कोणत्याही नात्यामध्ये आपण कनेक्टेड आहोत की नाही हे आपल्याला समजत असतं. नाही समजलं तरी आपण वेगवेगळ्या पद्धतीने ते ताडून पाहण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र आपल्या मुलांसोबत आपले नाते कसे आहे याबाबत मात्र आपण म्हणावे तितके गंभीर असतोच असं नाही. या नात्याला बरेचदा आपण गृहीत धरतो. पण आपल्या मुलासोबतचं आपलं नातं चांगलं आहे की नाही याकडे आपण वेळीच लक्ष द्यायला हवं. मुलांसोबत आपलं नातं घट्ट आहे की त्यात अंतर आहे हे वेळोवेळी तपासून पाहायला हवं. आता हे तपासायचं म्हणजे नेमकं काय करायचं असा प्रश्न आपल्याला पालक म्हणून पडू शकतो. तर प्रसिद्ध समुपदेशक प्रिती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती देतात (How To Connect With Your Child).
कसं ओळखाल तुम्ही मुलांशी कनेक्ट नाही...
१. मुलं खोटं बोलत असतील तर
मुलं काही कारणांनी तुमच्याशी खोटं बोलत असतील तर तुमचं मुलांसोबतचे कनेक्शन कमकुवत होत आहे हे लक्षात घ्यायला हवं. अशावेळी मुलांशी योग्य पद्धतीने संवाद साधला आणि त्यांना कम्फर्ट वाटेल असं वातावरण निर्माण केलं तर मुलं असं वागणार नाहीत.
२. हट्टीपणा आणि नखरे करत असतील तर
लहान वयातील मुलं अनेकदा खूप हट्टीपणा करतात. किंवा काहीवेळा खूप नखरे करतात. अशावेळी मुलांना आपल्याला काहीतरी सांगायचे असते हे लक्षात घ्या. त्यांच्या भावना त्यांना व्यक्त करता येत नसल्याने ते असे वागत आहेत हे वेळीच आपण लक्षात घ्यायला हवे. मुलं शब्दांच्या मार्फत किंवा काही अॅक्शन करुन आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतात. पण आपल्यापर्यंत ते योग्य पद्धतीने पोहोचत नाही.
३. सतत मागे मागे करत असतील
अनेकदा मुलांना अनेक गोष्टी आपल्या आपण करता येत असतात. तरीही ते स्वत: ते न करता आपल्याला करायला लावतात. उदाहरण म्हणजे त्यांना खायला घालणे, कपडे घालून देणे. इतकेच नाही तर आपण काही काम करत असलो की मुलं विनाकारण आपल्याला त्यात डिस्टर्ब करत राहतात. मूल अचानक असं करत असेल तर त्याला आपल्याला काहीतरी सांगायचे आहे हे लक्षात घ्यायला हवे.
अशावेळी नेमकं काय करायचं?
मुलांशी संवाद साधणे हा सर्वात सोपा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. तुमचा मुलांशी नियमितपणे मोकळा संवाद असेल तर तुमचे मूल तुमच्याशी चांगल्या पद्धतीने कनेक्ट राहू शकते. पण हा संवाद नसेल किंवा मुलांना काय वाटते, त्यांच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल काय विचार आहे हे आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मूल तुमच्याशी मोकळेपणाने बोलू शकत नसेस तर या संवादात गॅप आहे हे लक्षात घ्या आणि हा संवाद जास्तीत जास्त चांगला कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत. अशावेळी आपण मुलांशी रीकनेक्ट होणं गरजेचं असतं. मूल मोठं होत गेलं की त्याच्याशी रीकनेक्ट होणं काहीसं अवघड जातं. म्हणूनच वेळच्या वेळी मुलांशी कनेक्ट करायचा प्रयत्न केला तर तुमचं नातं फुलण्यास त्याची मदत होईल