डॉ. लीना मोहाडीकर
किशोरवय संपून पौंगडावस्था सुरू होताना मुलामुलींच्या मनाला पहिली अस्फुट जाण स्पर्श करू लागते, ती लैंगिक अवयवांबद्दलची. कारण तोपर्यंत जरी मोठ्यांचं निरीक्षण झालेलं असलं तरी मोठं होणं म्हणजे नुसती शरीराची उंची-जाडी वाढणं एवढाच अर्थ त्या आधीच्या वयात डोक्यात असतो. पण स्वतःच्या लैंगिक अवयव वृद्धीची जाण आणि भिन्नलिंगी आकर्षण लहरींची अनुभूती पौगंडावस्थेत येऊ लागल्यावर मुलं मुली भांबावतात, संभ्रमात पडतात. जर या बदलांची मानसिक तयारी पालक-बालक संवादातून किशोरावस्थेत झाली असेल तर ती मुलं मुली फार मानसिक चलबिचल न होता झालेल्या बदलांना सामोरी जातात. ही तयारी नसेल तर अभ्यास खेळ यावरील लक्ष उडू शकतं. पालकांना सुद्धा लक्षात येत नाही की आधी अभ्यासात हुशारी दाखवणारा आपला मुलगा / आपली मुलगी, मागे का पडायला लागलं (How To Communicate With Adults In Specific Age Parenting Tips).
इथे सुरू होतं खरं लैंगिक शिक्षण. त्याचा अभ्यासक्रम ठरवून इतर शालेय विषयांप्रमाणे आकृत्या, चित्र, स्लाईड्स दाखवून व्याख्यानांद्वारे मुलामुलींना लैंगिक शास्त्र हा विषय शिकवता येतो. काही प्रमाणात हे शिक्षण शाळेत दिलंही जातं, पण ती १ / २ व्याख्यानंच असतात. ही व्याख्यानं खरंतर मुलांच्या मनात असंख्य प्रश्नच निर्माण करतात. पण त्यांच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची योग्य सुविधा नसल्याने हे प्रश्न मनात तसेच राहतात. अशावेळी विचारायचे कोणाला हे मुलांनाही समजत नाही. वयात येताना होणार्या शाररिक - भावनिक - मानसिक बदलांबाबत योग्य शब्दात मुलामुलींना समजावून दिलेलं असेल तर ह्या संक्रमणावस्थेत ती चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतात.
आकर्षण, प्रेम इत्यादी विचार तर डोक्यात येतंच असतात. त्यावर मात करून अभ्यास, खेळ यावर कसं लक्ष केंद्रित करायचं, हे आधीच लैंगिक अवयव, त्यांचं कार्य यांची माहिती असलेल्या मुलामुलींना सहज साध्य होतं. इथेच कुटुंबातील मोकळ्या संवादाचं महत्व लक्षात येतं. आई वडिलांशी आणि शिक्षकांशी मनमोकळ बोलण्याचं स्वातंत्र्य ज्या मुलामुलींना मिळतं, त्यांना बरोबरच्या भिन्न लिंगी व्यक्तींशीही चांगली मैत्री ठेवता येते. पण तसा मोकळेपणा मुलांना मिळाला नसेल तर बरोबरच्या मित्रांकडून / मैत्रिणींकडून चुकीची माहिती मिळण्याची शक्यता असते ज्यामुळे आयुष्यात भावनिक आंदोलनं निर्माण होऊ शकतात.
तारुण्यात प्रवेश करताना शरीरात नेमक्या कोणत्या घडामोडी होतात?
जन्माला आल्यापासून जे शारीरिक अवयव असतात, तेच तारुण्यात पदार्पण करतानाही असतात. लैंगिकता प्रजोत्पादक अवयवही जन्मल्यापासून शरीरात असतातच, पण मुलगा किंवा मुलगी वयात येताना या अवयवांची वाढ पूर्ण झालेली असते, ते आता प्रजोत्पादनक्षम झालेले असतात. मुलगा - मुलगी यांच्यातील बदल, त्यामुळे निर्माण होणार्या समस्या याबद्दल पुढील भागात क्रमश: माहिती घेऊ.
(क्रमश:)
(लेखिका लैंगिकतातज्ज्ञ आहेत.)