संवाद ही माणसाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मनुष्य प्राण्याला मिळालेली ती एकप्रकारची देणगीच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपल्या मनातल्या भावना, विचार एकमेकांशी शेअर करण्याचे उत्तम माध्यम म्हणजे संवाद आहे. हा संवाद कसा साधायचा हे आपल्याला शिकवायला लागत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मूल जन्माला आल्यापासून आपल्या आजूबाजूच्या लोकांना एकमेकांशी बोलताना, विचारविनिमय करताना पाहते आणि नकळत ते चिमुकले मूलही कधी संवाद साधायला लागते आपल्यालाच कळत नाही. हा संवाद साधताना भाषा महत्त्वाची असतेच पण त्याहीपेक्षा मूल आपले म्हणणे शब्दात कशाप्रकारे सांगते आहे याकडे लक्ष द्यायला हवे अशी एक बेसिक टिप पालकांनी लक्षात ठेवायला हवी. हा संवाद जास्त नेमका आणि योग्य व्हावा यासाठी आज आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. मुलांनी योग्य पद्धतीने संवाद साधावा यासाठी प्रसिद्ध समुपदेशक प्रीती आपल्याला काही महत्त्वाच्या टिप्स सांगतात. या टिप्स कोणत्या आणि त्या नेमकं काय सांगतात पाहूया (How To Improve Communication Skill in Children)...
लेकरांवर कितीही प्रेम असलं तरी आईनं करायलाच हव्यात ३ गोष्टी-मुलांच्या विकासासाठीही आवश्यक
१. अनुभवाशी संबंधित संवाद
आपण मुलांना एखादी गोष्ट सांगितली. किंवा त्यांनी स्क्रीनवर एखादी गोष्ट पाहिली. आजुबाजूला काही घडलेले पाहिले की मुलांना त्याबद्दल बोलायला लावायचे. त्या गोष्टीत काय सांगितलं होतं, कोण कोणाला काय म्हणालं, कोण बरोबर वागलं, कोण चूक वागलं, अशाप्रकारे मुलांना आपलं मत मांडण्याचं अवकाश आपण द्यायला हवं.
आधी आईला सल्ले देणे थांबवा! काजोल म्हणते, प्रत्येक आईची लढाई वेगळी कारण...
२. दाखवा आणि सांगा
ही एक अतिशय महत्त्वाची पद्धत असून एखादी गोष्ट घेऊन त्याबद्दल आपण काही गोष्टी सांगायच्या आणि मुलांना काही सांगायला लावायच्या. यामध्ये अगदी एखादं फूल असेल तर त्याबद्दल मुलांना व्यक्त व्हायला लावायचं. यामुळे मुलांचं संवाद कौशल्य नक्कीच चांगलं व्हायला मदत होते.
३. चित्रावरुन गोष्ट सांगणे
हा एक अतिशय उपयुक्त असा टास्क आहे. वृत्तपत्र, एखादं मासिक, कोणत्याही पुस्तकात असणाऱ्या चित्राविषयी मुलांशी बोलायला हवं. या चित्राविषयी मुलांशी चर्चा केल्या तर त्यांना त्याबद्दल काय वाटतं, ते नेमका कसा विचार करतात या गोष्टींचा आपल्याला अंदाज येऊ शकतो.