लहान मुलंच ती.. त्यांना चॉकलेट खावंसं वाटणारच.. हे सगळं खरं असलं तरी किती चॉकलेट खायचं, यालाही काही मर्यादा आहेत.. काही मुलांना जवळपास रोज चॉकलेट लागतं.. बरं एकच चॉकलेट खाऊन त्यांचं समाधान मुळीच होत नाही. दिवसाकाठी कित्येक चॉकलेट्स फस्त केले जातात. मुलांचं चॉकलेट खाणं कमी करण्यासाठी हे काही उपाय करून बघा.. चॉकलेट खाण्याचं प्रमाण निश्चितच कमी- कमी होत जाईल.
१. एकदम कडाडून विरोध नकोआजपासून चॉकलेट खाणं बंद.. असं फर्मान काढत मुलांना एकदम कडाडून विराेध करू नका. त्यांच्यावर चिडून आरडाओरडा करू नका. त्यांची ही सवय आणि चॉकलेटची आवड एकदम सुटण्यासारखी नाही. त्यामुळे त्यांनाही थोडा वेळ द्या. मुलं दररोज चॉकलेट खात असतील तर आता एक- दिवसाआड मिळेल असं सांगा. थोडक्यात म्हणजे त्यांची चॉकलेट खाण्याची फ्रिक्वेन्सी कमी करा. गोड बोलून त्यांना समजवा.
२. पौष्टिक अन्न द्या..ज्या मुलांना सतत काहीतरी गोड खावं वाटतं, त्यांच्या आहारात पोषणमुल्यांची कमतरता असते. त्यामुळे आपल्या मुलांचा आहार एकदा तपासून बघा. त्यांना फळं नियमितपणे खायला द्या. तसेच त्यांना रोजच्या जेवणातून प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स आणि इतर खनिजे जास्तीतजास्त कशी मिळतील याकडे लक्ष द्या.
३. चॉकलेटचं अमिष दाखवणं बंद करा..मुलांना चॉकलेटची खूप जास्त सवय लागण्यासाठी त्यांचे पालकही काही प्रमाणात जबाबदार असतात. अमूक एक गोष्ट कर मग तुला चॉकलेट देईल. एवढा होमवर्क संपवला तर एक कॅडबरी... असं काही काही पालकच मुलांना सांगत असतात. त्यामुळे मुलांना ही सवय लागते आणि दिवसागणिक ती वाढते. त्यामुळे मुलांना एखाद्या गोष्टीसाठी चॉकलेटचं प्रॉमिस देणं थांबवा.
४. घरात काहीतरी करून ठेवाचॉकलेटला पर्याय म्हणून तुम्ही मुलांना घरातल्या घरात अनेक हेल्दी पर्याय देऊ शकता. मुलांना खजूर, सुकामेवा हे सगळं मुलांच्या हाताशी आणि त्यांना सहज दिसेल असे ठेवा. चॉकलेटपेक्षा रवा, बेसन लाडू, शंकरपाळे कधीही उत्तम. त्यामुळे मुलांनी चॉकलेट मागितलं तर त्यांना असं काही द्या. शेंगदाणा लाडू, चिक्की करून ठेवा. हे मुलांना देणं कधीही चांगलं.
५. डार्क चॉकलेट देऊन बघा चॉकलेटपेक्षा डार्क चॉकलेट बरं.. असं म्हणतात. त्यामुळे मुलांनी जर चॉकलेट मागितलंच तर त्यांना डार्क चॉकलेट द्या. डार्क चॉकलेटची चव कडवट असल्याने मुले तर खाऊ शकणार नाहीत. चॉकलेट मागितलं की कडवट चॉकलेटच मिळतंय असं पाहून त्यांची सवय हळूहळू कमी होईल.
६. चॉकलेट खाण्याचे दुष्परिणाम समजावून सांगाचॉकलेट खाऊ नको, दात किडतील.. असं अनेकदा सांगूनही मुलं ऐकत नाहीत. त्यामुळे दात किडल्यामुळे होणारा त्रास त्यांना एखाद्या गुगल व्हिडिओवरून किंवा एखादा फोटो दाखवून समजावून सांगा. व्हिडिओ, फोटो पाहून मुलं आपोआपच त्यांची सवय कमी करतील.