नुकतीच एक बातमी वाचली. खेळताना मित्रांनी चिडवलं म्हणून एका ९ वर्षाच्या मुलाने घरात गळफास लावून घेतला. ही बातमी वाचल्यावर अनेकांना वाटलं असेल की काय ही मुलं, मित्रांनी चिडवलं म्हणून काही कुणी स्वत:चा जीव घेतं का? मोठ्यांच्या जगाला जी गोष्ट क्षुल्लक वाटते, लहान मुलांच्या जगात मात्र ही चिडवाचिडवी खरंच जिवघेणी ठरु शकते. मुलं अत्यंत निराश होतात चिडवाचिडवीने. अशावेळी पालकांनी काय करायचं?
चिंतनचंच उदाहरण घ्या. चिंतन आणि मधुलीची घट्ट मैत्री. दोघं मिळून छान अभ्यास करायचे, एकत्र बाहेर इतर मित्र-मैत्रिणींसोबत खेळायला जायचे. शाळेतही सोबतच जायचे. पण बरेच दिवस मधुली घरी येतंच नाहीये, चिंतनही तिला फोन करुन बोलवत नसल्याचं मेधाच्या लक्षात आलं. मधुलीबद्दल चिंतनला काही विचारलं तर चिंतन विषय टाळायचा. काहीतरी उडवाउडवीची उत्तरं द्यायचा. चिंतनच्या उत्तरानं मेधाचं काही समाधान होत नव्हतं.
एकदा काही कामानिमित्त मेधा आणि मधुलीची आई सरिता यांची भेट झाली. बोलता बोलता हल्ली ' मधुली चिंतनशी खेळायला घरी येत का नाही!' असं मेधानं विचारलं. मेधाच्या या प्रश्नावर सरितानं जे उत्तर दिलं ते ऐकून मेधाला धक्काच बसला.
(Image : google)
चिंतन मधुली एकत्र खेळतात, एकत्र अभ्यास करतात, एकत्रच शाळेत जातात यावरुन त्यांना शाळेतली मुलं चिडवत होती. ते मधुलीला चिंतनची 'गर्लफ्रेण्ड' म्हणू लागले. त्यामुळे चिंतननेच मधुलीला घरी बोलावणं बंद केलं होतं. केवळ मुलं मुली चिडवतात म्हणून आपण एकत्र खेळायचं नाही ही चिंतनची भूमिका मेधाला खटकत होती. घरी आल्यावर ती चिंतनशी यावर बोलली. आपण मुलांच्या चिडवण्याला इतकं का महत्त्व द्यायचं असं मेधाला वाटत होतं. पण चिंतनला काही मुलांनी चिडवलेलं सहन होत नव्हतं. त्यामुळे तो ' मी आता मधुलीशी खेळणार नाही' या निर्णयावर तो ठाम होता.
असं अनेक घरात होतं. अशावेळी पालकांनी मुलांशी काय बोलायला हवं?
(Image : google)
मुलं चिडवतात तेव्हा? - डाॅ. वैशाली देशमुख (टीन एजर मुलांच्या वर्तनाच्या अभ्यासक आणि बालरोगतज्ज्ञ )
१. चौथी-पाचवीच्या पुढे गेलेल्या अनेक मुला मुलींना असे मित्र मैत्रिणींनी कोणावरुन तरी चिडवण्याचे अनुभव येतात.
२. कधी चिडवणाऱ्या मुला मुलींनी शाळेतल्या मोठ्या मुलांना अशी चिडवाचिडवी करताना पाहिलेलं असतं. कधी सोशल मीडियावर, वेबसिरीजमध्ये पाहिलेलं असतं. त्यामुळे एक मुलगा आणि मुलगी गप्पा मारत असले की त्यांच्यात काहीतरी चालू आहे अशी कुजबूज लगेच सुरु होते.
३. खरंतर मुलं मुली एकमेकांचे चांगले दोस्त बनू शकतात. त्यांना इतरांनी एकमेकांवरुन चिडवण्याची गरज नसते. हे चिडवणाऱ्या मुलांना आणि इतरांच्या चिडवण्याने स्वत:ला त्रास करुन घेणाऱ्या मुलांनाही सांगायची गरज असते.
४. मुख्य म्हणजे काही नाही होत चिडवलं तर, तू बाऊ करतोस असं मुलांना न म्हणता, न रागवता. जर प्रकरण गंभीर वाटलं तर पालकांनी प्रत्यक्ष चिडवणाऱ्या मुलांना भेटून किंवा शाळेत शिक्षकांना सांगून हस्तक्षेप करायला हवा.
५. मुलांसाठी चिडवाचिडवी हा जिव्हारी लागणारा विषय आहे हे विसरु नये.
या चिडवाचिडवीचे मुलांवर काय भयंकर परिणाम होतात याबद्दल वाचा या लिंकवर..
https://urjaa.online/boy-and-girl-cant-be-only-friend-as-parent-what-you-do-if-your-child-suffer-by-teasing-on-their-friendship/