Join us  

Independence day 2022 : उद्याचे नागरीक म्हणून मुलांना शिकवा ५ सिव्हिक सेन्स, देशासाठी थोडं तरी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2022 10:44 AM

Independence day 2022 How to Develop Civic Sense in Children's Parenting Tips : सिव्हीक सेन्स म्हणून मुलांना माहित असायलाच हव्यात अशा गोष्टी कोणत्या ते पाहूया

ठळक मुद्देमदत करणे नागरीक म्हणून आपले कर्तव्य आहे हे आपल्या कृतीतून मुलांना दाखवून द्यायला हवे.कोणी रस्त्यात थुंकत असेल तर तसे करणे चुकीचे आहे हे मुलांना आवर्जून सांगायला हवे. 

भारताच्या स्वातंत्र्याला (Independence day 2022) ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने देशात आणि परदेशातही १५ ऑगस्टचे मोठ्या उत्साहात सेलिब्रेशन केले जाणार आहे. इतिहासातून भारताचा स्वातंत्र्य लढा आपण सगळ्यांनीच वाचलेला, ऐकलेला किंवा पाहिलेला असतो. देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतीकारकांचे कार्य ऐकले किंवा वाचले की  आपल्या अंगावर शहारा येतो. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण त्यांना अभिवादन करतो. देशासाठी त्यांचे बलिदान किती अमूल्य आहे हेही वारंवार ऐकतो. कधी आपण आपल्या मुलांनी सैन्यात जावे यासाठी काही प्रयत्नही करतो. पण या सगळ्याआधी भारताचा नागरीक म्हणून आपल्या मुलांना काही गोष्टी आवर्जून शिकवायला हव्यात (Parenting Tips). ते उग्याचे भविष्य आहेत हे लक्षात घेऊन आतापासूनच त्यांच्यात चांगल्या गोष्टी रुजवल्या तर उद्या देशाचे आणि त्यांचे नक्कीच कल्याण होईल यात वाद नाही. आता सिव्हीक सेन्स म्हणून मुलांना माहित असायलाच हव्यात अशा गोष्टी कोणत्या ते पाहूया (How to Develop Civic Sense in Children's)...

१. रस्त्यात कचरा टाकू नये

भारत हा देश अस्वच्छतेसाठी ओळखला जाणे ही आपल्या सगळ्यांसाठीच लज्जास्पद गोष्ट आहे. यामागे वाढती लोकसंख्या, अपुरे नियोजन अशा गोष्टी असल्या तरी नागरीक म्हणून आपण कधीच घराबाहेर किंवा रस्त्यावर कचरा टाकू नये हे मुलांमध्ये लहान वयातच रुजवायला हवे. आपले घर ज्याप्रमाणे आपण स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपला देशही आपण स्वच्छ ठेवायला हवा. 

२. सिग्नल तोडू नये 

भारतात सिग्नल तोडणे ही अगदीच सामान्य वाटेल अशी गोष्ट आहे. भारतात सिग्नल तोडणारे परदेशात गेले की मात्र कितीही वेळ सिग्नलला थांबतात. दुसऱ्या देशात आपण जी गोष्ट करु शकतो ती आपल्या देशात का नाही. सिग्नलवर पोलीस नाही ना,  सीसीटीव्ही नाही ना हे पाहून आपण सर्रास तो तोडतो. यावेळी आपल्या गाडीवर किंवा गाडीत बसलेले लहान मूल ते पाहते आणि नकळत त्याच्यावरही तेच संस्कार होतात. त्यामुळे यासाठी आधी आपल्याला सुधारावे लागेल आणि मग आपल्याला मुलांमध्ये ही गोष्ट रुजवावी लागेल. 

३. रस्त्यात थुंकू नये

आपल्याकडे रस्त्यात थुंकणे ही गोष्ट अतिशय सामान्य आहे. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका आरोग्य अहवालात म्हटले होते की भारतात दर १० पावलांमागे एकदा थुंकलेले दिसते. अशाप्रकारे थुंकणे ही स्वच्छतेच्यादृष्टीने तर योग्य गोष्ट नाहीच. पण आरोग्याच्या दृ्ष्टीनेही ही अतिशय घातक गोष्ट आहे. आपल्या थुंकीतून संसर्गजन्य आजारांबरोबरच अनेक गंभीर आजार पसरु शकतात. त्यामुळे कोणी रस्त्यात थुंकत असेल तर तसे करणे चुकीचे आहे हे मुलांना आवर्जून सांगायला हवे. 

(Image : Google)

४. कोणत्याही ठिकाणी रांग फॉलो करावी

रुग्णालय, हॉटेल, मंदिर, सरकारी कार्यालये, रिक्षा, बस अशा ठिकाणी अनेकदा रांग असते. काही लोक ही रांग मोडून मधे घुसतात. यामुळे अनेकदा वादावादी आणि भांडणेही होतात. पण अशाप्रकारे रांग मोडून मधे घुसणे अयोग्य असते आणि चांगला नागरीक म्हणून आपण असे कधीच करु नये असे आपण मुलांना आवर्जून सांगायला हवे. 

५. गरजवंतांना मदत करावी

कधी वयस्कर व्यक्ती रस्ता क्रॉस करण्यासाठी किंवा आणखी कोणत्या गोष्टीसाठी आपली मदत मागतात. अंध किंवा अपंग व्यक्तींनाही काही वेळा मदतीची गरज असते. अशावेळी आपण मुलांसमोर त्यांना आवर्जून मदत करावी. अशा लोकांना मदत करणे नागरीक म्हणून आपले कर्तव्य आहे हे आपल्या कृतीतून मुलांना दाखवून द्यायला हवे. जेणेकरुन मोठेपणी मुलेही पुढाकार घेऊन ही कृती करतील.  

टॅग्स :पालकत्वलहान मुलंस्वातंत्र्य दिन