Join us  

मुलं चोरुन ॲडल्ट वेबसिरीज - कंटेट पाहतात? घाबरुन न जाता पालकांनी नक्की काय करायला हवं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2024 6:51 PM

मुलं आपल्या नकळत तसलं काही पाहतच नसतील असं पालकांना वाटत असलं तरी ते फार खरं नाही.

ठळक मुद्देइंटरनेटवर दिसतं म्हणून पाहावंसं वाटतं अशा परिस्थितीत स्वत:वर नियंत्रण किती महत्वाचं असतं , ते कसं ठेवावं याचं कौशल्य मुलांना शिकवणं आवश्यक असतं.

-डाॅ. वैशाली देशमुख

समरला कधी एकदाचे आईबाबा घरातून बाहेर जातील असं झालं होतं. तो सारखं आईला 'आई तुम्ही कधी जाणार, परत किती वाजता येणार?' असं विचारत होता. आईला वाटलं समर हे काळजीपोटी विचारत असावा. पण खरं कारण वेगळंच होतं. समरला एक वेबसीरिज पाहायची होती. आदल्या दिवशीच समर ती पाहात होता. पण बाबांनी समरला टोकलं होतं. ' ही लहान मुलांसाठीची वेबसीरिज नाही समर आधी ती बंद कर!' असं बाबांनी नुकत्याच सातवीत गेलेल्या समरला शांतपणे पण जरा जरबेनेच सांगितलं होतं.

समरने बाबांच्या धाकाने ती तेव्हा बंद केली पण त्या वेबसीरिजबद्दलची त्याची उत्सुकता फारच वाढली होती. त्यामुळे एका कामानिमित्त दुपारभर आई बाबा घरी नसणार ही गोष्ट समरसाठी आनंदाची ठरली आणि तो आईबाबा बाहेर जाण्याची वाट पाहू लागला.

खरंतर ओटीटी प्लॅटफाॅर्मच्या पर्यायामुळे मुलांना कोणत्याही वेबसीरिज, सिनेमा, कार्यक्रम पाहण्यासाठी सहज उपलब्ध होतात. इथे मोठ्यांसाठी आणि लहानांसाठी पाहण्याचा कटेन्ट अशी काही सीमारेषाच नसते. मोठ्यांसाठीचा कटेण्ट लहान मुलांना पाहण्यासाठी ओटीटीद्वारे टी.व्हीवर आणि इंटरनेटद्वारे मोबाइलवर सहज उपलब्ध असतो. मुलांचा त्यांच्यासाठी अयोग्य असलेल्या गोष्टी बघण्याचा कल मोठ्यांची काळजी वाढावी इतका वाढत चालल्याचं यासंबंधीच्या पाहण्यांमधून आणि सर्वेक्षणातून दिसून आलं आहे. पालकांच्या अपरोक्ष त्यांच्या वयाला अयोग्य असणाऱ्या गोष्टी मुलं टीव्ही आणि मोबाइलवर बघत असतात. हे जेव्हा पालकांसमोर उघड होतं तेव्हा 'आपलं मूल अयोग्य गोष्टी बघूच कसं शकतं?' असं म्हणून पालक हा मुद्दा प्रतिष्ठेचा करतात. पण हा मुद्दा केवळ प्रतिष्ठेचा नसून नको त्या वयात नको त्या गोष्टी बघितल्याचा मुलांवर गंभीर परिणाम होतो हे दिसून आलं आहे. 

त्यामुळे मुलं मोठ्यांसाठीचा कंटेण्ट चोरुन बघतात याकडे दुर्लक्ष करणं आणि जेव्हा कळतं तेव्हा मुलांवर ओरडणं, मारणं, घालून पाडून बोलणं असं आकांडतांडव करणं या दोन्हीही गोष्टी चूकच. त्यापेक्षा आपलं मूल नको त्या गोष्टी पाहातंय का? याकडे लक्ष असणं आणि असं आढळल्यास योग्य ती कृती करणं हे जास्त महत्त्वाचं असतं.

चुकीच्या पाहण्याचा परिणाम काय?

