn and become intelligent : What does it mean to be a smart kid? | मुलं नेमकी शिकतात कशी? काय केलं म्हणजे हुशार होतात? खरंच मुलं ढ असतात?

मुलं नेमकी शिकतात कशी? काय केलं म्हणजे हुशार होतात? खरंच मुलं ढ असतात?

डॉ. श्रुती पानसे

आपण कधी असा विचार केलाय का, की आपण न शिकवता मुलांना अनेक गोष्टी आपोआप कशा ‘समजायला’ लागतात? उदाहरणार्थ, आरशात आपण जिला बघत आहोत, तीच मी आहे. ‘आता तीन वाजले आहेत’ हे तीन -चार वर्षांच्या मुलांना समजणार नाही, पण नऊ वर्षांच्या मुलांना नक्की समजतं. उदा. ए बी सी डी किंवा अ आ इ ई हे मूल पाठ करतं, पण हे नक्की काय आहे हे कळलेलं मात्र नसतं. अगदी ए फॉर ॲपल , बी फॉर बॅट असं मुलांनी मोठ्या झोकात म्हणून दाखवलं तरी ते पाठांतराच्या जोरावर. त्याचं आकलन झालेलं नसतं. चित्र आणि अक्षर यांचं साधर्म्य त्यांनी लक्षात ठेवलेलं असतं. १ ते १० किंवा वन टू हन्ड्रेड पाठ केलं आणि म्हणून दाखवलं म्हणजे १ ते १० या संकल्पना समजल्या असं होत नाही. 

(Image : Google)

मग मुलं शिकतात कशी?
शारीरिक वाढ जसजशी होत जाईल तसा बुद्धीचा विकास होतो. या विधानातून अनेक गोष्टी आपोआप उलगडतात. या वयात मुलांच्या बुद्धीचा विकास वेगवेगळ्या क्षेत्रत होत असतो. जसं, भाषिक विकास अतिशय झपाट्यानं होत असतो. शब्दसंपत्तीत वाढ होते. कागद घेऊन रेघोट्या मारणं, हळूहळू त्या रेघोट्यांमधून सुंदर आकार काढणं, दाखवलेलं चित्र समजून घेणं, बघून नाच करायचा प्रयत्न करणं अशा अनेक अंगानं बुद्धीचा विकास होत असतो. ही भावी बौद्धिक आयुष्याची सुरु वात असते.
प्रत्येक मूल स्वतंत्रपणे वाढतं, त्यांना त्यांचं मन असतं, स्वतंत्र विचारक्षमता असते. एखाद्या घटनेकडे बघण्याची त्यांची स्वतंत्र दृष्टी हळूहळू विकसित होत असते. मुलांची स्वतंत्र विश्लेषणक्षमता ही त्यांच्या वयावर अवलंबून असते, असं पहिल्यांदा सांगणारा मानसशास्त्रज्ञ म्हणजे जीन पियाजे. छोट्या मुलांकडे त्यानं एका वेगळ्याच नजरेनं बघितलं. मुलं मोठी कशी होतात? ती बुद्धिमान कधी होतात? ती एकेक गोष्ट कशी ‘आत्मसात’ करतात? त्यांच्या समोर असलेले छोटे छोटे प्रश्न ते कसे सोडवतात? समजा, आज त्यांनी एखादा प्रश्न सोडवला. सहा महिन्यांनी तोच प्रश्न त्यांना विचारला तर त्यांचं उत्तर पूर्वीचंच असेल? की त्यात काही बदल झालेला असेल? मुलं तोच प्रश्न वेगवेगळ्या बाजूंनी विचार करून सोडवतात? असे असंख्य प्रश्न त्यांना पडले. त्यांनी घरातच या प्रश्नांची उत्तरं मिळवली.

(Image : Google)

जीन पियाजेचे तीन प्रयोग
पियाजे यांनी केलेले हे प्रयोग अतिशय रंजक आहेत. आपल्याला आपल्या घरातली मुलं समजून घेताना पियाजे यांनी केलेले गंमतीशीर प्रयोग आणि त्यातून काढलेले निष्कर्ष यांची निश्चितच मदत होते.
* पियाजे आपल्या घरातल्या तीन मुलांना काही प्रश्न विचारायचे. अगदी साधेसुधे वाटणारे प्रश्न. उदा, ढग कशापासून बनले आहेत असं तुला वाटतं?
- मुलं जे उत्तर देतील, ते लिहून ठेवायचे. कधी मुलं म्हणायची, कापसापासून. कधी म्हणायची, पांढऱ्या रंगापासून. त्यांचं जे उत्तर असेल ते स्वीकारून ते नोंदवायचे. त्यांनी मुलांना कधी उलटं शिकवलं नाही, किंवा उत्तर चूक आहे असंही कधी म्हटलं नाही.
* कधी ते मुलांसमोर दोन भांडी ठेवायचे. लहान भांड्यात जास्त पाणी आणि मोठ्या भांड्यात कमी पाणी भरलेलं असायचं. मग ते विचारायचे की यातल्या कोणत्या भांड्यात जास्त पाणी आहे, असं तुला वाटतं?
- लहान मुलं मोठ्या भांड्यात जास्त पाणी आहे असं सांगायची.
मुलांचं उत्तर चुकलं याचा अर्थ त्यांना बुद्धी नाही, असं नाही. कारण वय लहान असलं तरी मुलांनी काही ना काही तर्क केलेला आहे. विचार केलेला आहे. मात्र त्यांनी दिलेलं उत्तर हे त्यांचं वय आणि मन यावर अवलंबून आहे, असं त्यांनी मांडलं.
* अशाच प्रकारचे साधेसोपे प्रश्न त्यांनी मुलांना काही वर्षं सतत विचारले. सर्व उत्तरं नोंदवली. उत्तरांचा क्रम अभ्यासल्यावर त्यांच्या लक्षात आलं की प्रश्नाचं योग्य उत्तर कधी येतं? तर जसजसं वय वाढतं, तसतशी तार्किक क्षमता वाढते. त्यामुळे मुलं योग्य उत्तराकडे जातात.
अशाच प्रकारच्या प्रश्नांमधून आणि त्यांच्या उत्तरांमधून मुलांच्या मनाची जडणघडण लक्षात यायला लागली. यातूनच त्यांनी ‘बायोलॉजिकल थेअरी ऑफ नॉलेज’हा सिद्धांत मांडला. या विचारप्रवाहाला पियाजे यांनी जेनेटिक एपिस्टेमॉलॉजी असं म्हटलं आहे.
मुलांना आसपासच्या वातावरणातून जी काही माहिती मिळते, त्या माहितीचा मुलं मानसिक स्तरावर विचार करतात. पियाजे यांनी मुलांकडे बघण्याची दृष्टीच बदलवली. बालमानसशास्त्रत त्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं. त्यांनी अजून एक खूप महत्त्वाचं वाक्य सांगितलं आहे. ते म्हणजे लहान मूल म्हणजे मोठ्यांची लहान प्रतिकृती नसतं. त्याची वाढ आणि विकास हा स्वतंत्र विषय आहे. त्याला ‘कोणासारखं तरी घडवण्याची ’ गरज नसते म्हणूनच हे लक्षात घ्यायला हवं की मातीच्या गोळ्याचा आपला आवडता सिद्धांत बाजूलाच ठेवायला हवा.

( लेखिका मेंदू आणि शिक्षण यांच्या अभ्यासक आणि काऊन्सिलर आहेत.)

Web Title: How kids learn and become intelligent : What does it mean to be a smart kid?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.