बालपण हा मुलांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा. हा काळ जितका मौजमजेचा तितकाच त्यांच्यात चांगलं काही रुजण्यासाठीचा महत्वाचा टप्पा. मुलांच्या लहानपणातच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा पाया रचला जातो. या टप्प्यात मुलं कशी शिकतात, कशी शिकतात, वागतात, त्यांच्याशी घरातले मोठे, शाळेत शिक्षक कसे वागतात यावर त्यांचं मोठेपणीचं घडणं बिघडणं अवलंबून असतं. मुलांच्या मनात जर लहानपणीच कसला संकोच राहिला, ती कशाला घाबरत वागली तर त्याचा परिणाम त्यांच्या मोठेपणीच्या व्यक्तिमत्वावर होतो. मुलांमध्ये आत्मविश्वास ( self confidance) असला की त्यांच्यात शिकण्याची, नवीन करण्याची ऊर्मी निर्माण होवून मुलं पुढे जातात. पण मुलं आत्मविश्वासाच्या बाबतीत कच्ची राहिली तर मात्र चार चौघात संकोचणे, मागे राहाणे, घाबरुन वागणे, आपली मतं/ विचार स्पष्ट सांगता न येणं, घुसमट होणं या नकारात्मक बाबी मुलांच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनतात. हे होवू नये म्हणून मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न ( how to increase child self confidence) मुलांच्या लहानपणापासूनच व्हायला हवा. आई बाबांनी काही गोष्टी जाणीवपूर्वक केल्यास मुलं लहानपणापासूनच आत्मविश्वासानं वागू लागतात.
Image: Google
मुलांमधे आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी
1. मुलं आई बाबांच्या सहवासात जास्त मोकळेपणानं वागतात. त्यासाठी आई बाबांनी मुलांना पुरेसा वेळ देणं आवश्यक आहे. मुलांना पुरेसा वेळ दिला तर मुलांच्या आवडी निवडी समजतात. आई बाबा पुरेसा वेळ देऊ शकले तरच मुलांच्या आवडी निवडीला खतपाणी भेटतं. आपल्या आवडीच्या गोष्टी मुलांना करायला मिळाल्या तर मुलं मुलं आनंदानं, मोकळेपणानं कामं करतात. आई वडिलांचा गुणात्मक वेळ मुलांना मिळाला तरच मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.
2. मुलांना वेळ देण्यासोबतच मुलांना आई बाबांचा विश्वासही हवा असतो. आम्ही तुझ्यासोबत आहोत या विश्वासनं मुलांना मानसिक बळ मिळतं. आपल्याला एखादी गोष्ट जमो अथवा न जमो आपले आई बाबा सोबत असणारच आहेत या विश्वासानं मुलांमध्ये कृती करण्याचं धैर्य निर्माण होतं. आई बाबांसोबतचं भक्कम नातं मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतं.
3. मुलं जे करत आहेत त्यात त्यांना आई बाबांकडून प्रोत्साहन मिळालं तर मुलं आवडीनं ती गोष्ट करतात. पण मुलांनी केलेल्या गोष्टींना नावं ठेवणं, त्यांची तुलना त्यांच्याच वयातल्या इतर मुलांशी करणं यामुळे मुलं संकोचतात. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो. या गोष्टीचा परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्वावर होतो. त्यांच्यातला आत्मविश्वास कमी होतो.
Image: Google
4. मुलांनी केलेल्या कामाचं मोठ्यांनी कौतुम केलं तर मुलांच्या आत्मविश्वास दुणावतो. सोप्या कामाकडून अवघड कामाकडे वळण्याची प्रेरणा मुलांमध्ये निर्माण होते. शालेय जीवनातील स्पर्धात्मक प्रक्रियेला सामोरं जाण्याची हिंमत त्यांच्यात निर्माण होते. पण मुलांना मोठ्यांकडून कौतुकाचे दोन शब्दही मिळाले नाही तर जे जमतंय ते करण्यातली रुची, आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे मुलांचं छोट्या छोट्या कामासाठी कौतुक करणं हा त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा मार्ग आहे.
5. मुलांना मधून मधून बाहेर घेऊन जाण्यामुळे त्यांना नवीन जागेची, नवीन गोष्टींची माहिती मिळते. त्यातून त्यांचं ज्ञान वाढतं. माहिती आणि ज्ञान वाढल्याने मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. फिरल्यामुळे त्यांचा बौध्दिक विकासासोबतच शारीरिक विकासही होतो.