लहान मुलं कधीकधी अगदी चांगली वागत असतात आणि कधीतरी अचानक खूप त्रागा करतात, रडारड करतात. अशावेळी त्यांना राग इतका अनावर होतो की ते हातपाय आपटतात, वस्तू फेकतात. आता असे का होते, तर त्यांना आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवता येत नसल्याने ते अशाप्रकारे वागतात. भावनांना हाताळणे हे मोठ्यांसाठीही अनेकदा जिकरीचे काम असते तर लहान मुलांसाठी ते अवघड असणारच. या भावना जेव्हा मुलांना अनावर होतात तेव्हा मुलं जास्त नखरे करतात. अशावेळी मुलांना समजून घेणे आणि त्यांना या भावनांशी डील करण्यासाठी मदत करणे गरजेचे असते. पण आपणही ऑफीस, घरातली कामं यांमुळे वैतागलेले असलो तर आपण मुलांवर ओरडतो, प्रसंगी त्यांना मारतो. यामुळे परिस्थिती सुधारत नाही तर ती आणखी हाताबाहेर जाते. अशावेळी मुलांशी डील करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याविषयी (How to control your child’s tantrums)...
१. मुलांशी कनेक्ट व्हा आणि त्यांना सुरक्षित वाटेल असे बघा
मुलं अशाप्रकारे खूप आक्रस्ताळेपणा करत असतील तर मुलांशी कनेक्ट होणं जास्त गरजेचं असतं हे लक्षात ठेवा. मुलांच्या वयाचे होऊन अतिशय हळी आवाजात मुलांशी बोला. त्यांना सुरक्षित वाटावे यासाठी त्यांना जवळ घ्या. आपल्या स्पर्शात खूप ताकद असते, कदाचित असे केल्याने मुलांच्या मनावरचा ताण निघून जाण्यास मदत होईल आणि मूल आपोआप शांत होईल.
२. भावना समजून घ्या
मुलांना त्या स्पेसिफीक वेळेला राग आला आहे की इरीटेशन होत आहे, एकटेपणा वाटत आहे हे समजून घ्यायला हवे. त्यांची भावना समजून घेतली तर आपल्याला समजून घेणारं कोणीतरी आहे असं त्यांना वाटेल आणि त्यांच्या मनावरचा ताण नकळत कमी होऊन ते शांत होण्यास मदत होईल.
३. नेमकी अडचण काय ते समजून घ्या
मुलं हट्टीपणा किंवा आक्रस्ताळेपणा का करत आहेत यामागचे नेमके कारण लक्षात घ्या. हे कारण लक्षात आले तर तुम्हाला त्यांचा प्रश्न सोडवणे सोपे जाईल. नाहीतर तुम्ही मुलांना नुसते समजावून त्याचा म्हणावा तसा उपयोग होणार नाही. मुलांना त्या अडचणीवर मात करण्यासाठी तुमचे अनुभव, उपाय सांगा.
४. अडचण सोडवण्याचा प्रयत्न करा
मूल एखाद्या गोष्टीसाठी सतत मागे लागत असेल आणि आपण त्याला विरोध करत असू तर मूल असे का करते यामागचे नेमके कारण समजून घ्यायला हवे. आपण मुलांना एखाद्या गोष्टीसाठी नाही का म्हणतो यामागचे कारण समजले तर मूल कदाचित शांत होईल. एखादी अडचण असेल तर ती मुलांसोबत सोडवण्याचा प्रयत्न करा.