Join us  

फटाके फोडताना भाजले तर चटकन करा २ उपाय, लहान मुलांना सांभाळा काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2022 7:33 PM

Firecrackers Diiwali Remedies या दिवाळीत फटाके वाजवताना काही गोष्टींची घ्या विशेष काळजी, मुलांनाही विशेष सल्ला द्या आणि या टिप्स पाळा

दिवाळीत अनेकांना फटाके फोडण्याचा मोह आवरत नाही. लहानग्या ते थोरामोठ्यांपर्यंत सगळे जणं फटाके फोडताना दिसून येतात. मात्र, हे फटाके फोडत असताना अनेकांना इजा होण्याची दाट शक्यता निर्माण होते. दिवाळीत फटाके वाजवताना होणार्‍या जखमा कधी कधी जीवघेण्या ठरतात. दरम्यान, हे अपघात टाळण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. चला तर मग फटाके फोडण्याच्यावेळी घ्यावयाची काळजी आणि इजा झाल्यास काय करावे याची थोडक्यात माहिती घेऊयात.

फटाके पेटवताना कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास प्रथम इजा झालेली जागा पाण्याखाली धुवावे. यासाठी थंड पाणी किंवा बर्फ वापरू नका.

घरी कोणतेही प्रयोग न करता थेट डॉक्टरांची मदत घेणे चांगले. त्या जखमेवर कोणतीही वस्तू किंवा पेस्ट लावू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेणे.

फटाक्यांमुळे होणारी इजा किंवा इतर कोणत्याही प्रकारे आगीमुळे झालेली इजा यामध्ये फरक आहे, त्यामुळे मोठी दुर्घटना घडल्यास थेट तज्ञ म्हणजेच प्लास्टिक सर्जनकडे जाणे चांगले.

फटाके वाजवताना टाईट किंवा सैल कपडे घालणे, दुपट्टा किंवा साडी नेसून फटाके पेटवू नका. यावेळी सुती कपडे घालणे चांगले. ते शरीराला चिकटत नाहीत, तर सिंथेटिक फॅब्रिक्स त्वचेला चिकटतात. अपघातानंतर जळलेली जागा स्वच्छ सुती कापडाने झाकून डॉक्टरांकडे जा. उघडे ठेवू नका.

फटाके वाजवताना नेहमी पाण्याची बाटली सोबत ठेवा. कपड्यांना आग लागली तर पळून जाऊ नका तर लगेच कपडे काढा आणि जळलेल्या जागेवर 15 मिनिटे सतत पाणी टाका.

मुलांना कधीही एकटे फटाके फोडू देऊ नका. फटाके वाजवताना कोणीतरी वडीलधारी व्यक्ती सोबत असणे गरजेचं.

फटाके पेटवताना केवळ तुमच्या स्वतःच्या सुरक्षेचीच नव्हे तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या सुरक्षिततेचीही पूर्ण काळजी घ्या.

टॅग्स :पालकत्वदिवाळी 2022