Join us  

मुलं खूप आदळआपट करतात, ओरडतात मोठ्यानं, आक्रमक होतात? तज्ज्ञ सांगतात ५ कारणं आणि उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2023 12:56 PM

How To Control Aggressiveness in kids Parenting Tips : मुलांना कोणत्या गोष्टीमुळे राग येतो हे समजून घ्या आणि त्यावर लवकरात लवकर काम करा.

ऋता भिडे

आरडाओरड, आदळआपट करू नकोस, शांत बस. अशा प्रकारच्या सूचना तुम्ही पण मुलांना देता का? पालकांनी काहीही सांगितलं तर तुमच्या मुलाची अग्रसेसिव्ह प्रतिक्रिया येते, मग त्यावर आपला पारा चढतो. हे असं चित्र लहान मुलं असलेल्या अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. यावर वेळीच योग्य तो मार्ग न काढल्यास ही समस्या काही प्रमाणात आटोक्यात येते. नाहीतर मुलं दिवसेंदिवस जास्त चिडचिड आणि त्रागा करत राहतात आणि त्यामुळे त्यांचा स्वभावच तसा बनत जातो. मुलं अग्रेसिव्ह झाल्यावर त्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद दिलात तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. मुलांना कोणत्या गोष्टीमुळे राग येतो हे समजून घ्या आणि त्यावर लवकरात लवकर काम करा (How To Control Aggressiveness in kids Parenting Tips) . 

१. कृतीचे अनुकरण - मुलांना मोठ्या माणसांसारखं वागायचं असत, बोलायचं असतं. त्यामुळे आपण जे बोलत आहोत ते प्रत्येक वेळेस बरोबरच असेल असं  नाही ही गोष्ट मुलांना समजत नाही. मग मोठी माणसं त्याला तू आगाऊपणे बोलू नकोस असं म्हणतात. पण हे सगळं मुलं मोठ्यामाणसांकडूनच तर शिकत असतात. 

(Image : Google)

२. खूप व्यस्त दिनचर्या - सध्या पालक आणि मुलं ह्यांना एकमेकांसाठी खूप कमी वेळ आहे. सकाळपासून रात्री पर्यंत पालक आणि मुलं कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असतात. मग, ह्यामध्ये एकमेकांसाठी वेळ काढावा म्हटला तरी अवघड होत. त्यात पालकांपासून मुलांपर्यंत सगळ्यांनाच विविध प्रकारचे ताण तणाव असतात. मग गडबडीत पालकांकडून एखादा शब्द वाकडा बोलला गेला की मुलांना त्याचा राग येतो आणि मग ती अग्रेसिव्ह होतात. ह्यामध्ये एकमेकांचं ऐकून घेणं खूप कमी होत आणि गैरसमज वाढतात. त्यामुळे तुमचं म्हणणं मुलांना त्याच्या वयानुसार सांगा आणि मुलांचं सुद्धा ऐकून घ्या. 

३. पालकांच्या अपेक्षा आणि मुलांच्या इच्छा - मुलं  आणि पालकांमध्ये जेव्हा हवा तेवढा संवाद होत नसेल तर विसंवाद वाढेल. पालकांच्या अपेक्षेप्रमाणे मुलं वागत नाहीत त्यावेळेस त्यांना सूचना, सल्ले मिळतात आणि मग ह्या सूचना, सल्ले जेव्हा मुलांना त्रासदायक वाटत असतात त्यावेळेस मुलं अग्रेसिव्ह होऊ शकतात. म्हणूनच मुलांना सूचना द्या पण सारख्या नको. मुलांना तुम्ही दिलेल्या सूचनांवरती कृती करायला वेळ द्या. मुलांची कृती होईपर्यंत त्यांना तुम्ही सांगितलेल्या कामाची आणि ते काम कधी पूर्ण करायचं आहे ह्याबाबदल आधीच सांगा. म्हणजे तुमच्यामध्ये विसंवाद होण्याची शक्यता कमी होईल.  

४. सतत भीती, धमकी दाखवली जात असेल तर - मुलांना जर कोणत्या गोष्टीची, व्यक्तीची भीती वाटत असेल आणि अमुक करत नसशील तर हे करेन किंवा यांना सांगेन असे केले तर मुलं असुरक्षित होतात. अशावेळी साधारणपणे मुलं अग्रेसिव्ह व्हायची शक्यता असते. स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी मुलांकडून अशाप्रकारची रिअॅक्शन येणं सामान्य असतं.

५. न जमणाऱ्या गोष्टीसाठी प्रोत्साहन मिळत नसेल तर- तुला काहीच जमत नाही, लिहिता येत नाही, वाचताना लक्ष नाही अशा गोष्टी जर पालक सारखं बोलत असतील तर मुलांना नवीन गोष्ट करायला प्रेरणा मिळणार नाही. त्यातून पुन्हा निराशा येऊन त्याचा राग मुलं दुसऱ्यांवर काढू शकतात. 

(लेखिका समुपदेशक आणि मेंदू व भाषाविकासतज्ज्ञ आहे.)

rhutajbhide@gmail.com

संपर्क - +39 389 573 5213 (व्हॉटसअॅप )

टॅग्स :पालकत्वलहान मुलं