Join us  

घरात टीनएजर नावाचं वादळ आहे? काय केलं तर वयात येणाऱ्या मुलांशी संवाद वाढेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2022 6:03 PM

How to Deal With Teenagers : १० ते १६ या वयात मुलांमध्ये अनेक मानसिक शारीरिक बदल होतात, त्याकाळात पालकांनी कसं वागावं?

ठळक मुद्देया वयात संवाद साधला गेला तर मुलांना पौगंडावस्थेत बदलांना सामोरे जाणे सोपे होते.आई वडिलांशी मोकळा संवाद हा किशोरावस्थेतील लैंगिकता शिक्षणाचा पाया आहे.

डॉ. लीना मोहाडीकर

किशोरावस्था अर्थात टीनएज हा मोठं होण्याचा टप्पा , मुलांसाठी फार मानसिक वादळं उठण्याचा असू शकतो. या वयात मुलामुलींना ‘बॉयफ्रेंड’आणि ‘गर्लफ्रेंड’या संकल्पना समजू लागलेल्या असतात. पती-पत्नी या नात्याबद्दलही कुतूहल उत्पन्न झालेलं असतं.  आईवडील परस्परांशी कसे वागतात, प्रेम आहे ना की भांडणं होतात हे या कोवळ्या वयात मुलांना खूप महत्वाचं वाटतं. आईवडिलांनी एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त केलेलं मुलांना खूप आवडतं. भांडणं झालेली त्यांना सहन होत नाहीत. त्यातून वडील व्यसनी असतील आणि घरात मारहाण, तमाशे करत असतील तर त्याचा मुलांवर परिणाम होतोच. लहानपणापासून भांडणं, शिव्या देणं हे ऐकलं असेल तर मुलांची मानसिकता तशीच घडते (How to Deal With Teenagers). 

(Image : Google)
  आईवडिलांनी मुलांसाठी वेळ राखून ठेवायला हवा तो मुले वयात येताना. विविध विषयांवर मुलांशी संवाद कोण साधेल याची चर्चा आईवडिलांनी करायला हवी. आई मुलीशी तर वडील मुलाशी त्यांच्यातील किशोरवयीन बदलांबद्दल बोलू शकतात. अशा संवादामुळे योग्य त्या मानसिक वृतींची जडणघडण होते. जसे की मुलींची मासिक पाळी अलीकडच्या काही वर्षांमध्ये ९ व्या वर्षी सुद्धा चालू होऊ शकते. त्यामुळे शारीरिक बदलांची माहिती आता या वयात द्यायला हवी. कारण या शारीरिक बदलांच्यासाठीची मानसिक पूर्वतयारी करण्याचं हे वय असतं. माध्यमांमध्ये बघितलेल्या वासना भडकावणाऱ्या गोष्टींविषयी कुतूहल जागृत झालं असलं तरी त्याबद्दलचं शास्त्र समजावून देणं खूप महत्वाचं. कारण समवयस्क मित्रमैत्रिणींकडून अर्धवट माहिती मिळालेली असते, त्यापाठीमागील शास्त्र मुलामुलींना कळायला हवं. 

(Image : Google)

मोठ्या माणसांच्या कामभोगाची शिकार ही किशोरवयीन मुलं होऊ शकतात. ‘चाइल्ड अब्यूज’चं म्हणजेच बाल लैंगिक अत्याचाराचं प्रमाण समाजात खूप असतं. धाक दाखवल्याने हे मुकाट्याने सहन करणारी बरीच मुलं-मुली असतात, ज्याचा परिणाम भावी लैंगिक जीवनावर होऊ शकतो. म्हणून आईवडिलांशी बाहेर घडलेल्या सर्व घटना सांगण्याचा मोकळेपणा मुलामुलींना वाटायला हवा असेल तर या आधीपासूनच्या काळापासून मुलामुलींशी सुसंवाद राखायला हवा. वडील किंवा आई अति धाकात ठेवण्याचा प्रयत्न करत असतील तर हा सुसंवाद होऊ शकत नाही. मग अशा मुलामुलींना मानसिक ताणातून जावे लागते. काही मुलं ताण सहन करून सुद्धा अभ्यास, खेळ, यात प्रावीण्य मिळवू शकतात. तर काहीजण अभ्यासात मागे पडतात. जर अति दुर्लक्ष झाले तर तरुण वयात मुलांमध्ये मानसिक आजार निर्माण होऊ शकतात. म्हणूनच आई वडिलांशी मोकळा संवाद हा किशोरावस्थेतील लैंगिकता शिक्षणाचा पाया आहे. म्हणूनच आई वडिलांशी मोकळा संवाद हा किशोरावस्थेतील लैंगिकता शिक्षणाचा पाया आहे. या वयात संवाद साधला गेला तर मुलांना पौगंडावस्थेत बदलांना सामोरे जाणे सोपे होते.

(क्रमश:)

(लेखिका लैंगिकतातज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :पालकत्वलहान मुलं