मुलांनी नेहमी शिस्तीत आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे वागावे अशी आपली अपेक्षा असते. पण कधी ना कधी मुलं दंगा करतात आणि आपल्या म्हणण्याच्या विरुद्ध वागतात. अशावेळी काही पालक मुलांना प्रेमाने समजावतात तर काही पालक मुलांशी अतिशय कडक वागतात. मुलांशी कडक वागणे योग्य असले तरी ते कधी, कसे आणि किती वागायचे याच्याही काही मर्यादा असतात. काही पालक मुलांशी जास्त मवाळ वागत असल्याने ही मुले हट्टी होतात किंवा पालकांच्या वागण्याचा गैरफायदा घेतात. तर काही पालक प्रमाणापेक्षा जास्त कडक वागत असल्याने मुलांच्या मनावर त्याचा वेगळा परीणाम होतो. पण पालक म्हणून मुलांशी डील करताना आपल्याला या दोन्हीचा मध्य जमायला हवा. इन्स्टाग्रामवर फातिमा याविषयीच काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात. मुलांशी खूप कडक वागण्याने मुलांकडून जास्त प्रमाणात चुका होतात असे फातिमा यांचे म्हणणे आहे, याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी त्या नोंदवतात (How Strict Parenting Affect Children)...
१. मुलांशी कडक वागणे काही वेळा निश्चितच फायद्याचे असते. त्यामुळे त्यांना चांगल्या सवयी लागण्यास मदत होते. पण सतत कडक वागल्याने मुले आणि पालक यांच्यात एकप्रकारचे अंतर निर्माण होते. कडक वागण्यामुळे मुले आपल्या मनातील भावना पालकांकडे योग्य पद्धतीने व्यक्त करु शकत नाहीत.
२. पालक खूप कडक असतील तर मुले एखाद्या गोष्टीविषयी त्यांना काही मदत किंवा मार्गदर्शन हवे असेल तर ते आपल्या पालकांची मदत न घेता मित्रमंडळी किंवा इतर लोकांची मदत घेतात. कारण ते पालकांशी संवाद करायला घाबरतात. अशावेळी मुलं आपल्या पालकांपासून गोष्टी लपवायला सुरुवात करतात.
३. घाबरलेल्या मुलांकडून जास्त प्रमाणात चुका होण्याची शक्यता असते. परीणामांची भिती वाटून आपल्याला शिक्षा होईल या गोष्टीची मनात भिती असल्याने अशा मुलांकडून जास्त चुका होतात. शिक्षा होण्यापासून वाचण्यासाठी ते खोटं बोलतात आणि हे चक्र वाढत जाते.
४. मुलांनी काहीवेळा वेडेपणा, खोडकरपणा करणे, मज्जा घेत खेळणे गरजेचे असते. त्यातून त्यांचा सर्वांगिण विकास होत असतो. पण अशावेळी पालक त्यांच्याशी कडक वागले आणि त्यांना सतत शिस्तीत वागायला लावले तर मुलांचे स्वत्व हरवण्याची शक्यता असते. अशावेळी मुलांच्या मनात राग, अस्वस्थता निर्माण होते.