मासिक पाळी सुरू होणे ही मुलींच्या आरोग्याच्या बाबतीतील एक अतिशय चांगली गोष्ट समजली जाते. किशोरवय संपून मुलगी तारुण्यात पदार्पण करण्याचा हा कालावधी सगळ्याच बाबतीत अगदी नाजूक असतो. मुलींच्या भावना, मानसिकता, लैंगिक गोष्टी यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने वयात येणाऱ्या मुलींची विशेष काळजी घ्यायला हवी. पाळी सुरु झाली की मुली काहीशा घाबरुन, बावचळून जातात. अनेकदा त्यांना आपल्या मनातील प्रश्न, भिती इतर कोणाशीही बोलून दाखवता येत नाही. अशावेळी आईने, मावशीने, आजीने मुलींशी योग्य पद्धतीने मोकळा संवाद साधणे आवश्यक असते.
मुलींना मासिक पाळीचा ताण न वाटता ही प्रक्रिया नैसर्गिक आहे आणि ती निसर्गाने स्त्रीला दिलेली एक देण आहे असे वाटायला हवे. अनेकदा मासिक पाळी आली की उंची वाढणार नाही किंवा यांसारख्या काही बाही गोष्टी बोलल्या जातात. उंची आणि मासिक पाळीचा शास्त्रीयदृष्टी काही संबंध आहे का, यामध्ये खरंच तथ्य असतं का याबाबत वेळीच समजून घेणे गरजेचे असते. याबाबत डॉ. रुमा घारोटे म्हणतात.
१. मुलींची उंची वाढण्यामागे त्यांची मासिक पाळी नाही तर त्यांची हाडं हे मुख्य कारण असतात. याचं कारण म्हणजे त्यांचे लाँग बोन्स म्हणजेच कोपर आणि पाय यांची हाडे तेव्हा जुळलेली नसतात, त्यामुळे उंची झपाट्याने वाढते.
२. म्हणजे मुलींचं वय १० वर्षे होईपर्यंत त्यांची उंची वेगाने वाढते. त्यानंतर ११ ते १३ वर्षे वयामध्ये या हाडांची वाढ व्हायला लागते त्यामुळे उंची वाढण्याचा वेग आपोआप कमी होतो. कारण या काळात हे लाँग बोन्स पूर्णपणे जुळलेली असतात. या संपूर्ण प्रक्रियेला एपिफिसिस असं म्हणतात.
३. मुलींची पाळी येण्याचं वयही साधारण ११ ते १३ वर्षे असतं. म्हणजेच मुलींचं पाळी येण्याचं आणि हाडं जुळण्याचं वय एकच असते. त्यामुळे पालकांचा गैरसमज होतो आणि पाळी सुरू झाली म्हणजे आता उंची वाढणार नाही असे त्यांना वाटते.
४. हा एकप्रकारचा योगायोग आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. याचाच अर्थ उंची ही मासिक पाळीवर नाही तर वय आणि लाँग बोन्सच्या जुळण्यावर अवलंबून असते.