Join us  

मुलांना गोवर झाला तर? पालकांना आले टेन्शन, तज्ज्ञ सांगतात ५ महत्त्वाच्या गोष्टी, कशी घ्याल काळजी?

By सायली जोशी-पटवर्धन | Published: November 25, 2022 11:57 AM

Important things regarding Measles Parenting Tips : गोवर झाला तर घाबरून जायची गरज नाही, फक्त योग्य काळजी कशी घ्यायची, वाचा..

ठळक मुद्देगोवर गंभीर होण्याचे प्रमाण कुपोषित मुलांमध्ये ४०० पटींनी जास्त आहे. मात्र आपले मूल सुदृढ असेल तर गोवर तितका गंभीर नाही हे लक्षात घ्यायला हवे. ज्या क्रमाने फोड येतात त्याचक्रमाने ते ७ दिवसांनंतर जायला लागतात आणि ९ दिवसांनी हा आजार पूर्ण बरा होतो. 

सायली जोशी- पटवर्धन

देशात बऱ्याच ठिकाणी लहान मुलांमध्ये गोवरची साथ आली आहे. यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. गोवर हा संसर्गजन्य आजार असला तरी तो सामान्य आजार असून त्यामध्ये घाबरुन जाण्यासारखे काही नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र आपले मूल कुपोषित असेल आणि त्याची प्रतिकारशक्ती, वजन कमी असेल तर अशा मुलांना गोवरचा जास्त प्रमाणात त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी नेमक्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे आणि काय काळजी घ्यायची याबाबत ‘लोकमत सखी’ ने  संसर्गजन्य आजारतज्ज्ञ आणि भारतील बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग यांच्याशी संवाद साधला. पालकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे याबाबत महत्त्वाचे मुद्दे डॉ. जोग सांगतात.  (Important things regarding Measles Parenting Tips).

(Image : Google)

१. गोवर कोणाला होऊ शकतो? 

गोवर हा आजार साधारणपणे कुपोषित मुलांमध्ये किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती खूपच कमी आहे अशा मुलांना लवकर होतो. जी मुले सुदृढ आहेत त्यांच्यात गोवर होण्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. त्यामुळे साधा सर्दी-ताप असेल तर तो गोवरचाच आहे असे समजून पालकांनी घाबरुन जाण्याचे अजिबात कारण नाही. तसेच गोवर हा बरा होणारा आजार असून साधारण ९ दिवसांनंतर हा आजार बरा होण्यास सुरुवात होते. 

२. लसीकरणाबाबत काय काळजी घ्यायला हवी? 

मूल जन्माला आल्यानंतर ९ महिन्यांनी आणि १५ महिन्यांनी मुलाला गोवरची लस आवर्जून द्यायला हवी. सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये ही लस मोफत उपलब्ध असते. पालक साधारणपणे ९ महिन्यांनंतर दिली जाणारी लस देतात पण या लसीचा दुसरा डोस काही कारणाने राहतो. त्यामुळे लसीचा प्रभावी परीणाम दिसून येत नाही. त्यामुळे मूल २ वर्षाचे होण्याच्या आत मुलांना लसीचे २ डोस द्यायला हवेत. कोरोना काळात अनेक पालकांनी कोरोनाच्या भितीपोटी लसीकरण चुकवले, त्यामुळे आता काही आजारांचे प्रमाण वाढल्याचे दिसते. गोवरची लस ही ९५ टक्के प्रभावी असल्याने लसीकरण पूर्ण झाले असेल तर फारशी काळजी करण्याचे कारण नाही. 

३. गोवरबाबत आजही असलेले गैरसमज कोणते? 

एकदा गोवर होऊन गेलेला बरा, असा गैरसमज पालकांमध्ये असतो. एकदा झाला की नंतर पुन्हा हा आजार होत नाही अशी समजूत लोकांच्या मनात असते. मात्र ती अजिबात योग्य नाही. तसेच फोड आल्यावर मुलांना कपड्यात बांधून ठेवणे ही चुकीची गोष्ट आहे. 

(Image : Google)
 

४. गोवरचा विषाणू शरीरात कशाप्रकारे पसरतो? 

सुरुवातीला नाकावाटे गोवरचा विषाणू शरीरात प्रवेश करतो. मग घसा दुखणे, सर्दी- ताप ही सामान्य लक्षणे दिसायला लागतात. पहिले ३ दिवस मुलांना फक्त ताप असतो. त्यानंतर गालाच्या आतल्या बाजुला बारीक फोड येण्यास सुरुवात होते. त्यानंतर कानामागे आणि मग संपूर्ण शरीरावर फोड येतात. ज्या क्रमाने फोड येतात त्याचक्रमाने ते ७ दिवसांनंतर जायला लागतात आणि ९ दिवसांनी हा आजार पूर्ण बरा होतो. 

५. गोवर कोणत्या मुलांमध्ये आणि केव्हा गंभीर होतो? 

ज्या मुलांचे वजन कमी आहे किंवा जी मुले कुपोषित आहेत अशांमध्ये गोवर गंभीर रुप धारण करण्याची शक्यता असते. आपल्याकडे आजही कुपोषित मुलांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मुलांना गोवर होऊ न देणे महत्त्वाचे आहे. गोवर गंभीर होण्याचे प्रमाण कुपोषित मुलांमध्ये ४०० पटींनी जास्त आहे. मात्र आपले मूल सुदृढ असेल तर गोवर तितका गंभीर नाही हे लक्षात घ्यायला हवे. आजार बरा होत असताना काही मुलांमध्ये गुंतागुंत निर्माण होते आणि हा आजार गंभीर रुप धारण करतो. त्यामुळे आजार बरा होत असताना मुलांना काही त्रास नाही ना याकडे पालकांनी विशेष लक्ष द्यायला हवे. काही मुलांना आजार बरा होत असताना पुन्हा ताप येतो, श्वास घेण्यास त्रास होतो. अशावेळी श्वासाचा वेग वाढला तर न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. तर काही मुलांमध्ये अतिसार म्हणजेच जुलाब होऊनही ही गुंतागुंत वाढते.

टॅग्स :पालकत्वलहान मुलंआरोग्य