मुलांची सकाळची शाळा म्हणजे आई-वडीलांसाठी एक टास्कच असतो. सकाळी त्यांना झोपेतून उठवणे, ब्रश करायला लावणे, दूध प्यायला लावणे, आंघोळ घालून वेळेत तयार करणे आणि मग शाळेत सोडणे किंवा व्हॅनवाल्या काकांसाठी वेळेत रस्त्यावर जाऊन थांबणे हे सगळे करता करता नाकात दम येतो. एकतर मुलांना सकाळी गाढ झोप लागलेली असते आणि त्यांना अजिबात उठायचं नसतं. उठले तरी ते अर्धवट झोपेत असल्याने त्यांना आवरायचं नसतं. मग पालकांची खूप तगतग होते आणि मुलांचीही रडारड सुरू असते. हे सगळं रोज झालं की आपल्याला त्याचा कंटाळा येतो. यावर उपाय म्हणून आणि मुलांना वेळेत तयार करण्यासाठी एक खास टेक्निक आज आपण पाहणार आहोत. इन्स्टाग्रामवर हरप्रीत ग्रोव्हर यांनी आपल्या पेजवरुन हे टेक्निक शेअर केले असून ते पॅरेंटींग विषयातील बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी आपल्याशी शेअर करतात. आताच्या या पोस्टमध्ये मुलांनी सकाळी वेळेत तयार व्हावं यासाठी काय करायचं हे ते अतिशय नेमकेपणाने सांगतात (How To get Ready our Child In the Morning For School).
काय आहे मुलांना तयार करण्याचे टेक्निक
मुलांना सकाळी तयार करण्यासाठी आपण त्यांना झोपेतून उठवणं ठिक आहे. पण जर ते ६ किंवा ७ वर्षापेक्षा मोठे असतील तर त्यांच्या मागे मागे फिरुन त्यांचे सगळे करु नका. तुम्हाहा तुमचं सगळं करायचं आहे आणि वेळेत आवरायचं आहे हे मुलांना एकदाच नीट सांगा. त्यांचं त्यांना खायचंय, ब्रश-आंघोळ, कपडे घालणे सगळं त्यांना करायचंय हे त्यांना पटवून द्या. तसंच शाळेत वेळेवर पोहोचणं गरजेचं आहे जर उशीर झाला आणि शाळेत शिक्षा झाली किंवा पुन्हा घरी यावं लागलं तर त्याची जबाबदारी मुलांचीच आहे हेही त्यांना पटवून द्या. हरप्रीत सांगतात आम्ही आमच्या मुलीवर हा प्रयोग केला. ती वेळेत तयार होते आणि आम्हालाच आम्ही तयार नसल्याचं सांगते.
याने होईल काय?
मुलं जर वेळेत तयार झाली नाहीत आणि शाळेत गेली नाहीत तर स्क्रीनशिवाय त्यांना तसंच घरात बसू दे, त्यांना बोअर होऊदे. आपल्या आयुष्यात जे घडतंय त्याची जबाबदारी ही आपली असायला हवी हे मुलांवर लहान वयात ठसायला हवे. आपण मुलांना त्यांच्या आयुष्याचा कंट्रोल किंवा जबाबदारी घ्यायला लावली तर त्याचा त्यांना भविष्यात चांगला फायदा होईल.
इतकेच नाही तर पालक म्हणून आपलाही खूप ताण कमी होण्यास याची मदत होईल. प्रत्येक छोटी गोष्ट करण्यासाठी मुलांच्या मागे लागण्यापेक्षा त्यांचे त्यांनी काही गोष्टी करणे जास्त महत्त्वाचे आहे. यासाठी पालकांना काही दिवस पेशन्सने वागावे लागेल. पण एकदा हे जमले की पालक म्हणून आपले आणि मुलांचे आयुष्य खूप सोपे होईल हे लक्षात ठेवा.