"आई... मला एखादी छानशी गोष्ट सांग ना गं..." असं म्हणतं जर तुमची लहान मुले तुमच्याकडे गोड हट्ट करत असतील, तर त्यांना नक्की गोष्ट सांगा. आपल्याकडे ‘गोष्टी सांगण्याची’ फार मोठी परंपरा आहे. पिढ्यानपिढ्या सांगितल्या जात असलेल्या कथांनी मनोरंजनाबरोबर समाजशिक्षणाचंही काम केलं आहे. पूर्वीच्या काळी आजी-आजोबांकडे तर गोष्टींचा खजिनाच असायचा त्यामुळे नातवंडांचा त्यांच्याभोवती सदैव गराडा पडलेला असायचा.आपणही आपल्या आजी - आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकतच लहानाचे मोठे झालो आहोत. या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे वारसा हक्का सारख्याच दिल्या जातात.
खरंतर, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत,अगदी जगभरातील सर्वांनाच गोष्टी ऐकायला,वाचायला,सांगायला आवडतात. असे असले तरीही सध्याच्या बदलत्या काळानुसार समाजव्यवस्था,कुटुंबव्यवस्था बदलत गेली. मनोरंजनाची इतर साधने सहज उपलब्ध होऊ लागली. त्यात पारंपारिक गोष्टी माहीत असणारे, सांगणारेही फारसे उरले नाहीत. त्यामुळे गोष्ट सांगण्याची ही परंपरा आजच्या काळात हळुहळु मागे पडताना दिसत आहे. परंतु काळ कितीही बदलला तरीही मुलांना गोष्ट सांगणे हे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. गोष्टी ऐकल्याने आपले मुलं व्यावहारिक बनते आणि त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. जर आपले मुलं पुढे जाऊन चांगली व्यक्ती म्हणून ओळखली जावी, अशी आपली इच्छा असेल तर त्यांना गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे. यासाठीच मुलांना गोष्टी सांगण्याचे फायदे जाणून घेऊया(Importance Of Storytelling For Children In Today's Digital World Of Screens And Gadgets).
मुलांना गोष्टी सांगण्याचे नेमके काय फायदे आहेत ?
१. गोष्टीतून मुलांना आनंद मिळतो :- मुलांना गोष्टी ऐकायला आवडतात,त्यात त्यांना मजा वाटते.गोष्टी मुलांचे निखळ मनोरंजन करतात.केवळ या एकाच उद्देशासाठी मुलांना गोष्टी सांगितल्या पाहिजेत. गोष्टींत मजा असते,आनंद मिळतो ही गोष्ट मुलांना एकदा का कळाली की गोष्टींबरोबरचे त्यांचे नाते अधिक घट्ट होते. गोष्टी त्यांना स्वतःचे एक सुंदर जग निर्माण करण्याची सर्जनशीलता देतात. यामुळेच कथा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाच्या मानल्या जातात.
"आई, मला काहीतरी गोड खायला दे !" असा धोशा मुलं सतत तुमच्यामागे लावतात ? ५ सोप्या टिप्स...
२. श्रवणक्षमतेचा विकास :- गोष्टी ऐकल्यामुळे मुलांच्या ऐकण्याच्या क्षमतेचा विकास होतो. मुलं गोष्टी ऐकण्यासाठी बराच काळ एका जागी स्थिर बसून राहतात. यामुळे मुलांच्यात एका जागी स्थिर होऊन बसण्याची व ऐकण्याची सवय लागून त्यांची एकाग्रता वाढते. मुख्य म्हणजे ऐकून समजून घेण्याच्या क्षमतेचा विकास होतो.पुढे मूल स्वतंत्रपणे वाचत असताना मजकूराचा अर्थ समजून घेण्यासाठी ही क्षमता कामी येते. गुंतागुंतीची भाषाही ते समजून घेतात. गोष्ट सांगण्याने एका निर्णायक काळात धीराने ऐकण्याची सवय मुलांना लागते.पुढे हीच सवय त्यांच्या जीवनाचा एक भाग बनून जाते.
