घरात लहान मूल असणं आणि त्यामुळे आपल्या आयुष्याचे काय होते हे लहान मूल असलेल्यांना सांगायला नको. आई म्हणून लहान मुलांचा सांभाळ करताना होणारी तारांबळ महिला वर्गासाठी नवीन नाही. पण हेच मूल नसेल तर आपण कसे आयुष्य जगू शकतो याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लहान मूल असताना आपल्याला आई म्हणून घरात काहीच करता येत नाही. एकाजागी बसून धड दोन घास सुखानी खाता येत नाहीत की स्वत:चं आवरता येत नाही. त्यामुळसे मूल नको असं म्हणणाऱ्या तरुण कपल्सची संख्या पाश्चिमात्य देशांमध्ये वेगाने वाढताना दिसत आहे. पण मूल नसले की मात्र आपण मनसोक्तपणे या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो हे सांगण्याचा प्रयत्न टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून अॅली होफ बर्कले हिने केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला असून त्यावर बरेच पालक आणि मुलांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
मूल नसले की आपण थोडे तरी निवांत झोपू शकतो, शांतपणे कॉफी घेऊ शकतो. इतकेच नाही तर आपल्याला आपल्या आवडीचे कार्टूनही बघता येऊ शकते. मूल नसेल तर आपण ब्रंच करायला विसरत नाही, कारण आपला वेळ हा पूर्णपणे आपला असतो. म्हणजे एकूणच लहान मूल सोबत असताना आपले आयुष्य कशापद्धतीचे असते हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न या महिलेने केलेला आहे. अॅली हिने या व्हिडिओचा दुसरा भाग आता पोस्ट केला असून आतापर्यंत ९ लाख जाणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. पहिल्या भागातही तिने मूल घरात नसताना तुम्ही कोणत्या गोष्टी घरात ठेऊ शकता असा व्हिडिओ केला होता. तो व्हिडिओही असंख्य जणांनी पाहिला होता.
आपल्याला मूल नको असणे हा पूर्णपणे आपला निर्णय आहे. त्यामुळे पालकांचा आणि समाजाचा याला विरोध असला तरी मूल नको असणे हा जोडीदारापैकी दोघांनी मिळून घेतलेला निर्णय असतो असे ती पुढे म्हणाली. पाश्चिमात्य देशांत अशाप्रकाचे मत असलेली असंख्य जोडपी सोबत राहत असून त्यात काहीच गैर नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अशा बाबतीत सुरुवातीला पालकांकडून वारंवार विचारणा होते किंवा समाजातही याबाबत चर्चा होते पण आपल्याला मूल हवे की नको हा पूर्णपणे आपला निर्णय आहे आणि त्य़ाचे आपल्याला स्वातंत्र्य आहे असे अॅली म्हणाली. टिकटॉकला भारतात बंदी असल्याने आपल्याकडे हा व्हिडिओ दिसू शकत नाही.