लहान मुल असो किंवा वयस्कर व्यक्ती असो.. मोबाईल नावाचं खेळणं आता प्रत्येकाच्याच हातात खुळूखुळू लागलं आहे. बहुतांश लहान मुलांना तर मोबाईलचं भयंकर वेड लागलं आहे. काही मोजके अपवाद सोडले तर जवळपास प्रत्येक घरातले आई- वडील मुलांच्या मोबाईल अतिपाहण्यामुळे वैतागले आहेत. काही काही पालकांनी तर मुलांना मोबाईलवरून बोलणंही सोडून दिलं आहे. कारण मुलं ऐकतच नाहीत. मोबाईलसाठी खूप हट्ट करून डोकं उठवतात, त्यामुळे त्यांना तो देऊन टाकावा लागतो, असंही पालक म्हणतात. पण असं करून मुलांना वाटेल तेवढा वेळ मोबाईल पाहू देणं त्यांच्या मानसिक आणि डोळ्यांच्या आरोग्याविषयी किती धोकादायक ठरू शकतं ते एकदा पाहा...(increasing screen time in children causes mental depression and vision syndrome)
UC San Francisco यांनी मुलांचा स्क्रिन टाईम आणि त्याचा त्यांच्या आरोग्यावर होत असणारा परिणाम याविषयी नुकताच एक अभ्यास केला असून तो neurosciencenews यांनी प्रकाशित केला आहे.
यामध्ये त्या संस्थेने ९- १० वर्षे वय असणाऱ्या मुलांचा अभ्यास केला. त्यामध्ये असं आढळून आलं आहे की जी मुलं खूप जास्त वेळ मोबाईलवर गेम खेळतात, व्हिडिओ पाहतात, चॅटिंग करतात अशा मुलांमध्ये नैराश्य, एन्झायटी, मन एकाग्र न होणे, स्वभाव खूप जास्त आक्रमक होणे, चिडचिडेपणा वाढणे अशी लक्षणं दिसून येतात. बरीच मुलं हायपर ॲक्टीव्ह होतात. त्यानंतर त्यांना कंट्रोल करणं अवघड जातं. त्यामुळे मुलांचा स्क्रिनटाईम खूप कमी करा. सुरुवातीला ते नक्कीच खूप त्रास देतील, पण हळूहळू मोबाईलशिवाय राहण्याची त्यांना सवय होईल.
मोबाईल व्हिजन सिंड्रोमचाही धोका
जी मुलं किंवा मोठी माणसं खूप जास्त काळ स्क्रिन पाहतात, त्यांना मोबाईल व्हिजन सिंड्रोम होण्याचं प्रमाण दिवसाकाठी वाढत चाललं आहे, असं डॉक्टर सांगतात.
ट्रॅडिशनलही नको आणि एकदम मॉडर्नही नको! ५ टिप्स- दसऱ्याला 'या' पद्धतीने करा सुपरट्रेंडी लूक
डोळ्यांमध्ये कचकच होणे, डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळे बारीक होणे किंवा सुजणे, चष्म्याचा नंबर वाढणे अशी या आजाराची लक्षणं असून हा त्रास होणाऱ्या व्यक्तींचे, बालकांचे प्रमाण वाढलेले असल्याचे डाॅ. संतोष काळे यांनी सांगितले. ज्यांना कामानिमित्त किंवा अभ्यासानिमित्त सलग काही तास स्क्रिन पाहावी लागते त्यांनी ॲण्टी ग्लेअर चष्मा वापरावा. तसेच ठराविक काळाने ब्रेक घेऊन डोळे एखाद्या मिनिटासाठी बंद करावे, अधूनमधून डोळ्यांची उघडझाप करावी असं तज्ज्ञ सांगतात.