१. मोठ्यांसाठीचा कंटेण्ट किंवा पाॅर्न कंटेण्ट पाहिल्याने मुलांच्या मनात भीती, अपराधभाव निर्माण होतो. त्याचा प्रभाव म्हणून किशोरावस्थेतली मुलं (मुलगे आणि मुली दोन्हीही) धोकादायक लैंगिक वर्तन करण्यास उद्युक्त होतात.

२. पाॅर्न कंटेण्ट सातत्याने पाहिल्याने मुलांच्या मेंदुतला करडा भाग कमी होतो. मुलांचा मेंदू विकसनशील अवस्थेत असतो. अशा परिस्थितीत मुलांनी नको ते पाहिल्याने त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतात, समस्या निर्माण होतात.

मुलं चुकीचं काही पाहताय हे मोठ्यांना कसं कळेल?

आपल्या अपरोक्ष चोरुन नको त्या गोष्टी मुलं पाहात असतील तर त्याकडे लक्ष ठेवणं पालकांसाठी अवघड होतं. मोठ्यांसमोर ते पाहात नसल्याने तू हे का पाहतो/ पाहाते ? असा थेट प्रश्न विचारणं अशक्य होतं. पण केवळ मुलांच्या बदलेल्या वर्तनाकडे लक्ष दिल्यानेही पालकांच्या ते सहज लक्षात येवू शकतं आणि 

मुलं करतात काय?

१. मुलांमध्ये लैंगिक क्रिया आणि लैंगिक अवयव याबद्दलचे अनैसर्गिक कुतुहल वाढलेलं असतं.

२. मुलांना एकांतात राहायला आवडू लागतं. झोप न लागणे किंवा झोपेचे प्रमाण वाढणं. खाण्याच्या सवयी बदलतात.

३. टी.व्ही विशेषत: फोनच्या बाबतीत मुलं गूढ वाटावं असं वर्तन करु लागतात. मोठे आजूबाजूला आल्यावर हातातला फोन घाईघाईने बाजूला ठेवणे, पटापटा बटणं दाबणं, आपल्यासोबत फोनही बाथरुममध्ये नेणं, फोनला लाॅक घालणं या गोष्टी मुलं करु लागतात.

४. आई बाबांनी फोनमध्ये टाकलेले पॅरेण्टल फिल्टर्स / स्क्रीन टाइम ट्रॅकिंग ॲप्स डीलीट करतात.

५. इंटरनेटचा वापर विशेषत: रात्रीच्या वेळेत वाढतो.

६. मुलांमध्ये खूप जास्त राग, भीती, असुरक्षितता या भावना वाढतात.

७. वयाला न शोभणारे शब्द, भाषा वापरली जाते.

८ टीव्ही, इंटरनेट बंद असल्यास अस्वस्थ होतात.

पालक काय करु शकतात? 

१. मुलांशी शांतपणे बोलावं.

२. वयाला अयोग्य अशा गोष्टी पाहाण्यातले धोके, त्यासंबधीचे कायदे याबाबतची जाणीव मुलांना करुन द्यावी.

३. मुलांशी बोलण्यासाठी डाॅक्टर, समुपदेशक, आपले मित्र-मैत्रिण अशा व्यक्तींची मदत घ्यावी.

४. इंटरनेटवर दिसतं म्हणून पाहावंसं वाटतं अशा परिस्थितीत स्वत:वर नियंत्रण किती महत्वाचं असतं , ते कसं ठेवावं याचं कौशल्य मुलांना शिकवणं आवश्यक असतं.

 

(लेखिका बालरोगतज्ज्ञ असून किशोरवयीन मुलांविषयी त्यांचा विशेष अभ्यास आहे.)

vrdesh06@gmail.com

 

मोठ्यांसाठीचा कंटेण्ट पाहणं, त्याबाबतचे परिणाम- उपाय, अधिक वाचा..

https://urjaa.online/why-shouldnt-kids-watch-movies-webseries-meant-for-adults-how-parents-could-interfere-to-stop-this/

टॅग्स :पालकत्वमोबाइलडिजिटलऑनलाइन