Lokmat Sakhi >Parenting > आपल्या मुलांना मातृभाषा लिहिता-वाचता येत नाही, नीट बोलताही येत नाही याचं दु:ख वाटत नाही?

आपल्या मुलांना मातृभाषा लिहिता-वाचता येत नाही, नीट बोलताही येत नाही याचं दु:ख वाटत नाही?

आपल्याला आपलीच भाषा नीट येत नसेल तर आपल्या विचारांचे काय होणार? मायबोलीचं वावडं, विचारांचं अडतं घोडं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2024 03:15 PM2024-03-06T15:15:40+5:302024-03-06T15:20:25+5:30

आपल्याला आपलीच भाषा नीट येत नसेल तर आपल्या विचारांचे काय होणार? मायबोलीचं वावडं, विचारांचं अडतं घोडं!

importance of mother tongue in kids education, parenting. loss of language is loss of culture | आपल्या मुलांना मातृभाषा लिहिता-वाचता येत नाही, नीट बोलताही येत नाही याचं दु:ख वाटत नाही?

आपल्या मुलांना मातृभाषा लिहिता-वाचता येत नाही, नीट बोलताही येत नाही याचं दु:ख वाटत नाही?

Highlightsतर्मुख होण्यासाठी आपल्याकडे वेळच राहिला नाही कारण तो स्टेट्स म्हणून ठेवता येत नाही, असे काही भाषेचेही झाले आहे का?

अश्विनी बर्वे (लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)


राजा भिकारी, माझी टोपी चोरली, ढुम ढुम ढुमाक, ढुम ढुम ढुमाक...
असं म्हणत मुलं वर्गात एकमेकांच्या मागे पळत होती. असं करताना ते कधी उंदीर होत होते, तर कधी राजा, तर कधी सैनिक. एकमेकांच्या भूमिका ते सहज बदलत होते आणि गोष्टीमध्ये अनेक रिकाम्या जागा शोधत आपल्या कल्पनेने त्या भरतही होते. गंमत म्हणजे त्यांचा उंदीर घरातून बाहेर पडून रस्त्यावर सहज फिरत होता. तो शिंप्याकडे गेल्यावर त्याने काय काय पाहिले? त्याच्या घरातील वस्तूंचे वर्णन, त्याच्या मशीनवर ठेवलेला मोबाइल आणि त्याची कंपनी हे ही सांगत होते. मुलांच्या घरात ज्या कंपनीचा मोबाइल होता तो त्या शिंप्याकडे होता आणि रंगही त्याचप्रमाणे बदलत होते. मुलांनी उंदराला आधुनिक वगैरे केले होते. राजा आणि त्याचे सैनिक उंदराच्या मागे न पळता जीपीएस लावून त्याचा शोध घेत होते. उंदीरसुद्धा टोपीमध्ये कॅमेरा ठेवून व्ह्लॉग करत होता.

 

खरंतर ही गोष्ट सांगण्यपूर्वी मला वाटत होते की मुलांनी ही गोष्ट त्यांच्या घरात ऐकली असेल पण तसे काहीही नव्हते.
मुलं पहिलीतली होती आणि नुकतीच मराठीच्या घरातून शाळेच्या अंगणात आली होती. त्यामुळे त्यांची नाळ जोडलेली राहण्याची शक्यता अधिक होती. मराठीत सांगितलेली गोष्ट त्यांना चांगली समजली आणि त्यातली गंमतही उमगली. कारण ती त्यांच्या मातृभाषेत होती. त्यामुळेच ते गोष्टीमध्ये स्वतःचे शब्द घालत होते आणि न समजलेल्या गोष्टीला काय म्हणतात हे विचारत होते. त्यातून त्यांनी अनेक नवीन शब्द ऐकले, त्यांचा वापर कसा करायचा हे त्यांना आपोआप समजले.
एकच गोष्ट आम्ही आठवडाभर पुन्हा पुन्हा ऐकत होतो आणि सांगत होतो, पण आठही दिवस गोष्टीतले ठिकाण बदलत होते, उंदराच्या टोपीचा रंग, आकार आणि त्याची चालण्याची पद्धत बदलत होती. राजासुद्धा नंतर नंतर उदार होत चालला होता. शेवटी शेवटी तर राजाने उंदराशी मैत्री केली आणि उंदरालाच त्याचा वेशभूषाकार म्हणून नेमले. मुलांची कल्पनाशक्ती किती वेगवेगळ्या दिशेने काम करते हे लक्षात आलंच, पण ते करण्याचं त्यांचं माध्यम त्यांची भाषा होतं. त्यांना त्यांच्या भाषेत अर्थात मातृभाषेत काही करायला ऐकायला मिळालं की ते काय काय त्यातून करू शतात हे उघड होतं.

