मुलं हट्ट करणार आणि आई बाबा तो पुरवणार हा जणू निसर्ग नियमच आहे. मुलांनी वयाप्रमाणे हट्ट करणं यात अतिशयोक्ती काही नाही. पण मुलांनी टोकाचा हट्ट करणं, पालकांना तो पुरवता न येणं, त्यामुळे पालकांची आरडाओरड आणि मुलांची रडारड असं चित्रं हट्टी मुलं असलेल्या घरात हमखास दिसतं. नुसतं घरातच नाही तर अशी मुलं जेव्हा आई बाबांसोबत बाहेर असतात तेव्हाही नको त्या गोष्टीसाठी हटून् बसतात, आरडा ओरडा करतात. तेव्हा पालकांची स्थिती केविलवाणी होते.
हट्टी मुलांशी वागायचं कसं? हा मोठा प्रश्न आहे. पण त्यांचा हा हट्टी स्वभाव कमी करण्यासाठी पालकांनी लगेचच पाऊल उचलणंही गरजेचं आहे. पण नेमकं काय करायचं हे मात्र पालकांना सूचत नाही. पण बालमानसशास्त्रज्ञांनी मुलांच्या वयाच्या मानसिकतेचा विचार करुन पालकांना मुलांशी वागण्याच्या सोप्या सोप्या युक्त्या दिल्या आहेत. मुलं हट्टी, रागीट, एकलकोंडी कोणत्याही स्वभावाची असो त्यांना योग्य मार्गावर आणायचा मार्ग एकच पालकांनी आपल्या वागण्यात काही महत्त्वपूर्ण बदल ते कसे ?
Image: Google
हट्टी मुलांशी कसं वागायचं?
1. मुलं टोकाची हट्टी असतील तर त्यांचा हट्टपणा कमी करण्यासाठी आई बाबा त्यांच्यावर ओरडतात, त्यांना मोठ्या आवाजात रागवतात. पालकांना वाटतं आपण आवाज मोठा केला की मुलं दबतील. पण होतं उलटंच. हट्टी मुलं पेटून उठतात. त्यामुळे पालकांनी मुलांना जे समजून सांगायचं ते बाजूलाच राहातं आणि पालक-मुलांमधे नवीनच भांडण सुरु होतं. हे टाळण्यासाठी मुलं हट्ट करत असतील तेव्हा पालकांनी शांततेचं धोरण स्वीकारावं. त्यांच्याशी प्रेमाच्या सूरात बोलावं. त्यांना समजुतीनं घेऊन काय बरोबर काय चूक यातला फरक शांततेनं समजून सांगावा.
2. हट्टी मुलांचा वाद घालण्याचाही स्वभाव असतो. अशा वेळेस पालकांनीही या वादात उडी घेतली तर मुलांना नेहेमी वाद घालण्याची सवय लागते. यासाठी मुलं हट्ट जरी करत असली तरी आधी पालकांनी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यायला हवं. आपले आई वडील आपलं शांतपणे ऐकून घेत आहेत असं बघितल्यावर मुलांचा चढलेला आवाज खाली येतो. मुलंही आई बाबा जेव्हा बोलतात तेव्हा वाद न घालता ऐकून घेण्याचा प्रयत्न करता. हे वारंवार व्हायला लागलं की काही काळानं मुलांचा हट्ट कमी व्हायला लागतो.
Image: Google
3. मुलं हट्टी असा शिक्का त्यांच्यावर लावून दिला की मुलांनी काही बोललं तर ते ऐकूनच घ्यायचं नाही अशी पालकांची अवस्था होते. त्यामुळे मुलांच्या मनातलं पालकांना समजत नाही. कधी कधी हट्टीपणा हा पालकांचं लक्ष वेधून घेण्याचा मुलांचा मार्ग असतो. ते हट्ट करत असतात पण त्यांना सांगायचं वेगळंच असतं. आपल्या मनातलं नीट कसं व्यक्त करावं या गोंधळात ते असतात. त्यातून हट्टीपणा करत असतात. अशा वेळी मुलांना जवळ घेऊन त्यांचं शांतपणे ऐकून घेऊन त्यांना काय म्हणायचं आहे हे समजून घ्यावं. मुलांशी समजुतीच्या भूमिकेतून बोलल्यास त्यांना काही त्रास होतोय का? त्यांना नेमकं काय व्यक्त करायचंय हे शोधणं ,समजून घेणं पालकांना सोपं जाईल.
4. प्रत्येक गोष्टीत हट्ट करणार्या मुलांना काही नियम घालून देणं गरजेचं असतं. वस्तू, खेळण्या , खाणंपिणं याबाबतचे हट्ट असतील तर अमूक वेळीच अमूक एक मिळेल असा नियम घालावा. तो नियम तोडला तर शिक्षा होऊ शकते याची जाणीव त्यांना द्यावी. अर्थात मुलांसाठी ही शिक्षा कठोर नसावी. केवळ आपण जर नियम तोडला तर आपल्याला शिक्षा होते, आई बाबा ती करतात याची जाणीव मुलांना होते. त्यामुळेही हट्टीपणातलं सातत्य कमी होतं.
Image: Google
5. मुलं सारखी हट्ट करतात आणि आई बाबा त्यांचं काहीही ऐकून न घेता त्यांना सतत रागवत असतात. पण यामुळे मुलांचा हट्टपणा थोडीच कमी होणार आहे? मुलांना बोलण्याचा , पूर्णपणे व्यक्त होण्याचा अवकाश पालकांनी द्यायला हवा. आपल्याला जे सांगायचंय ते मुलांचं पूर्ण बोलून झाल्यावर सांगावं. यामुळे आपलं आई बाबा ऐकून घेतात तसं आपणही आई बाबांचं ऐकून घ्यायला हवं हे मुलांना समजू लागतं.
बालमानसशास्रज्ञ म्हणतात की मुलांच्या वाईट गोष्टी सोडवण्याचा मार्ग पालकांच्या वागण्यातूनच मिळू शकतो.