Join us  

मुले सतत चिडचिड करतात, अस्वस्थ असतात? करा फक्त १ गोष्ट, मुले होतील आनंदी - स्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2023 9:40 AM

If you want your child less aggressive and calm just do 1 thing and see the difference : मुलांचा त्रागा, चिडचिड कमी होण्यासाठी पालकांनी करायला हवा सोपा उपाय...

लहान मुलांना सांभाळणं म्हणजे त्यांचे आवरणे आणि त्यांना खायला प्यायला घालणे इतकेच नाही. तर वयानुसार मुलांच्या भावना, मानसिकता समजून घेणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. काही वेळा विशेष काही झालेले नसताना मुलं अचानक खूप चिडचिड करतात. लहान सहान गोष्टींवरुन आरडाओरडा करतात आणि अॅग्रेसिव्ह वागतात. काहीवेळा रागाच्या भरात ते वस्तू फेकतात, हात उगारतात आणि आक्रस्ताळेपणाही करतात. ते असे करण्यामागे नेमके कारण काय हे आपल्याला त्यावेळी कळत नाही पण नंतर शांतपणे त्यांना विचारल्यावर किंवा इतर गोष्टींमधून त्यांच्या अशा वागण्यामागचे कारण आपल्या लक्षात येते.  मुलांनी नेहमी शांत राहावे, सगळ्यांशी नीट बोलावे यासाठी पालक म्हणून आपण कायम प्रयत्न करत असतो. पण तरीही मुलं असं करत असतील तर त्यामागे एक महत्त्वाचे कारण असण्याची शक्यता असते. ते कारण कोणते हे सांगताहेत समुपदेशक प्रिती वैष्णवी (If you want your child less aggressive and calm just do 1  thing and see the difference) ...

या गोष्टीकडे लक्ष द्यायलाच हवे...

मुलं जेव्हा खात असतात तेव्हा त्यांच्या आजुबाजूला कसे वातावरण आहे याकडे पालकांनी बारकाईने लक्ष द्यायला हवे. जसे अन्न तसे मन असे आपल्याकडे म्हटले गेले आहे. त्यामुळे आपण जे खातो आणि ते खाताना आपल्या भावना, मानसिक अवस्था जशी असते ती आपल्या शरीरावर, मनावर परीणाम करत असते. त्यामुळे मुलं खाताना जो विचार करतात तो त्यांच्या शरीरात उतरत असतो. बरेचदा मुलांनी खावे म्हणून पालक त्यांना मोबाइल किंवा टीव्हीवर कार्टून किंवा गाणी लावून देतात. पण त्यामुळे मोबाइलमध्ये असलेले व्हायब्रेशन्स आणि रेडीएशन्स खाण्यासोबत मुलांच्या शरीरात जातात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते जे काही पाहत आहेत त्यातील पात्र कशी आहेत हे लक्षात घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण ती पात्रे खूप दंगा करत असतील, उड्या मारत असतील तर मुलांच्या आतही त्याच प्रकारची व्हायब्रेशन्स जातील. 

त्यामुळे मूल काहीही खात असेल तेव्हा त्याच्या आजुबाजूला सकारात्मक आणि शांत वातावरण ठेवायला हवे. मोबाइलपेक्षा त्यांच्यासोबत बसून चित्रांची पुस्तके दाखवणे, गोष्टी सांगणे, गोष्टी पुस्तकातून वाचून दाखवणे या गोष्टी केल्यास त्याचा नक्कीच चांगला उपयोग होतो. याशिवाय खाताना मुलांसोबत कोणत्याही विषयावर गप्पा मारणे हाही चांगला पर्याय असू शकतो. अशाप्रकारे शांत वातावऱण ठेवल्यास मुलांच्या वागणूकीत नक्कीच बदल झालेला तुम्हाला दिसून येईल यात शंकाच नाही. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं