Join us  

मुलं आईबाबांचं ऐकतच नाहीत, उर्मट उत्तरं देतात? हताश होण्यापूर्वी पालकांना माहिती हवी ४ कारणं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2023 1:31 PM

How to ensure your child listens to you Parenting Tips : मुलांनी आपलं न ऐकण्यामागची कारणं वेळीच समजून घ्यायला हवीत...

मुलांनी सतत आपलं ऐकलं पाहिजे आणि शहाण्यासारखं वागलं पाहिजे अशी पालक म्हणून आपली अपेक्षा असते. पण मुलं याच्या बरोबर उलटं करतात आणि आपण सांगितलेलं काहीच ऐकत नाहीत. एरवी ठिक आहे पण लोकांसमोर मुलांनी असं वागलं की आपल्याला जास्तच कसंतरी होतं आणि अपमान झाल्यासारखं वाटतं. बहुतांश वेळा मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात, त्यांचं भलं व्हावं याच उद्देशाने आपण त्यांना शिस्त लावण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्यांचा हट्टीपणा इतका जास्त असतो की ते आपलं कोणतंच म्हणणं ऐकून घ्यायलाच तयार नसतात आणि त्यांना सतत आपलंच खरं करायचं असतं (How to ensure your child listens to you Parenting Tips).

अशावेळी आपण बरेचदा शांत राहण्याचा प्रयत्न करतो पण कधी ना कधी आपलाही पारा चढतो आणि मग मुलांवर ओरडणे, हात उगारणे असे प्रसंग घडतात. यामुळे मुलं आणखी जास्त हट्टीपणा करतात. पण हे सगळं टाळायचं असेल आणि मुलांनी आपलं सहज ऐकावं असं वाटत असेल तर पालकांनी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवं. मुलांनी आपलं न ऐकण्यामागची कारणं वेळीच समजून घेतली तर त्यांना समजावणं नक्कीच सोपं होऊ शकतं. ही कारणं कोणती आणि ती टाळण्यासाठी काय करायला हवं ते पाहूया...

१. सतत सूचना देणे 

काही पालक मुलांकडे सतत लक्ष ठेवून असतात आणि त्यांनी केलेल्या प्रत्येक क्रियेसाठी, गोष्टीसाठी त्यांना बारीक सारीक सूचना देत राहतात. असे केल्याने मुलं काही वेळाने इरीटेट होण्याची शक्यता असते. त्यामुळे किमान काही गोष्टी ऐकायचेही ते सोडतात आणि पालकांचे काहीच ऐकत नाहीत. हे सतत काही ना काही सांगतच असतात असं म्हणून मुलं पालकांकडे चक्क दुर्लक्ष करायला लागतात. 

२. मुलांचे दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष असणे 

आपण मुलांना एखादी गोष्ट सांगतो तेव्हा त्यांचे लक्ष आपल्याकडे असणे अपेक्षित असते. मात्र बरेचदा आपण मुलांना काही सांगतो तेव्हा त्यांचे लक्ष आपल्याकडे नसून खेळण्याकडे, इतर लोकांकडे असण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपण काय बोलतो हे त्यांच्या मेंदूपर्यंत कदाचित पोहोचत नाही. 

३. सतत टिका करणे 

काही पालक मुलांच्या तोंडावर, इतर कोणाला सांगताना मुलांवर सतत काही ना काही टिका करतात. हा असंच करतो, हा माझं ऐकतच नाही, ही भयंकर दंगा करते अशी सतत टिका करणारी वाक्य बोलल्याने मुलांवर त्याचा नकारात्मक परीणाम होतो आणि हे आपल्याला सतत नाव ठेवतात असा फिल आल्याने मुलं पालकांचं ऐकेनासे होतात. 

४. आवाज वाढवणे 

मुलांनी ऐकलं नाही किंवा आपल्याला कामाचा खूप ताण असेल तर आपला आवाज नकळत वाढतो. काही वेळा इतर गोष्टींचा राग मुलांवर निघण्याचीही शक्यता असते. अशावेळी आपण मोठ्या आवाजात मुलांशी बोलल्यास आपण काय बोललो हे लक्षात न घेता आपण मोठ्या आवाजात बोललो इतकेच मुलांना कळते. त्यामुळे आपण जे सांगतो ते मुलांपर्यंत पोहोचतच नाही. 

काय करायला हवे...

१. मुलांच्या उंचीवर जाऊन त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा.

२. काय करायचे नाही हे सांगण्यापेक्षा काय करायला हवे ते सांगायला हवे. 

३. एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हणण्यापेक्षा सकारात्मक किंवा होकारार्थी प्रतिक्रिया द्या. 

४. त्यांनी चांगले वागलेल्या गोष्टीचे आवर्जून कौतुक करा.

५. एखाद्या गोष्टीसाठी मुलं नाही म्हणत असतील तर त्यांनी ते करावं म्हणून त्यांना पर्याय द्यायला हवेत. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं