Join us  

वयात येणारा मुलगा, ना धड मोठा ना छोटा, त्याच्याशी ‘नाजूक’ विषय कसे-कधी बोलायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2024 4:42 PM

मुलं मस्ती करतात, मुलींना मारतात, दांडगाईही करतात अशावेळी पालकांनी काय करायचं?

ठळक मुद्देमुलींशी बोलताना, वागतानाही त्यांचा आदर करुन वागायला हवं.

हल्ली हार्दिकचा धसमुसळेपणा- आडदांडपणा फारच वाढला होता. आठवीत गेलेला हार्दिक बास्केटबाॅल खेळतो. त्यामुळे हार्दिकची उंची, त्याची ताकद चांगलीच वाढली होती. पण याचं स्वत: हार्दिकला मात्र भानच नव्हतं. त्याचं वागणं तिसरी चौथीत असलेल्या मुलासारखंच होतं. गौरांगीशी म्हणजे लहान बहिणीशीही हार्दिक मस्ती करायचा. येता जाता गौरांगीला टपली मारायला हार्दिकला खूप आवडायचं. पण हार्दिकची ही सवय गौरांगीला अजिबात आवडायची नाही. कधी कधी तर मजेत मारलेली टपलीही गौरांगीला इतकी जोरात लागायची की ती चडफडायची. 'दादा तुझा हात लागतो मला' असं ती त्याला कळवळून सांगायची. पण हार्दिकच्या वागण्यात काही फरक पडायचा नाही. आपल्या शरीराची ताकद वाढली, त्यामुळे इतरांना काही त्रास होत असेल किंवा होईल याची तमा हार्दिक बाळगायचा नाहीच.

हार्दिकचा आडदांडपणा घरी चालून जात होता पण शाळेतही तो तसंच वागायचा. एकदा वर्गात शेजारी बसणाऱ्या शमाशी हार्दिकचं पेनावरुन भांडण झालं. आपण मागत असूनही शमा पेन देत नाही हे बघून हार्दिकने तिचा हात पिरगळून पेन काढून घेतला. तिचा हात दुखायला लागला. तिने वर्गशिक्षिकेकडे हार्दिकची तक्रार केली. तेव्हा हार्दिकच्या निमित्तानं आपण वर्गातल्या सगळ्या मुलींशीच एकदा बोलायला हवं असं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी त्या दिवशी शिकवणं बाजूला ठेवून मुलांशी संवाद साधला.

मुलांना काय सांगायला हवं? - डाॅ. वैशाली देशमुख (टीन एजर मुलांच्या वर्तनाच्या अभ्यासक आणि बालरोग तज्ज्ञ) सांगतात..१.  घरी किंवा शाळेत मुलांनी वागताना जबाबदारीने वागायला हवं. आपल्यामुळे कोणाला त्रास होतोय का याचा विचार करायला हवा. मग ती आई असो, बहिण असो की वर्गमैत्रिण.२. स्पर्शाच्या बाबतीत ही जबाबदारी फार वाढते. समोरच्याची संमती गृहीत धरुन वागणं, त्यांना स्पर्श करणं हे चुकीचंच.३. आपण मोठे होतो आहोत, आपल्यात ताकद आहे म्हणून इतरांना मारणं, बळजबरी पकडणं. त्रास देणं चूक आहे.४. मुलींशी बोलताना, वागतानाही त्यांचा आदर करुन वागायला हवं.

वयात येणाऱ्या मुलांविषयी अधिक माहिती वाचा..https://urjaa.online/boys-should-keep-rules-in-mind-while-behaving-with-others-what-parents-should-talk-with-their-teen-age-boys/

टॅग्स :पालकत्वलहान मुलं