Join us  

अभ्यास कर चॉकलेट देईन असं म्हणत तुम्ही मुलांना आमिष दाखवता ? पालकांसाठी ही सवय घातक कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2023 7:53 PM

If You Also Get Children To Do Work By Luring Them With Chocolates Or Toys Then Be Careful : हे कर ते देईन म्हणत जर मुलांना तुम्ही कामाला लावत असाल तर मुलं तुम्हाला ब्लॅकमेल करतील आणि..

"तू आधी अभ्यास पूर्ण केला तरच मी तुला चॉकलेट देईन... " "माझं एक काम केलंस तर मी तुला हवं ते गिफ्ट देईन..." "अभ्यास छान केलास तर तुला हवं ते खेळणं विकत घेऊन देईन... " असे संवाद आपण बऱ्याचदा प्रत्येक घराघरात ऐकत असतो. काही घरात तर हे संवाद इतके कॉमन झाले आहेत की उठता - बसता मुलांना एखादे काम करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे आमिष पालकांकडून दिले जाते. अशावेळी मुले आपल्याला काहीतरी मिळणार आहे या आशेने ते काम पूर्ण करतात. परंतु मुलांना असे आमिष दाखवून काम करायला लावणे हे कितपत योग्य आहे ? याचा पालक म्हणून आपण विचार करणे अतिशय महत्वाचे असते. 

काहीवेळा मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी असे आमिष देणे काही अंशी योग्य आहे. परंतु रोज छोट्या - छोट्या गोष्टींवरून मुलांना पालकांनी असे आमिष देणं योग्य नाही. यामुळे मुलांना लहानपणातच काही वाईट सवयी लागू शकतात. मात्र ही सवय वेळीच खोडून काढली नाही तर ती तशीच राहते आणि भविष्यात वाढत जाते. पण म्हणून मुलांना कोणतेही छोटे - मोठे काम पूर्ण करण्यासाठी कोणत्याही गोष्टीचे सतत आमिष दाखवणे चुकीचे ठरु शकते. तर पालक म्हणून आपणच आपल्या वागण्यात थोडा बदल केला तर त्याने ही समस्या नक्कीच दूर होऊ शकते(If You Also Get Children To Do Work By Luring Them With Chocolates Or Toys Then Be Careful).

मुलांना कोणत्याही प्रकारचे आमिष न दाखवता काम करून घेण्यासाठी...  

१. मुलांना लोभीपणाची वाईट सवय लागू शकते :- एखादे काम करण्याच्या बदल्यात तुला काहीतरी दिले जाईल असे मुलांना सांगणेच मुळात चुकीचे आहे. अशा गोष्टीमुळे आपण नकळतपणे मुलांना कसले ना कसले आमिष दाखवत असतो. यातून मुलानांच्या मनात लहानपणापासूनच लोभी वृत्तीची वाढ होते. त्यांच्यातील लोभीपणा वाढून त्यांना अनेक वाईट सवयी लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. आपण मुलांना चॉकलेट किंवा त्यांच्या आवडत्या इतर गोष्टींचे आमिष दाखवून काम करवून घेऊ शकता. परंतु यामुळे मुलांच्या मनात काहीही करण्याआधी त्यांना काहीतरी मिळावे अशी अपेक्षा तयार असते. ते न मिळाल्यावर ते काम न करण्याचा हट्ट धरतात, म्हणून पालक त्यांना जबरदस्तीने काही ना काही देतात. हे चक्र असेच चालत राहून अशा प्रकारे ते कधीही न संपणारे व्यसन बनते.

काहीही केलं तरी मुले पालेभाज्या खातच नाहीत? ६ उपाय, पालेभाज्याही खातील आवडीने...

२. मुलं मोठी झाल्यावर देखील हीच सवय लागते :- ज्या मुलांना लहानपणी अशा वेगवगेळ्या गोष्टींचे आमिष दाखवून काम करवून घेतले जाते, ती मुलं मोठी झाल्यावरदेखील त्यांना हीच सवय लागते. अशी मुलं मोठी झाल्यावर जेव्हा त्यांना त्यांच्या आयुष्यात कोणत्याही कामाचे फळं मिळत नाही, किंवा कामाचा योग्य मोबदला मिळत नाही तेव्हा ते अतिशय नाराज होतात. यामुळे सतत अपयश येऊन आपल्यासोबत नेहमी काहीतरी चुकीचेच होत असे असा विचार त्यांच्या मनात येतो. कोणतेही काम करताना ते निस्वार्थपणे कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे पूर्ण केले पाहिजे, हा विचार लहानपणीच त्यांच्या मनात पालकांनी रुजवला पाहिजे. 

मुलांच्या हातातला मोबाइल कसा काढणार? ८ टिप्स - मोबाइलशिवाय मुले जेवत झोपत नाही ही तक्रार संपेल...

३. लोभीपणा आणि बक्षीस यातील फरक समजून घ्यावा :- जेव्हा आपण एखादी चांगली सवय लावण्यासाठी मुलांना बक्षीस देतो तेव्हा ते फायदेशीर ठरु शकते. जसे की, मुलांनी स्वतःचे जेवण स्वतःच्या हातांनी संपवले किंवा स्वतःचे कपडे स्वतःच घडी करून कपाटात ठेवले, अशा गोष्टी केल्यावर त्यांना बक्षिस देणे योग्य आहे. अशा चांगल्या गोष्टींसाठी बक्षीस देणे योग्य आहे. एखादे चांगले काम पूर्ण केल्यावर बक्षीस देणे ही वेगळी गोष्ट आहे. एखादे चांगले काम पूर्ण केल्यावर मुलांना बक्षीस देण्याने मुलं ते लक्षात ठेवून, एका ठराविक काळानंतर मुलं ती चांगली सवय आपल्या अंगवळणी पाडून घेतात, व कोणत्याही अपेक्षेशिवाय  स्वतःच करायला लागतात. याउलट जर मुलं पार्कमधन घरी न येण्यासाठी हट्ट करत असतील किंवा अभ्यास पूर्ण करण्यासाठी आधी काहीतरी मागत असतील तर अशावेळी त्यांचा हट्ट पुरवणे किंवा त्यांना बक्षीस देणे चुकीचे ठरु शकते. मुलांना चुकीचे वागण्यापासून रोखण्यासाठी आणि तुमच्याशी सहमत होण्यासाठी दिलेले आमिष चुकीचे आहे. मुलालाही याची सवय होते आणि मग तो आपली प्रत्येक चुकीची गोष्ट पटवून देण्यासाठी हट्टीपणा आणि लालसेचा आधार घेतो.

आईबाबा ऑफिसात आणि वयात येणारी मुलं घरी एकटीच? ४ गोष्टी मुलांना सांगा, नाहीतर होते गडबड

४. या वाईट सवयींपासून मुलांना दूर ठेवा :- बहुतांश पालक आपल्या मुलांना सांगतात की, त्यांनी चुकीचे काम केले नाही तर त्यांना काहीतरी बक्षीस मिळेल. यामुळे त्यांना चुकीची कामे करण्याचे निमित्तच मिळते. काही काळानंतर, ते सहजपणे तुम्हाला तुमच्याच शब्दात अडकवू शकतात आणि म्हणू शकतात की मला काहीही मिळाले नाही, म्हणूनच मी हे चुकीचे काम केले. त्यामुळे या वाईट सवयींपासून मुलांना दूर ठेवा.

"आई, मला काहीतरी गोड खायला दे !" असा धोशा मुलं सतत तुमच्यामागे लावतात ? ५ सोप्या टिप्स...

टॅग्स :पालकत्व