आई झाल्यावर करिअर संपते का? मग तुम्ही काय निवडाल? - समीरा रेड्डीचा सवाल...
३. संवाद कौशल्यात वाढ होते :- लहानमुलांसमोर तोंडी भाषा भरपूर बोलली गेली पाहिजे. मोठयांसोबत झालेल्या बोलण्याच्या क्रियेतून मुलांचा भाषा शिकण्याचा वेग वाढतो, त्यासाठी मुलांना गोष्टी सांगणे हे अत्यंत उपयुक्त साधन आहे. मुलांना नवनीन शब्दांची ओळख होते. असे शब्द समजून घेण्याचा, त्यांचे उच्चार आत्मसात करण्याचा मुले प्रयत्न करतात. वाक्यरचना, विशेषणे,क्रियापदे , म्हणी,वाकप्रचार यांचा वापर कसा केला जातो हे कळते. मुख्य म्हणजे भाषा कशी वापरली जाते हे मुलांना समजायला मदत होते. जेव्हा आपण मुलांसमोर गोष्टीची पुस्तके वाचतो किंवा मुलांना कथा सांगतो तेव्हा त्यांची भाषा अधिक समृद्ध होते. ते त्यांच्या भावना चांगल्या प्रकारे व्यक्त करायला शिकू लागतात. त्यांची वाक्यरचना, शब्दांची निवड यांसारख्या गोष्टींचे आकलन वाढते. अशा प्रकारे, कथाकथनाच्या मदतीने त्यांचे संवाद कौशल्य वाढते, म्हणून त्यांच्यासाठी दररोज आवर्जून एक गोष्ट वाचा.
४. कल्पनाशक्तीचा विकास होतो :- मुले गोष्ट ऐकताना गोष्टींच्या पात्रांशी प्रसंगाशी एकरूप होतात.गोष्टीतील स्थळ,काळ, प्रसंगाचे चित्र त्यांच्या डोळयासमोर उभे राहत असते. कधीही न पाहिलेल्या गोष्टीही कल्पनेने निर्माण करण्याचं सामर्थ्य मुलांमध्ये असते. मुलांच्या गोष्टीत माणसे , प्राणी,पक्षी, यांच्याबरोबरच राक्षस,पऱ्या,भुते,बागुलबुआ,जादुगार अशी असंख्य काल्पनिक पात्रेही असतात. ही सारी पात्रे माणसांसारखीच वागतात, बोलतात. अशाप्रकारे कल्पनेने जग निर्माण करण्याच्या क्षमतेला गोष्टी ऐकण्यातून चालना मिळते. कथा मुलांना कल्पक बनवतात. कथांनी मुले सर्जनशील होतात. कथांमध्ये हरवून ते त्या पात्रांची कल्पना करतात, त्या वातावरणाची कल्पना करतात. ते अशा परिस्थितीत स्वतःला अनुभवतात आणि अशा प्रकारे ते समस्या सोडवण्यास देखील शिकतात.
आलिया भट म्हणते, लेकीला छातीशी घट्ट धरलं आणि तिनं माझ्या चेहऱ्यावरुन हात फिरवला, तेव्हा वाटलं...
५. भावनिक विकास होतो :- कथा सांगणे आणि मुलांमधील भावनिक विकास यांचाही खोल संबंध असतो. मुलांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी गोष्टींचा उपयोग होऊ शकतो. मुलांच्या भावनिक विकासासाठी त्यांना नियमित कथा ऐकवल्या पाहिजेत. मुले गोष्टीतील पात्रांच्या भावभावना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. स्वत:ला त्या पात्रांच्या ठिकाणी कल्पून विचार करतात. इतरांच्या भावभावना समजून घ्यायला शिकतात. गोष्टीतून मुलांना वेगवेगळया मानसिक प्रक्रियांचा अनुभव मिळतो. गुंतागुंतीच्या भावना समजून घेण्याची समजही या कथा त्यांच्यात रुजवतात. ते दयाळू, प्रामाणिक आणि इतरांबद्दल सहानुभूतीशील बनतात.