Join us  

आईबाबा, मुलांसाठी एवढं कराल? नुसतं मुलांना रागावून मुलांना चांगल्या सवयी लागत नाहीत कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2024 7:24 PM

मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात असे वाटत असेल तर पालकांनी बदलायला हवे.

-प्रतिभा खंडू बस्ते (शिक्षिका)

शाळा सुरु झाली की, अनेक पालक ठरवतात यावर्षी मुलांकडे सुरुवातीपासून लक्ष द्यायचे, अभ्यास घ्यायचा. तसेच काही मनात असेल तर आईबाबांनी काही गोष्टी मनापासून करायला हव्यात.मुलांमध्ये बदल घडवण्यात वेळ वाया घालू नका. आधी स्वतः बदला. त्यांच्यात बदल हा आपोआप होईल. तो बदल तुम्हाला नक्कीच अनुभवास मिळेल, यात शंका नाही.आईबाबांना काय काय करता येईल पाहा..१) मुलांना चांगल्या सवयी लावताना पालकांनी स्वतःपासून सुरुवात करावी. मुलांमध्ये बदल करताना आधी स्वतः बदलावे. आपल्या मुलांनी रोज सकाळी लवकर उठावे, व्यायाम करावा असे वाटत असेल तर ते स्वत: करावे. कारण मुले अनुकरणप्रिय असतात.२) मुलांना मोबाईलचे व्यसन लागलेले आहे. म्हणून मोबाईल फक्त कामापुरता वापरण्याची सवय आधी स्वतः लावा. मुलांसमोर कमीत कमी मोबाईल बघा. त्याचा परिणाम तुम्हाला काही दिवसांतच दिसून येईल.३) मुलांना व्यायामाबरोबरच योग्य खाण्यापिण्याच्या सवयी देखील फार महत्त्वाच्या आहेत. पालकांनी बाहेरील खाण्यावर नियंत्रण ठेवले तर त्याचा परिणाम हा आपल्या कुटुंबावर आपोआप होताना दिसेल.

४) मुले वयात येताना मुलांचा मानसिक विकास देखील फार महत्त्वाचा असतो. मुलांशी जास्तीत जास्त संवाद वाढवावा. त्यांना जेवढा शक्य होईल तेवढा वेळ द्यायला हवा. काही प्रसंगी त्यांच्यावर न रागावता त्यांना समजून घ्यायला हवे. त्यांच्या हालचाली, वागण्याची पद्धत तसेच त्यांचे मित्रांमधील असणारे वर्तन समजून घ्यावे. शाळेतील शिक्षकांशी नियमित संवाद ठेवा. त्यांच्या मित्रांची चौकशी करा. नावे ठेवू नका, मुलांना प्रश्न न विचारता बोलायचा प्रयत्न करा.५) मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी पालकांनी स्वतः त्यांची शाळेत जाऊन शैक्षणिक प्रगती वेळोवेळी तपासायला हवी. शाळेमध्ये काय शिकविले तसेच त्यांच्या वह्या याबद्दल शिक्षकांकडे त्याचा पाठपुरावा करा. रोज किमान एक तास अभ्यासाचा ठरवून घ्या. त्या नोंदी तुम्ही स्वतः ठेवा. लहान मुलांसाठी वाचन-लेखन या गोष्टींना विशेष महत्त्व द्यायला सांगा. मोठ्या मुलांसाठी त्यांच्या अभ्यासाच्या संकल्पना स्पष्ट होतात का, याकडे विशेष लक्ष द्या. पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांचे गुण म्हणजे त्यांचा संख्यात्मक विकास हा एवढा महत्त्वाचा नसतो जेवढा त्यांच्या विविध संकल्पना त्यांना समजणे हे खूप महत्त्वाचे असते.pratibhabaste1985@gmail.com

टॅग्स :पालकत्वशिक्षणलहान मुलं