Join us  

परीक्षा नक्की कुणाची, मुलांची की पालकांची? परीक्षेच्या काळात तुमच्या घराचा तुरुंग होतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2024 6:12 PM

पहिली- दुसरीच्या मुलांच्या परीक्षेचंही पालक स्वत: इतकं टेन्शन का घेतात? मुलांनाही का देतात?

ठळक मुद्देपरीक्षेपेक्षाही मुलांचं शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य जास्त महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवू. परीक्षा सोपी करू, त्यासाठी भरपूर सदिच्छा!

स्मिता पाटीलबरेच दिवस एका मैत्रिणीच्या घरी गेले नव्हते म्हणून तिला फोन केला. या दोन दिवसांत येऊन जाते गं असं म्हणाले, तर ती पटकन गडबडीने म्हणाली की, अगं सॉरी, पण सध्या नको गं येऊस. माझ्या मुलीची परीक्षा आहे. त्यामुळे मी सध्या कुठेच बाहेर जात नाहीये आणि घरी कुणी आलं की मग सगळं डिस्टर्ब होतं. ती अभ्यास करत नाही. मोठ्यांच्या गप्पांमध्येच रमते. मी बरं म्हटलं आणि फोन ठेवून दिला. आता तुम्ही म्हणाल की बरोबरच आहे. दहावीचं वर्ष असेल त्या मुलीचं. नाही नाही. मुलगी आहे इयत्ता दुसरीत. हे उदाहरण अतिशयोक्तीचं वाटेल कदाचित तुम्हाला; पण खरंच अनेक घरांमध्ये अगदी छोट्या-छोट्या मुलांच्या परीक्षासुद्धा खूप गांभीर्याने घेतल्या जातात. परीक्षा म्हणजे जणू काही जीवन-मरणाचा प्रश्न आहे, इतकं तणावाचं वातावरण घरामध्ये असतं. घरातला टीव्ही, वायफाय बंद होतं. एकमेकांशी संवादसुद्धा बंद होतो. संवाद झालाच तर तो फक्त अभ्यासाच्या बाबतीत होतो आणि त्यानं ताणच निर्माण होतो. परीक्षेत मिळणाऱ्या मार्कांवर जणू काही त्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचं आणि समाजातल्या पालकांच्या स्थानाचंही मूल्यमापन होत असतं. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये परीक्षा म्हणजे धसका घेण्याचा विषय ठरतो. आपल्याला आलेला परीक्षेचा ताण पालक आपल्या बोलण्यातून, वागण्यातून, देहबोलीतून मुलांपर्यंत पास ऑन करत असतात.

(Image : google)

घरात ताण निर्माण झाल्यामुळे काय काय होतं?

१. मुलांना प्रचंड काळजी वाटायला लागते. मग कुणाचं डोकं दुखतं, कुणाचं पोट दुखतं. कोणाला सारखं टॉयलेटला जावंसं वाटतं. नीट झोप लागत नाही. चिडचिड वाढते.२. कुणाला खावंसं वाटत नाही, तर कुणाला नेहमीपेक्षा जास्त खावं वाटतं. एकदम हताश वाटायला लागतं, उदास वाटायला लागतं. हात-पाय गळून गेल्यासारखं वाटतं. धडधडायला होतं किंवा अंग गरम होतं. ताप आलाय की काय असं वाटतं.

३. परीक्षेच्या तणावाच्या काळात पालक असं काही वागतात की मुलांची काळजी कमी होण्याऐवजी अजूनच वाढते. आपल्या मुलांची क्षमता लक्षात न घेता पालक त्यांच्यावर चांगले मार्क्स पडले पाहिजेत, यासाठी दबाव टाकतात.४. अन्य मित्र-मैत्रिणींच्या किंवा भावंडांच्या मार्कांशी तुलना करतात. अभ्यासाबद्दल सतत बोलत राहतात आणि सूचना देत राहतात. परीक्षेत कमी मार्क पडले तर काय काय होईल याची अतिरंजित उदाहरणं मुलांना सांगतात आणि मग मुलांची काळजी आणखीनच वाढते. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यांना अजूनच भीती वाटायला लागते.

५. बरं हे सगळं कमी की काय म्हणून मुलांच्या भावनिक गरजांकडे पालक सपशेल दुर्लक्ष करतात. इतके मार्क मिळाले तर हे देईन नाही तर असं होईल, अशी काहीतरी प्रलोभने किंवा धमक्या दिल्या जातात. सगळा फोकस केवळ आणि केवळ त्या परीक्षेच्या मार्कांवर असतो.

