Join us  

खूपदा विचारुनही मुलं शाळेतल्या गोष्टी सांगतच नाहीत? 5 गोष्टी, मुले आईबाबांशी बोलतील मनातले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 9:20 AM

How To Interact With Children about Their School : मुलांच्या मनातले समजून घेण्यासाठी नेमकं काय करायला हवं याविषयी...

ऋता भिडे 

मुलांच्या शाळा चालू झाल्या की शाळेबाहेर आणि घरीही मुलांची चिडचिड, रडरड सुरु असलेली दिसते. कोणाला आई ला सोडून जायचं नाही, तर कोणाला अभ्यास नको आहे, कोणाला शाळेमध्ये इतर मुलांशी जुळवून घ्यायला अवघड जातं तर कोणाला सकाळी लवकर उठायचं नसतं. मुलं या सगळ्या गोष्टींसाठी कटकट करत असतानाही पालक मात्र मुलांना रोज शाळेत पाठवण्यासाठी प्रयत्न करत असतात. शाळेबाबत शिक्षकांबाबत काही ना काही सांगून मुलांना शाळा कशी आवडेल आणि ती कशी आनंदाने शाळेत जातील यासाठी पालकांचा प्रयत्न सुरु असतो (How To Interact With Children about Their School). 

मुलांना कसेबसे शाळेत पाठवून आपण घरी निघून येतो त्यामुळे प्रत्यक्ष आतमध्ये गेल्यावर आपले मूल कसे वागते, काय करते हे आपल्याला समजत नाही. लहान मुलांच्या बाबतीत तर हा प्रश्न सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. वर्गात बसल्यावर मूल नीट राहील ना याची पालकांना धास्ती असते. विशेष म्हणजे लहान मुलं सगळ्या गोष्टी नीट सांगू शकत नसल्याने पालकांना ही भिती वाटणे स्वाभाविक असते. शाळा सुटल्यावर मुलांनी आपल्याला सगळं सांगावं असं आपल्याला वाटत असतं. मात्र मुलांना ते सांगण्याची इच्छा असतेच असं नाही. मग मुलांच्या मनातले समजून घेण्यासाठी नेमकं काय करायला हवं याविषयी...

१. मुलांवरती प्रश्नांचा भडीमार करू नका

शाळा सुटल्यावर पालक मुलांना डबा खाल्लास का? खेळलास का? अभ्यास केलास का? वगैरे अनेक प्रश्न विचारायला लागतात त्यामुळे मुलांना जे स्वतःहून सांगायचं असतं ते राहून जातं आणि मग जेवढ्यास तेवढी उत्तरं दिली जातात. त्यामुळे मुलांना शाळेमधून घरी येताना त्यांना जे काही सांगायचं आहे ते सांगायची मोकळीक द्या. 

२. मुलांचे ऐकून घ्या

काही वेळेस मुलं मुद्यावर येण्याकरता पाल्हाळ लावून काहीतरी सांगत बसतात आणि मग पालकांचा किंवा इतर मोठ्यांचा ऐकण्यातला इंटरेस्ट निघून जातो. अश्यावेळेस मुलांना काहीतरी महत्वाचं सांगायचं असून सुद्धा ते ऐकलं जात नाही. त्यामुळे, जर तुमची मुलं असं करत असतील तर त्यांचं ऐकून घ्या, कदाचित त्या पाल्हाळ लावण्यात सुद्धा एखादी महत्वाची घटना मुलं सांगून जातील. 

३. मेमरी आणि संवाद 

कोणतीही घटना घडल्याप्रमाणे सांगण्यासाठी मुलांना मेमरायझेशन असणं गरजेचं आहे. काही वेळेस मुलांना घडलेल्या घटना त्याच क्रमाने सांगता येत नाहीत त्यामुळे सुद्धा शाळेमध्ये काय घडलं हे सांगायला त्यांना अवघड जाऊ शकतं, अश्यावेळेस मुलांबरोबर मेमरी गेम्स खेळा. संवाद हे सुद्धा महत्वाचे माध्यम आहे. यासाठी तुम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन आला असाल तर तिकडे काय काय केलं ह्याबद्दल एकमेकांशी बोला. तुमच्या मुलांना सुरुवातीपासून सांगता येत नसेल तर त्यासाठी तुम्ही काढलेल्या फोटोचा आधार घेऊ शकता. 

४. तुमचा दिवस कसा होता याबद्दल सांगा 

 संवादातून मुलांची ऐकण्याची क्षमता वाढते. मुलांना तुम्हीसुद्धा तुमचा दिवस कसा गेला याबाद्दल सांगा. त्यामुळे रात्री जेवण एकत्र करणं, एकत्र नाश्ता करताना मुलांशी संवाद साधणं फायद्याचं होईल. यामुळे मुलांना आपण दिवसभरात काय केलं, शाळेमध्ये कोण काय म्हणालं,काय खेळलो वगैरे गोष्टी मुलांना सांगायला आवडेल. 

५. मुलांना वर्णनात्मक पद्धतीने गोष्टी सांगा

लहान मुलं थोडक्यात किंवा एखाद्या शब्दात सांगत असतील किंवा उत्तर देत असतील तर तुम्हाला त्यांच्या वर्णनात्मक गोष्टी सांगण्यावर भर देणं गरजेचं आहे. खूप लहान मुलांमध्ये म्हणजे ५ वर्षांच्या आतल्या मुलांमध्ये शब्दसंपदा कमी असल्यामुळे मुलं घडलेल्या गोष्टी नीट बोलू शकत नाही किंवा सांगू शकत नाहीत म्हणून मुलांना गोष्टी सांगताना, एखाद्या कृती बद्दल, घटनेबद्दल बोलताना वेगवेगळे शब्द वापरून सांगा. या वयात मुलं मोठ्यांचे अनुकरण करत असतात त्यामुळे कोणता शब्द कुठे वापरायचा हे मुलं मोठ्यांच्याकडून शिकू शकतील. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं