सुपरस्टार अमिताब बच्चन यांना बॉलीवूडमध्ये नेहमीच एक आदर्श पिता म्हणून ओळखलं जातं. मुलांचा सांभाळ करताना, त्यांना वाढवताना पालक अगणित गोष्टी करतात. तसंच एक पिता, एक पालक म्हणून अमिताभ बच्चन यांनीही केलं. मुलांची आवडनिवड जोपासत त्यांना त्यांच्या क्षेत्रात करिअर करू दिलं. एक खंबीर पिता म्हणून ते कायमच मुलांच्या पाठीशी उभे राहत आले आणि आजही राहतात. मग असं सगळं करूनही अशी कोणती गोष्ट आहे, जी मुलांच्या बाबतीत करण्यात आपण कमी पडलो, याची सल बिग बींच्या मनात अजूनही आहे?
कौन बनेगा करोडपती या अमिताभजींच्या कार्यक्रमाचा तेरावा भाग सध्या सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी काही दिवसांपूर्वी एका गोष्टीचा खुलासा केला होता. आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अमिताभ खूपच कमी आणि मोजकं बोलतात. परंतू जे बोलतात ते खरोखरंच खूप महत्त्वाचं असतं. असंच एक विधान त्यांनी काही दिवसांपूर्वी केलं असून आज नोकरी, व्यवसाय यामध्ये व्यस्त असणाऱ्या प्रत्येक पालकाला ते लागू होणारं आहे. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी गुजरातच्या डान्सर नम्रता शाह आल्या होत्या. कार्यक्रमाच्या रुपरेषेनुसार हॉट सीटवर बसणाऱ्या व्यक्तीला अमिताभ प्रश्न विचारतात. पण यावेळी थोडा बदल झाला आणि नम्रता शाह यांनी अमिताभ यांना प्रश्न विचारला.
यावेळी एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की... मुलांना त्यांच्या लहानपणी आपण योग्य वेळ देऊ शकलो नाही याची आजही खंत वाटते. अमिताभ म्हणतात "वो एक हमको हमेशा दुख रहा है, की सुबह जब काम पे जाते थे तो बच्चे सो रहे होते थे, और जब कामसे वापस आते थे, तोह फिर बच्चे सोये हुये ही रेहते थे... क्यूंकी काम खतम करके रात को देर से आते थे.. उस समय इस बात का कष्ट होता था, मगर अब सब समझदार हो गये है ...." अमिताभ बच्चन यांचं हे विधान सोशल मिडियावर चांगलच व्हायरल झालं आहे. कारण आजच्या पिढीचा प्रत्येक पालक ते अमिताभ यांचं वाक्य स्वत:च्या आयुष्याशी जोडू पाहतो आहे.
तुम्हालाही अमिताभ यांच्यासारखंच दु:ख होत असेल तर....
पुर्वी वडील काम करायचे आणि आई घर सांभाळायची. हे जवळपास प्रत्येक घरातच होतं. पण आजच्या काळात हे खरोखरंच अशक्य आहे. संसाराच्या गरजा, मुलांच्या अपेक्षा आणि स्टेटस सिंबाॅलच्या नावाखाली जपाव्या लागणाऱ्या काही गोष्टी, यामुळे आज वडीलांच्या बरोबरीने आईलाही पळावं लागत आहे. अशावेळी आपण मुलांना वेळ देऊ शकत नाही, ही गोष्ट अनेक पालकांना छळते. असा विचार मनात येऊन फ्रस्ट्रेट होणारेही अनेक पालक आहेत. तुमच्याही मनात अशी काही शंका येत असल्यास सगळ्यात आधी मनातले सगळे विचार शांत करा. आपण हे मुलांसाठी आणि त्यांच्या- तुमच्या चांगल्या भविष्यासाठीच करतो आहोत हे लक्षात घ्या.
आपण नोकरी करतो आहोत म्हणून आपल्या मुलांना त्याचा कसा फायदा होतो आहे आणि आपण नोकरी केली नसती, तर घरात कशी परिस्थिती असली असती, याचा विचार करा. असे विचार डोक्यात येताच मनातला गोंधळ कमी होईल. नोकरी करणाऱ्या प्रत्येक आईच्या आयुष्यात हा टप्पा येतो. पण त्याच वळणावर खंबीर राहणं गरजेचं असतं. नोकरी व्यतिरिक्त उरणारा वेळ संपूर्णपणे मुलांसाठी राखून ठेवा. त्यांच्याशी बोला, सारखा संवाद साधा. त्यांना एकटं वाटत नाही ना, याची काळजी घ्या. त्यांना काय सांगायचं आहे, ते शांत मनाने ऐकून घ्या. त्यांची निरर्थक बडबड ऐकून चिडू नका. घरी असताना मन आणि शरीर दोन्हीने मुलांसोबत थांबा. तरंच तुम्ही त्यांच्यासोबत क्वालिटी टाईम घालविता आहात, असं म्हणता येईल.