डॉ. पौर्णिमा काळे
आपण सगळेच पालक मुलांच्या प्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटीबद्दल नेहमीच ऐकत, वाचत असतो. मात्र मुलं वारंवार आजारी पडत असतील, वातावरणात थोडा बदल झाला की लगेच त्यांना काही ना काही होत असेल तर त्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे हे लक्षात घ्यावे. अशावेळी सामान्यपणे सर्दी, खोकला, ताप, जुलाब होणे, भूक कमी होणे, चिडचीड करणे अशा तक्रारी उद्भवतात. आता आयुर्वेदाच्या दृष्टीने मुलांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आपण काय करू शकतो. तर बाळ जन्माला आल्यावर पाहिले ६ महिने खूप महत्त्वपूर्ण आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आईचे दूध-पहिले ६ महिने फक्त आईचेच दूध बाळाला दिले गेले पाहिजे. त्यातून बाळाला भरपूर पोषकतत्त्व मिळतात (How to Improve Immunity In Kids).
मॉडर्न सायन्सनुसारही व्यक्तीची प्रतिकारशक्ती चांगली राहावी यासाठी आईचे दूध अतिशय उपयुक्त असल्याचे म्हटले आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे "अभ्यंग" म्हणजे तेल मसाज. आयुर्वेदात अभ्यंगाचे बरेच महत्त्व सांगितले असून बाळाला किमान ६ महिने तीळाच्या किंवा खोबरेल तेलाने मसाज करायला हवा. मसाजमुळे शरीराचे बळ वाढण्यास मदत होते. पहिले ६ महिने या दोन गोष्टी या बाळाच्या प्रतिकारशक्तीचा पाया भक्कम करतात. ६ महिन्यानंतर बाळाला आईच्या दुधाबरोबर सहज पचेल असे वरचे हलके अन्न द्यायला हवे. त्यानंतर १६ वर्षापर्यंत बाल्यावस्था असून या गोड,आंबट, तिखट, तुरट, खारट, कडू असा ६ रसांनी युक्त असा आहार द्यावा. जंक फूड, पॅकेट फूड, प्रिझर्व्हेटीव्ह असलेले पदार्थ, केक, बिस्किटे यांसारख्या गोष्टी शक्यतो टाळाव्यात.
काय करावे...
१. जेवणात तुपाचे सेवन करावे, याने अग्नी चांगला राहून शरीरास बळ मिळते.
२. वयात येणाऱ्या मुलांनी दररोज किमान ३० मिनीटे मैदानी खेळ खेळायला हवेत.
३. सर्व वयोगटातल्या मुलांसाठी दररोज किमान २० मिनीटे सूर्याचे कोवळ ऊन अंगावर घ्यायला हवे. त्यामुळे व्हिटॅमिन डी मिळते आणि त्याचा प्रतिकारशक्ती वाढण्यास चांगला उपयोग होतो.
४. मुलांचा स्क्रीन टाइम कमी करुन ते जास्तीत जास्त वेळ शांत झोपतील असा प्रयत्न करावा. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
५. त्यासोबतच रोज सकाळी आपल्या प्रकृती प्रमाणे च्यवनप्राशचे सेवन करावे. च्यवनप्राश नसेल तर आवळा अर्धा चूर्ण चमचा पाण्यासोबत घ्यावे. आवळ्यामध्ये असणारे सी व्हिटॅमिन प्रतिकारशक्तीसाठी अतिशय महत्त्वाचे असते.
६. अनेकदा प्रतिकारशक्तीचा आपल्या ताणाशी संबंध असतो. त्यामुळे मुले ताणविरहीत राहतील असे पाहावे. मुलांची इतर कोणाशी तुलना करणे, घाबरवणे यामुळेही त्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.
७. सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळी योगाभ्यास, सूर्यनमस्कार, सर्वांगासन, पश्चिमोत्तानासन, पद्मासन इत्यादी आसने, अनुलोम-विलोम आणि प्राणायाम करावा. प्राणायामामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते त्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढून प्रतिकारशक्ती वाढते.
८. लहान मुलांना वेगळे जेवायला न बसवता आपल्या सोबत शक्यतो आपण खात असलेले पदार्थ खायला द्यावेत. बाळाला आपल्या पंगतीत बसण्याची सवय लावावी, म्हणजे सगळी खनिजे, जीवनसत्त्वे बाळाला मिळाली की टॉनिक देण्याची गरजच पडत नाही.
तरीही लहान मुल आजारी पडलेच तर...
१. दुखणे तसेच बरे न करता जवळच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. त्यानुसार औषधोपचार घेऊन आहारात आवश्यक ते बदल करावेत.
२. मुले आजारी असताना मुलांना जास्तीत जास्त द्रव पदार्थ, सूप, कढण द्यावे यामधे आल्याचा छोटा तुकडा आणि १ ते २ लसूण पाकळ्या किसून टाकाव्यात. यामधे नैसर्गिक आणि अँटीइन्फ्लमेटरी गुणधर्म असल्याने सर्दी खोकला यांसाठी हे अतिशय उपयुक्त ठरते.
२. आयुर्वेदाचार्य बाल्यावस्था म्हणजे १६ वर्षापर्यंत कफ होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या काळात कफ वाढवणारा आहार म्हणजे मिठाई, कफ वाढवणारी फळे, आईस्क्रीम इत्यादी पदार्थ टाळावेत. फळे जास्त प्रमाणात खाल्ल्यास कफ वाढतो, त्यामुळे सिझनल फळे खावीत. पण त्याचेही योग्य प्रमाणातच सेवन करावे. डाळिंब, पपई, अंजीर या फळांचे नियमित सेवन करावे.
३. लहान मुलांना सुकामेवा जास्त प्रमाणात देऊ नये कारण सुकामेवा लहान मुलांच्या पचनशक्तीसाठी जड पडतो. पाणी पिताना उकळून कोमट केलेले असावे.
(लेखिका आयुर्वेदतज्ज्ञ आहेत.)