पी.व्ही. सुब्रमण्यम
तुम्ही आर्थिक निर्णय मुलांना विचारुन घेता का? तुमच्या आर्थिक निर्णयांवर तुमच्या मुलांच्या मताचा थेट परिणाम होतो का? असा प्रश्न विचारला तर पालक काय उत्तर देतात? अनेक पालक म्हणतात नाही नाही पैशाचं काय कळतं मुलांना? आम्ही कशाला त्यांना व्यवहार सांगू?पण तसं नसतं. प्रत्यक्षात, घरातल्या टूथपेस्टपासून गाडी कोणती घ्यायची, टीव्ही कोणता घ्यायचा या साऱ्या निर्णयावर मुलांची मतं छाप पाडतात. पालकांचं आर्थिक नियोजन ढासळतं. ही गोष्ट इथंच थांबत नाही तर तुमच्या मुलांनाही आर्थिक शिस्त लागत नाही, आर्थिक निर्णय कसे घ्यायचे हे कळत नाही आणि ते पालकांच्या पैशाला ‘किंमत’ देत नाहीत. आणि मग पालक सांगतात की मुलांसाठी कितीही करा मुलांना आपल्या पैशाची किंमतच नाही.
(Image : google)
पालकांना काय करता येईल?
१. एकतर मुलांशी आपल्या घरात दर महिन्याला येणारा पैसा, आपले खर्च याच्याशी मोकळेपणानं बोला. ते म्हणतील त्या वस्तूंवर, त्याक्षणी भरमसाठ खर्च करणं टाळा.२. मुलांनी मागितलं ते आम्ही देतो, दहा रुपयांच्या फुग्याला काय नाही म्हणायचं असं पालक म्हणतात. पण ती सवय लागते, मुलं हा प्रश्नच विचारत नाही की आवडलं केलं खरेदी, त्याचा उपयोग काय, आपला रस त्यात किती टिकणार? आज फुगा मागतात, उद्या गॅजेट मागतात, परवा परदेश प्रवास मागतात. देणार का त्याक्षणी, कुठून आणणार पैसे? त्यापेक्षा ‘नाही’ म्हणा. कारण सांगा, समजावून सांगा. मुलांना वाट पहायला शिकवा.३. इंग्रजीत एक शब्द आहे. ‘डिलेड ग्रॅटीफिकेशन.’ जो संयम शिकवतो. बचत करण्याचं, आपल्याला जी वस्तू हवीच आहे त्यासाठी पैसे वाचवण्याचं महत्व शिकवतं. वस्तूची गरज काय, याचा विचार-पुन:विचार शिकवतो. मुलांनाही कळतं, आपला प्राधान्यक्रम कशाला?४. माझ्या मुलीला दिवाळीत मी समजा ५ हजार रुपये देतो. ते तिचं दिवाळी बजेट. तिनं त्यातून तिला हवा तो, हव्या त्या किमतीचा ड्रेस घ्यावा, फटाके घ्यावेत, दागिने घ्यावे, हॉटेलिंग करावं, किंवा भविष्यात मोठं गॅजेट घ्यायचं तर त्यातून काही पैसे बचत करावेत. तिचा प्रश्न. बजेट तेवढंच. मुलं स्मार्ट असतात. निर्णय घ्यायची संधी दिली की, ते शिकतात. बजेटमध्ये भागवा, हे प्रशिक्षण असं करता येतं.५. मुलांना ‘बजेट’ शिकवा, त्यांना करु द्या दर महिन्याचं घराचं बजेट. अगदी एसआयपी, म्युच्युअल फंडही शिकवा. वयाच्या ९ व्या वर्षपासूनच्या मुलांना हे सारं जमतं. तुम्ही तुमच्या पैशाची किंमत करा, मुलं आपोआप करतील.
(लेखक आर्थिक सल्लागार आहेत.)