पण मातृभाषा सोबत नसेल तर?

१. मुलं जसजशी मोठी होत जातात आणि त्यांना मातृभाषेशिवाय वेगळ्या माध्यमात शिकवण्याची जबाबदारी पालकच घेतात तेव्हा अनेकवेळा कोणत्याही भाषेकडे लक्ष न दिल्याने मुलांची भाषा कमजोर होते.
२. ते सलगपणे एका भाषेत बोलू शकत नाहीत. कर्त्याप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते हे ते लक्षात घेत नाही. “आई तिकडे नव्हता/ पुस्तक आवडतो/ अशी वाक्ये लिहितात आणि बोलतात.
३. आठवी आणि नववीमधील मुले साध्या साध्या विषयांवरसुद्धा दोन वाक्ये नीट बोलू शकत नाहीत. तिथेही क्रियापदांचे घोळ करत राहतात.

४. अशावेळी भाषाच फक्त महत्त्वाची नाही तर विचार करण्याचे कौशल्यसुद्धा महत्त्वाचे आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.
५. कोणतीही एक भाषा नीट न आल्याने विचार करण्याचे कौशल्य विकसित होत नाही. त्याकडे पालकांनी अधिक लक्ष द्यायला हवे.
६. इंग्रजी बोलता आली नाही तर आपल्याला लाज वाटते. तसेच आपलीच भाषा आली नाही तर आपल्याला काळजी वाटायला हवी. कारण भावना व्यक्त करण्याचे ते अतिशय महत्त्वाचे साधन आहे.

७. आपल्या कामासाठी, जगाशी जोडण्यासाठी इंग्रजी महत्त्वाची आहेच, पण व्यक्त होण्यासाठी आणि भावनिक असुरक्षिततेपासून दूर राहायचे असेल तर मातृभाषा अतिशय महत्त्वाची आहे.
८. भाषा ही भाषा असते ती कोणत्याही एका जाती-धर्माची नसते. आपण इंग्रजीबरोबर इतर प्रादेशिक भाषा सुद्धा शिकायला हव्यात, त्यामुळे आपल्या संवादाच्या कक्षा रुंदावतात. भाषिक कौशल्ये विकसित होतात.
९. आज अनेकजण करिअरच्या दृष्टीने इंग्रजीकडे अधिक लक्ष देतांना दिसतात, त्याचवेळी अनेक तरुण जागतिक पटलावर सांख्यिकी अभ्यास करून मराठीत नवनवीन विषय घेऊन येत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, काही कोटी लोक मराठी बोलतात ती संख्या एका देशाच्या लोकसंख्येइतकी आहे. काळाबरोबर बदलणारे विषय ते मराठीतून आणत आहेत.

१०. आपल्या मायबोलीत केवढी ताकद आहे ती समाजाला सतावणाऱ्या नैमित्तिक विषयांना वाचा फोडते आहे. एखादी भाषा वाईट किंवा चांगली अशा सरळ दोन भागांत हा विषय विभागता येत नाही. आपल्याला सहज कशांत व्यक्त होता येतं आणि व्यक्त होण्यासाठी आपल्याजवळ पुरेसा शब्दसंग्रह आहे का? हे खूप महत्त्वाचे आहे.
११. भाषा ही केवळ संवाद साधण्याचे साधन नाही तर विचार करण्याचे साधनसुद्धा आहे. त्याचीच कमतरता आपल्याला वेळोवेळी भासते. दिखाऊपणा वाढला आणि अंतर्मुख होण्यासाठी आपल्याकडे वेळच राहिला नाही कारण तो स्टेट्स म्हणून ठेवता येत नाही, असे काही भाषेचेही झाले आहे का?

ashwinibarve2001@gmail.com

Web Title: importance of mother tongue in kids education, parenting. loss of language is loss of culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.