Join us  

मुलं ऐकतच नाहीत म्हणून तुम्हीही वैतागलात? करा फक्त १ गोष्ट, मुलं तुमचं नक्की ऐकतील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2024 1:34 PM

If child is not listening to parents do only one thing Parenting tips : आपण म्हटलेलं त्यांनी ऐकावं असं वाटत असेल तर..

आपल्या मुलांनी आपण म्हणू ते सगळं ऐकलं पाहिजे अशी आपली अपेक्षा असते. पण मुलं बरेचदा हट्टीपणा करतात नाहीतर त्यांना त्यांचंच खरं करायचं असतं आणि आपण म्हणू ते अजिबात ऐकायचं नसतं. पालक म्हणून आपण मुलांच्या फायद्याच्याच गोष्टी त्यांना वारंवार सांगत असतो आणि त्या त्यांनी ऐकल्या तर त्यात त्यांचाच फायदा आहे असे आपल्याला वाटत असते. पण मुलं आपलं ऐकत नाहीत आणि मग आपला पारा चढतो. मुलांनी आपण म्हटलेलं ऐकलं नाही आणि त्यांच्याच मनाप्रमाणे काही केले की आपल्याला राग येतो (If child is not listening to parents do only one thing Parenting tips). 

हा राग काहीवेळा इतका जास्त असतो की आपण मुलांवर ओरडतो, प्रसंगी हातही उचलतो. पण याचा उलटा परीणाम होतो आणि मुलं आपलं जास्त ऐकेनाशी होतात. वय वाढतं तशी मुलांची आपली मतं तयार होतात आणि त्याप्रमाणेच त्यांना वागायाचं असतं. पण आई-वडील आपल्या फायद्याचं सांगतात, त्यामुळे आपला फायदा होणार आहे हे मुलांना पटवून द्यायचं असेल आणि आपण म्हटलेलं त्यांनी ऐकावं असं वाटत असेल तर पालक म्हणून काही गोष्टींकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला हवे.  

पालक म्हणून १ गोष्ट करायलाच हवी...

आपण पालक म्हणून मुलांना अनेकदा सतत करेक्ट करायला जातो. सतत असं करु नको, तसं करु नको, असं कर अशा सूचना केल्याने मुलं आपल्या सूचनांना वैतागतात. सततच्या सुचनांमुळे मुलं इरीटेट होतात आणि एका मर्यादेनंतर मुलं आपलं ऐकेनासे होतात. बरेचदा आपण मुलांवर त्यांच्या वागण्याबद्दल नकळत आरोप करत राहतो. तू असं का वागला, तसं का केलं, हे इथेच का ठेवलं असे प्रश्न विचारतो. 

यामुळे मुलं एकाएकी शांत होतात आणि कालांतराने आपण त्यांना काय सांगतो याकडे ते दुर्लक्ष करायला लागतात. यावर उपाय म्हणजे त्यांना सतत करेक्ट करायला जाऊ नका. ज्या गोष्टींमुळे कोणालाही काही त्रास होत नाही अशा ठिकाणी त्यांना जे करायचे ते त्यांना करु द्यायला हवे. म्हणजे जिथे खरंच आवश्यक आहे तिथे मुलं आपलं नक्की ऐकतील. मुलांचं वेगळेपण, वागणं काही बाबतीत आपण मान्य केलं तर नकळत काही गोष्टी ते आपल्या नक्की ऐकतील.    

टॅग्स :पालकत्वलहान मुलं