(Image :google) 

हे गरजेचं आहे का?१. काही घरांमध्ये हे सगळं होतही नसेल, पालक इतका ताण स्वत:ही घेत नसतील. त्या घरांमधली मुलं खरोखरच अभ्यासाचा आनंद घेत असतील.२. कारण कोणत्याही विषयाचा अभ्यास ही खरं तर आनंदाची प्रक्रिया असते. एखाद्या विषयाचा अभ्यास करत त्यात खोलखोल जाणं, तासन्तास गुंतून राहणं हे किती मजेचं असतं; पण आपण त्याची सांगड परीक्षेशी घातल्यामुळे अभ्यासाबद्दलच अनेक मुलांना तिटकारा निर्माण होतो, अभ्यास आवडेनासा होतो.

३. अभ्यासात मागे असलेली, परीक्षेत कमी मार्क्स मिळवलेली मुलंसुद्धा पुढच्या आयुष्यात खूप यशस्वी होऊ शकतात, करिअरच्या नवनवीन वाटा धुंडाळू शकतात. अनेक मोठ्या आणि यशस्वी माणसांचं शिक्षण किती झालेलं आहे हे आपल्याला माहितीसुद्धा नसतं.४. आपण शांतपणे बसून स्वतःशी कधी विचार केलाय का, की परीक्षा खरोखरच इतकी महत्त्वाची असते की ज्यामुळे आपलं आणि आपल्या मुलांचं नातंच पणाला लागेल?

परीक्षा काळात करायचं काय?

ज्या पालकांनी आपल्या मुलांसाठी शिक्षणाची वेगळी वाट न निवडता पारंपरिक शिक्षण पद्धती स्वीकारली आहे, त्यांच्यासाठी परीक्षा आवश्यक आहे हे समजतं. मग काय करता येईल की ज्यामुळे परीक्षेच्या काळातला ताण आपण कमी करू शकतो?

१. परीक्षेचा बाऊ नको करूया आणि तशी भीती मुलांना नको देऊया. मुलांचं सगळं बंद नको करूया. थोडा वेळ स्क्रीन टाइम देऊया. गाणी ऐकूया. काही छंद असतील तर त्यात मन रमवू देऊया.२. मुख्य म्हणजे खेळू देऊया. हे सगळं करण्यानं उलट अभ्यासावर त्यांचं लक्ष केंद्रित होईल.

३. त्यांना काही ताण आला असेल तर मोकळेपणाने त्यांच्याशी बोलूया. यासाठी अन्य पालक, शिक्षक, मित्र-मैत्रीण यांचीसुद्धा मदत घेता येईल. मुलांशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारूया.४. आपलं मूल पौष्टिक आणि पुरेसा आहार, पुरेशी झोप घेतंय ना याकडे लक्ष देऊया आणि त्याबाबतीत आग्रही राहूया.

५. मुलांना दैनंदिन कामं आणि अभ्यास याचं वेळापत्रक तयार करण्यासाठी सांगूया आणि यासाठी लागली तर मदतही करूया .६. ताण कमी करण्यासाठी दीर्घ श्वसन करायला सांगूया. व्यायाम करायला सांगूया. याने शांत व्हायला मदत होते. परीक्षेतल्या मार्कांवर त्यांचं संपूर्ण आयुष्य अवलंबून नाही हा विश्वास आधी स्वतःला देऊया आणि मग मुलांनाही देऊया.

७. वर्षभरात जे झालं त्याची उजळणी करून आणि मुलांना दोष देऊन काही उपयोग होणार नाही हे लक्षात घेऊन हातात आता आलेल्या वेळात काय करता येईल याचा शांतपणे विचार करूया.

८. मुलांवर दबाव न टाकता सकारात्मक राहू. भरपूर प्रेम आणि आत्मविश्वास मुलांना देऊ.परीक्षेपेक्षाही मुलांचं शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य जास्त महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवू. परीक्षा सोपी करू, त्यासाठी भरपूर सदिच्छा!(लेखिका मुक्त पत्रकार आणि मुलांसोबत वाढताना पालक मंडळाच्या संचालक आहेत.)smita.patilv@gmail.com

टॅग्स :परीक्षाशिक्षणलहान मुलं