Join us  

आई, गोष्ट सांग असा मुलांनी हट्ट केल्यावर तुम्ही काय करता? गोष्ट सांगता की गप्प बस म्हणता..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2023 12:42 PM

How Songs and Stories are Important in Child Development Parenting Tips : मुलांना गोष्ट सांगण्याचे, गाणी म्हणून दाखवण्याचे ५ फायदे

ऋता भिडे 

शाळेमधून मुलं घरी आल्यावर मुलं अनेकदा गाणी म्हणत असतात. पालक म्हणून आपण ते ऐकत असतो. काही मुलं छान हावभाव करत गाणी म्हणतात. मुलांना गाण्यांबरोबरच गोष्टी ऐकायला, पाहायला आवडतात. याचं महत्त्वाचं कारण मुलं यातून खूप शिकत असतात आणि त्याचा आनंदही घेत असतात. (How Songs and Stories are Important in Child Development Parenting Tips). पालकांनीही मुलांना वेगवेगळ्या गोष्टी, किस्से सांगायला हवेत.  लहान मुलांना चांगल्या सवयी लागण्यासाठी सुद्धा आपल्याकडे गाणी आहेत. गाण्यांमधला ठेका किंवा ताल हा मुलांच्या मेंदूला सकारात्मक स्टिम्युलेशन देतो, त्यामुळे एखादं गाणं किंवा वेगवेगळ्या आवाजामध्ये, हावभाव करून सांगितलेली गोष्ट मुलांच्या पटकन लक्षात राहते. मुलांना एखादी गोष्ट शिकवण्यासाठी सुद्धा गाण्याचा वापर केला तर मुलं लवकर शिकतात.  कविता, पाढे, धडे, शब्द हे सुद्धा मुलांना गाणी- गोष्टींच्या माध्यमातून शिकवलंत तर ते मुलांच्या लवकर लक्षात राहते. त्याचे नेमके फायदे काय होतात पाहूया..

१. शब्दसंपदा - गाण्यामधले - गोष्टींमधले शब्द हे मुलांच्या वयानुसार असतात. अगदी लहान मुलं जेव्हा बडबडगीत ऐकतात, म्हणतात तेव्हा त्यांची शब्दसंपदा वाढायला मदत होते.  भाषेची ओळख व्हायला लागते. मुलं जशी मोठी होतात, वेगवेगळ्या भाषा शिकतात, त्या भाषेमधली गाणी - गोष्टी ऐकतात किंवा वाचतात त्यातून त्यांची शब्दसंपदा तर वाढतेच पण भाषेची गोडीही वाढते. त्यामुळे मोकळ्या वेळात आपण मुलांसोबत गाणी म्हणणे, त्यांना गोष्टी सांगणे असे अवश्य करायला हवे.

(Image : Google)

२. भावनिक समज निर्माण होणे - गाणी आणि गोष्टींमधून लहान मुलांमध्ये आपण सहानुभूती, सह-अनुभूती, मदत करणे अशा भावनांची जाणीव करून देऊ शकतो. लहान मुलं यातून खूप महत्वाच्या गोष्टी शिकतात. गाणी किंवा गोष्टीमधल्या एखाद्या व्यक्तीबद्दल, प्राण्याबद्दल मुलं विचार करतात आणि त्यातून त्यांची कल्पनाशक्ती, विचारशक्ती, भावना तयार व्हायला मदत होते. 

३. परिस्थीची जाणीव - एकादी गोष्ट ऐकताना लहान मुलांना त्या गोष्टींमधली घटना कुठे होत आहे, केव्हा होत आहे हे आपण जर सांगितलं तर त्यांना एकादी घटना कशी सांगायची हे समजत. काही वेळा मुलं शाळेतून घरी आल्यावर शाळेत काय झालं हे सांगू शकत नाही. घडलेल्या घटनेबद्दल कशी माहिती द्यायची हे त्यांना समजत नसल्यामुळे मुलांना गोष्टी ऐकवण्याचा नक्कीच फायदा होईल.

(Image : Google)

४. विचारांना चालना / प्रश्न विचारणे - गाणी आणि गोष्टींमध्ये घडणाऱ्या घटनांमधून मुलांच्या विचारांना चालना मिळते. मुलं प्रश्न विचारतात. तसंच एखाद्या प्रश्नाबद्दल सहानुभूती पूर्वक किंवा विचारपूर्वक उत्तर देऊ शकतात. विचार करणं , तो विचार मांडणं हा मेंदूच्या वाढीमधला एक महत्वाचा भाग असतो. एखादा विचार आला किंवा एखादा प्रश्न मनात आला तर तो कसा विचारायचा हे सुद्धा मुलांना समजतं. 

५. कल्पना शक्ती /क्रिएटिव्हिटी वाढते - गोष्टी आणि गाणी ह्या काल्पनिक असतात किंवा सत्य घटनेवरती आधारित असतात. अशा गाणी-गोष्टींमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. काही मुलं त्या गोष्टींप्रमाणे पेहेराव करून ती गोष्ट खेळतात किंवा त्या गोष्टीप्रमाणे एखादी प्रतिकृती करतात. उदाहरणार्थ, माकड आणि टोपीवाला खेळायला मुलांना आवडू शकत तर दिवाळी मध्ये शिवाजी महारांचा इतिहास किल्ल्यांच्या प्रतिकृतीमधून मुलं अनुभवतात. गाणी आणि गोष्टींमधून मुलांच्या विचारांना एक वळण मिळतं

(लेखिका समुपदेशक आणि मेंदू व भाषाविकासतज्ज्ञ आहे.)

rhutajbhide@gmail.com

टॅग्स :पालकत्वलहान मुलं