Join us  

मुलांना मोबाइलचं व्यसन लागलं, तर ते सुटण्यासाठी पालकांनी काय करावं? कसा सुटेल मोबाइल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 1:45 PM

पालक मुलांच्या हातात मोबाइल देतात, मग त्यांना व्यसन लागतं, ते व्यसन मग सोडवणार कसं?

ठळक मुद्देआधी पालकांनी मुलांसमोर ऑनलाइन गेम खेळणं बंद करावं. ऑनलाइन गेमिंगच्या बाबत मुलांना कंट्रोल करणं हे एका विशिष्ट वयापर्यंतच शक्य होतं. मुलांचं अति ऑनलाइन गेम खेळणं हा आता केवळ एका मुलाचा किंवा काही पालकांचा प्रश्न नाहीये. या प्रश्नाचं आव्हान जवळजवळ सर्वांसमोरच आहे.

-डॉ. श्रुती पानसे, (मेंदू आणि शिक्षण तज्ज्ञ)

मुलं तासंतास मोबाइल खेळतात. मुलांना मोबाइलचं व्यसन लागतं. चीनने तर आता त्यावर वेळ मर्यादा घातली. आपल्याकडेही चित्र तेच आहे.पालकही म्हणतात, त्रास देऊ नकोस. बस एका जागी हे घेऊन. लहान बाळांनाही मोबाइल दाखवत जेवू घालतात. म्हणतात नाही तर खातच नाही, मोबाइल पाहताना निदान पोटभर खातं तरी मूल. त्यातून मुलांना मोबाइल आणि गेम्सचं व्यसन लागतं हे लक्षातही येत नाही.पालकांना दोष देण्याचं कारण नाही, पण पालक यातून काय मार्ग काढू शकतात, हे पाहू..

पालक काय करु शकतात?

१. मुलांच्या ऑनलाइन गेमिंगचं प्रमाण कमी करण्यासाठी पालकांनी काय करायला हवं असा प्रश्न कायम विचारला जातो, त्यावर माझं एकच उत्तर असतं ते म्हणजे आधी पालकांनी मुलांसमोर ऑनलाइन गेम खेळणं बंद करावं. खूपसे पालक हल्ली ऑनलाइन गेम खेळतात, मोबाइलवर गेम खेळतात.त्याच्यावर आपल्या मित्र मैत्रिणींशी चर्चा करतात, अमूक तमूक लेव्हल पार केल्याचे स्टेटस टाकतात. पहिलं पालकांनी हे करु नये. कारण पालक काय करतात ते बघून मुलंही तेच करतात, मग मुलांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही.

२. मुलं जेव्हा पहिल्यांदाच गेमिंग खेळायला सुरुवात करतात तेव्हा तिथेच मुलांना 'नाही खेळायचं' हे ठामपणे सांगणं आवश्यक आहे. जाऊ दे , खेळू दे ही भूमिका घेणं, आपण कामात असतो म्हणून मुलांना अमूक गेम डाऊनलोड करुन थोडा वेळ खेळ असं म्हणणं.. हे आधी थांबवायला हवं. कारण  मोबाइल आणि त्यावरचे ऑनलाइन गेम  नुसतं खेळणं नाहीये. तर ही व्यसनाधिनता आहे. म्हणजे खेळायला आवडतं, खेळतोचये ना, त्यात काय झालं असं म्हणण्यासारखं हे नाहीये. हा व्यसनाचा ट्रॅप आहे.

छायाचित्र:- गुगल 

३. चीननं जी ऑनलाइन गेमिंगच्या बाबत भूमिका घेतली आहे ती हाच मुद्दा अंडरलाइन करत आहे. खेळणं आणि मोबाइलवरील गेम याची तुलना होणं शक्यच नाही. त्यामुळे मुलं या ऑनलाइन गेमिंगच्या ट्रॅपमधे अडकण्यापूर्वीच सुरुवातीलाच त्यांना नाही म्हणणं हेच योग्य.

४. विशिष्ट वेळ ठरवून देणं हे यासाठीचं योग्य पाऊल आहे. म्हणजे केवळ ऑनलाइन गेमिंगच्या बाबतच नाही तर अशा गोष्टी ज्यांचा वाईट परिणाम मुलांवर होण्याची शक्यता असते त्या प्रत्येक गोष्टीबाबत मुलांना वेळ ठरवून द्यायला हवी. त्यामुळे मुलांना किमान एवढं तरी कळेल की आपण ज्याचा हट्ट करतोय ती गोष्ट चुकीची आहे, ज्या अर्थी हे करायला परवानगी लागते, विशिष्ट वेळ ठरवून दिली जाते त्या अर्थी ही गोष्ट वाईट आहे हे किमान मुलांच्या मनावर ठसतं तरी.

छायाचित्र:- गुगल 

५. प्रश्न एकट्याचा नाही, प्रयत्न सामुहिक हवेत!ऑनलाइन गेमिंगच्या बाबत मुलांना कंट्रोल करणं हे एका विशिष्ट वयापर्यंतच शक्य होतं. सहा सात वर्षांच्या मुलांवर बंधनांचा परिणाम होतो. पण दहा वर्षापुढील मुलं, सोळा सतरा वर्षांची मुलं त्यांच्यावर बंधनांचा परिणाम होत नाही. इथे केवळ पालकांना मनस्ताप, त्रास होण्याचीच शक्यता जास्त. खरंतर मुलांचं अति ऑनलाइन गेम खेळणं हा आता केवळ एका मुलाचा किंवा काही पालकांचा प्रश्न नाहीये. या प्रश्नाचं आव्हान जवळजवळ सर्वांसमोरच आहे. तसेच हा प्रश्न एकट्या दुकट्या पालकांनी प्रयत्न करुन सुटणारा नाही. एका विशिष्ट वयोगटापर्यंत मुलांना ऑनलाइन गेम खेळण्याचा दिवस ठरवून देणं, वेळेचं बंधन घालणं हे उपाय काम करतात पण दहा अकरा वर्षानंतर हे उपाय काम करेनासे होतात. मुलं त्यांचे त्यांचे गेम डाऊनलोड करुन खेळतात. पालकांनी ते सतत डिलिट करत राहाणे हा पर्याय आहे. पण यात मनस्तापच खूप आहे.

६. ऑनलाइन गेम आणि त्याचं मुलांमधलं व्यसन या प्रश्नाची व्यापकता बघता अनेक पालकांनी एकत्र येऊन मुलांशी बोलणं, मुलांवर ज्यांच्या बोलण्याचा प्रभाव पडेल त्यांच्या माध्यमातून मुलांचं समुपदेशन करणं. असे सामुहिक प्रयत्न करणं हाच यावरील मार्ग आहे.

(मुलाखत आणि शब्दांकन -माधुरी पेठकर)