ऋता भिडे
मुलांना वेळ देणं हे पालकांसमोरील एक मोठं आव्हान झालं आहे. मग माझं ऑफीसचं काम, घरातील जबाबदाऱ्या इतर गोष्टी असतानाही मी मुलाला क्वालिटी टाइम देते असं पालकांचं म्हणणं असतं. पालक मुलांना जो वेळ आणि जेवढा वेळ देत आहेत तो त्यांच्यासाठी पुरेसा आहे का? मुलांना खरंच त्यांच्या पालकांबरोबर सतत थांबायला आवडत का? पालकांनी मुलाबरोबर काही ऍक्टिव्हिटी केली म्हणजे खरंच हवा तास वेळ घालवला का? कोणत्या ऍक्टिव्हिटी स्मार्ट पद्धतींनी केल्या तर त्याचा फायदा होऊ शकतो ? हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत (How To Give Quality Time To Your Child Parenting Tips).
१. थोडा कंटाळा आला की मुलं आणि पालक लगेच फोन काढतात. मग त्या स्क्रिनवर एकत्र काहीतरी छान पाहिलं, एखाद्या गोष्टीबद्दल माहिती घेतली, मनोरंजन करणाऱ्या गोष्टी पहिल्या तर तो वेळ क्वालिटी टाइम म्हणू शकतो. पण हेच प्रत्येकाच्या हातात वेगवेगळा फोन असेल आणि त्यामध्ये मुलं काय पाहतायत यावर पालकांचं लक्ष नसेल तर मग तो वेळ क्वालिटी टाइम होणार नाही.
२. तुमच्याकडे मुलं खेळायची मागणी करत असतील तर त्यांच्याशी तुम्ही किती वेळ खेळता यापेक्षाही काय खेळता हे महत्वाचं आहे. यात एखादा चेसचा डाव, कॅरॅमसारखा खेळ खेळू शकता. गोष्ट सांगणे, वाचून दाखवणे, एखाद्या गोष्टीची, ठिकाणाची माहिती सांगणे, वेवेगळ्या विषयांवर चर्चा करणे हे क्वालिटी टाइम घालवण्याचे चांगले मार्ग असू शकता. घरातील एखादे काम मुलांना घेऊन करणे, एखादा पदार्थ बनवण्यात त्यांची छोटी मदत घेणे या गोष्टीही करु शकतो.
३. मुलांकडून अभ्यास करून घ्यायचा असतो, त्यामध्ये बऱ्याच पालकांचा खूप वेळ जातो. अभ्यासात बहुतांश वेळ जातो आणि मग नंतर काहीतरी वेगळे करावे असे वाटतच नाही. अभ्यास घेताना सुद्धा मुलांबरोबर विसंवाद न करता संवाद साधलात तर तो चांगला क्वालिटी टाइम होऊ शकतो.
४. मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्याबरोबर घेऊन गेलात आणि तर तुमच्या कामाबरोबरच तुम्हाला मुलांच्या बरोबर वेळ घालवल्याचं समाधान सुद्धा मिळेल. त्याचबरोबर, मुलांना तुम्ही नवीन जागेची, माणसांची ओळख करून देऊ शकता. यामध्ये अगदी नाटक, सिनेमाला सुद्धा जाऊ शकता. तुमच्या मुलाच्या वयानुसार, आवडीनुसार ठिकाण, जागा आणि काय करू शकता याचे अनेक पर्याय आहेत.
५. मुलांबरोबर थांबलं म्हणजे क्वालिटी टाइम दिला असं नाही तर त्यांच्याबरोबर लक्षपूर्वक वेळ घालवणं गरजेचं आहे. वरील सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही शरीरानेच नाही तर मनाने सुद्धा मुलांबरोबर आहात ना हे तपासून पहा. सध्या अनेक पालकांना distracted parent syndrome झालेला पाहायला मिळतोय. म्हणजेच पालकांचं लक्ष मुलांकडे कमी आणि मोबाईल मध्ये जास्त आहे. अशावेळेस, तुम्ही खूप वेळ मुलांबरोबर असलात तरी तो वेळ क्वालिटी वेळ होत नाही. त्यामुळे, मुलांच्याबरोबर मस्त आनंदात वेळ घालवा. किती वेळ आहे त्यापेक्षा त्या वेळेमध्ये काय करत आहात हे लक्षपूर्वक पाहा.
(लेखिका समुपदेशक आणि मेंदू व भाषाविकासतज्ज्ञ आहे.)
rhutajbhide@gmail.com
संपर्क - +39 389 573 5213 (व्हॉटसअॅप)