पालकांनी काही सांगितलं की मुलांनी ते निमूट ऐकावं अशी पालकांची पारंपरिक अपेक्षा असते. मुलं प्रश्न विचारतात ते पालकांना आवडत नाही. मात्र मूल स्वतंत्र आहे, त्याला मतं आहेत ते प्रश्न विचारणारच. अर्थात म्हणून मुलांनी उद्धटपणे बोलणे, उलट उत्तरं बेफिकीरीनं देणं योग्य नाहीच. त्यातून घरात आरडाओरडा होतो. पालकांची एक कॉमन तक्रार असते की मुलं उलट उत्तरं देतात. उद्धटपणे बोलतात. ऐकतच नाही. काही वेळा लहान म्हणून पालक दूर्लक्ष करतात. पण मोठं व्हायला लागलं मूल की त्यातून वाद, कटकट आणि चिडचिड यापेक्षा वेगळं काही होत नाही. मुलांना शिस्त हवी तसा मोकळा संवादही हवा. मुलं दुरुत्तरं करत असतील तर किंवा मुळात करू नये म्हणून काही गोष्टी नक्की करता येतील. (Parenting Tips).
मुलं खूपच उद्धट आणि उलटं बोलत असतील तर मुलांच्या अशा वागण्यामुळे अनेकदा पालकांचाही तोल जातो आणि रागाच्या भरात मुलांना मारणं, काहीबाही बोलणं, ओरडणं अशा चुका पालकही करतात. पण त्यामुळं मुलांचा अहंकार दुखावतो आणि ही सवय कमी होण्याऐवजी वाढत जाते. मारल्याचा किंवा चुकीचे शब्द वापरल्याचा त्यांच्या नाजूक मनावर खोल परीणाम होतो आणि ते आहेत त्याहून अधिक उद्धट होत जातात. मग अशावेळी नेमकं काय करायचं? पालकांनी मुलांच्या या वागण्यावर मार्ग काढायचा कसा?
लहान मुलांच्या मनावरही असतो स्ट्रेस; ५ उपाय-मुलांची मानसिक वाढही होईल उत्तम
१. अडचणीचे मूळ शोधा
अनेकदा मुलांचे पालकांकडून प्रमाणापेक्षा जास्त कौतुक होताना दिसते. मूल एखाद्या खेळात, अभ्यासात किंवा कलेत चांगली कामगिरी करत असेल तर पालक त्याचे प्रमाणापेक्षा जास्त कौतुक करतात. पालकांना मुलांचे कौतुक असणे स्वाभाविक आहे पण ते किती कसे करतो याचे भान त्यांना असायला हवे. इतकेच नाही तर प्रमाणापेक्षा जास्त लक्ष देणे हेही अनेकदा पालकांच्या अंगाशी येऊ शकते. यामुळे मुले हट्टी आणि उद्धट होऊ शकतात. त्यामुळे आपण मुलांशी अशाप्रकारे वागत नाही ना हे पालकांनी तपासून पाहायला हवे.
मुलांना अभ्यासाची गोडी लावण्याचे ५ उपाय, त्रागा-कटकट न करता आनंदाने होईल अभ्यास
२. शिक्षकांशी बोला
मुलं घरात आपल्याशी उद्धट वागत-बोलत असतील तर ते शाळेतही शिक्षकांशी तसंच करत असण्याची शक्यता आहे. अनेकदा आपल्याला काही गोष्टी समजत नाहीत पण शिक्षक त्यामागचे कारण, त्यांच्या वागण्याची पद्धत, उपाय याविषयी आपल्याला सांगू शकतात. त्यामुळे मुलांच्या शिक्षकांशी मोकळा संवाद असणे आवश्यक आहे.
३. मुलांशी एकांतात बोला
मुलांचा मूड पाहून ते एकटे असताना त्यांच्या वागण्याबद्दल त्यांच्याशी बोलायला हवे. मुलं अचानक हट्टीपणा का करतात, उलटी उत्तरं का देतात यामागे काही कारणं असू शकतात. कदाचित एकांतात असताना गप्पांच्या नादात ते आपल्याला त्यामागचे नेमके कारण सांगू शकतात. उद्धटपणे बोलणे कसे चुकीचे आहे, त्यामुळे त्यांना काय तोटे होऊ शकतात या गोष्टी त्यांना प्रेमाने समजावून सांगा. ते एकटे असतील आणि तुम्ही शांतपणे त्यांना समजावत असाल तर ते गोष्टी पटकन ऐकतात.