Join us  

HSC Result 2022 : मुलांचा बारावीचा निकाल लागल्यावर पालकांनी कसं वागू नये? लक्षात ठेवा ४ गोष्टी; सोडा अतीकाळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2022 6:12 PM

HSC Result 2022 : अतीकाळजी करण्यापेक्षा मुलांच्या आवडीचा, भविष्याचा आणि योग्य त्या करिअरचा विचार करा

ठळक मुद्देइतर मुलांशी नकळत आपल्या पाल्याची तुलना केली जाते, मात्र असे होता कामा नये.परिक्षेच्या वेळी किंवा वर्षभर त्यांना अभ्यास करायला लावणे ठिक आहे पण निकालाच्या वेळी आपल्या अपेक्षा बोलून दाखवणे मुलांना खचवणारे ठरु शकते. 

बारावीचा निकाल उद्यावर आला असल्याने बारावीला असलेल्या मुलांची आणि त्यांच्या पालकांची चिंता काही प्रमाणात वाढल्याचे चित्र घरोघरी असेल (HSC Result 2022). दहावी आणि बारावी हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे असल्याने या वर्गात आपल्याला किती मार्क मिळतात यावर आपल्या करिअरची दिशा निश्चित होणार असते. हे जरी खरे असले तरी या निकालाचा प्रमाणापेक्षा जास्त ताण घेणे, त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडवणे यांची आवश्यकता नाही. आपल्या मुलाची बुद्धिमत्ता, त्याने घेतलेले कष्ट यावर त्याला मिळणारे गुण अवलंबून असतात. त्यामुळे या निकालाचा जास्त बाऊ न करता त्याला सामोरे जाणे गरजेचे आहे. यासाठी पालकांना काही गोष्टी स्पष्ट असणे आवश्यक आहे (Parenting Tips). त्यामुळे तुमचा मुलगा किंवा मुलगी बारावीला असेल तर तुम्ही उद्याच्या निकालाचा कशाप्रकारे सामना कराल याविषयी....

(Image : Google)

१. आपल्या मुलाचा जो निकाल लागणार आहे तोच लागणार आहे. त्यामुळे त्याला आधीपासून त्याचा ताण आला असेल तर तो येऊ नये यादृष्टीने प्रयत्न करणे. यासाठी मुलांशी आधीपासूनच संवाद साधणे, त्यांच्यासोबत रिझल्ट सोडून वेगळ्या विषयांवर गप्पा मारणे आवश्यक आहे. तसेच मुलाला जास्तच ताण आला असल्यास त्याला फिरायला नेणे, आवडीचे खायला देणे या गोष्टी पालकांनी आवर्जून कराव्यात.

२. बारावीचा निकाल हा मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असला तरी हाच एकमेव टप्पा आहे असे नाही. त्यामुळे आता कमी गुण मिळाले तरी खचून न जाता पुढे नक्की यश मिळेल याची खात्री मुलांना देणे ही पालकांसाठी महत्त्वाची भूमिका असू शकते. अनेकदा पालक गुणांबाबत जास्त कठोर असतील तर मुले कमी गुण मिळाल्यावर घाबरुन चुकीचे पाऊल उचलण्याची शक्यता असते. असे होऊ नये यासाठी पालकांनी मुलांशी मोकळा संवाद ठेवायला हवा. 

३. जास्त मार्क मिळण्याची पालकांची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. पण आपल्या मुलाची बुद्धिमत्ता, तो घेत असलेले कष्ट यांचा पालकांना अंदाज असल्याने त्यांवी अवाजवी अपेक्षा न करता आपल्या मुलाच्या गुणवत्तेचा विचार करुनच मुलांकडून अपेक्षा ठेवायला हव्यात. अन्यथा मुलांवर त्याचे दडपण येऊन मुले मानसिकरित्या खचू शकतात. तसेच परिक्षेच्या वेळी किंवा वर्षभर त्यांना अभ्यास करायला लावणे ठिक आहे पण निकालाच्या वेळी आपल्या अपेक्षा बोलून दाखवणे मुलांना खचवणारे ठरु शकते. 

(Image : Google)

४. याबाबत प्रसिद्ध मेंदू अभ्यासक डॉ. श्रुती पानसे म्हणाल्या, मुलांच्या निकालाबाबत आधीपेक्षा आता पालकांची मानसिकता बरीच बदलली आहे. पण आपल्या मुलाचा निकाल इतरांना सांगायची वेळ येते तेव्हा तो कमी असला तर मात्र पालक दु:खी होतात. इतर मुलांशी नकळत आपल्या पाल्याची तुलना केली जाते, मात्र असे होता कामा नये. कोरोनाच्या काळामुळे गेल्या २ वर्षात बरीच सूट मिळाली आहे. त्यामुळे मुलांना घरुन अभ्यास केल्याने मार्क कमी असतील किंवा कदाचित अपेक्षेपेक्षा जास्त असतील तरी त्यांचा कल लक्षात घेऊन मगच पुढच्या करिअरची दिशा ठरवायला हवी. 

टॅग्स :पालकत्व12वी परीक्षापरिणाम दिवस