लहान मुलं ही ओल्या मातीच्या गोळ्यासारखी असतात. त्यांना जसा आकार देऊ तसे ते घडतात. पण हल्ली पालकच एवढे व्यस्त असतात की त्यांना मुलांकडे लक्ष द्यायला फारसा वेळच नसतो. शेवटी जेवढा वेळ मिळतो तेवढा मुलांसोबत मजेत घालवावा असे पालकांना वाटते. पण मुलांचा वाढता हट्टीपणा, चिडचिड आक्रस्ताळेपणा या सगळ्या गोष्टी कशा हाताळाव्यात हे पालकांना समजत नाही. मग दिवसभराचा थकवा आणि ताण मुलांवर निघतो आणि कधी मुलांवर हात उचलला जातो तर कधी त्यांना कठोर शिक्षा केली जाते. आपल्या मुलाला चांगली शिस्त असावी असं प्रत्येक आई-वडिलांना वाटतं (How to discipline your child without punishment).
योग्य वयात शिस्त लागली तरच मोठी झाल्यावर मुलं नीट वागतील असं वाटत असल्याने पालक मुलांना लहानसहान गोष्टीत शिस्त लावायला जातात. त्याउलट मुलं मात्र पालक सांगतील त्याच्या विरुद्धच काहीतरी करत असतात. मुलांवर ओरडून, मारून त्यांना शिस्त लावणे याचा तेवढ्यापुरता उपयोग होतो, पण त्यामुळे कायमस्वरुपी शिस्त लागत नाही. मग मुलांना चांगली शिस्त कशी लावावी याविषयी प्रसिद्ध पॅरेंटींग कोच श्वेता गांधी काही सोप्या टिप्स देतात. शिस्त लावणे म्हणजे त्यांना शिक्षा करणे, कंट्रोल करणे किंवा रागावणे नाही तर पद्धतशीरपणे ती परिस्थिती हाताळणे असते असे त्या सांगतात.
पाहा शिक्षा न करता शिस्त लावण्याच्या पद्धती
१. सकारात्मक प्रतिसाद – मुलांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्यांचे ताबडतोब कौतुक करा. मुलांचे कौतुक केले तर मुले ती कृती पुन्हा पुन्हा करतात. त्यामुळे नकळत त्यांना चांगल्या सवयी लागतात.
२. परिणामांची जाणीव – आपल्याला मुलाने एखादी गोष्ट केलेली हवी असेल तर त्याला त्या परिस्थितीची जाणीव करुन द्या. मुलांना परिस्थितीची जाणीव करून देत ती कृती का करणे आवश्यक आहे हे पटवून सांगा. यानंतरचा निर्णय त्याच्यावर सोडा, त्यामुळे त्याला जबाबदारीची जाणीव होईल. काय करावे काय नाही हे ओळखून निर्णय क्षमता वाढते.
३. योग्य पर्याय द्या – जर मूल वस्तू फेकणे, आरडाओरडा अशाप्रकारचा आक्रस्ताळेपणा करत असेल तर त्याच्यावर न चिडता शांतपणे त्याला दुसर्या कामात गुंतवा. चित्रकला, क्राफ्ट किंवा इतर खेळात गुंतवून योग्य पर्याय सुचवा.त्यामुळे मूल नकळत शांत होईल.
४. दूर लोटण्यापेक्षा जवळ घ्या – मूल चिडचिड करत असेल तर त्याला रागावून, शिक्षा करून दूर लोटण्यापेक्षा तुला काय वाटतय मला कळतंय, माझ्या जवळ ये. असे प्रेमाने सांगून त्याला जवळ घ्यावे. त्यामुळे मुलांनाही त्यांच्या भावना समजून घ्यायला मदत होईल.
५. स्पष्ट आणि ठाम सीमारेषा – बर्याचदा आपण मुलांना एखादी गोष्ट नाही म्हणतो पण नंतर घरातले इतर किंवा आपणच पुढच्या वेळी ती देतो. उदाहरणार्थ चॉकलेट खायचे नाही असे म्हणतो आणि नंतर आपणच आणून देतो. यामुळे आपणच आपल्या निर्णयावर ठाम नसल्याने मुलं गोंधळतात. नेमके काय करावे हे त्यांना कळत नाही. यातूनच त्यांचा हट्टीपणा वाढतो. त्यामुळे जर एखादी गोष्ट नाही म्हटली तर ती स्पष्टपणे सांगा आणि त्यावर ठाम रहा.