रंजना बाजी
(सहज शिक्षण अभ्यासक)
स्वातंत्र्यदिन (Independence day)जवळ आला की शाळांत तो साजरा करायची तयारी सुरू होते. देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आपण सांगतो पण माणसांच्या स्वातंत्र्याबद्दल आपण कधी मुलांशी बोललो आहोत का ?
स्वातंत्र्य हे सगळ्यात महत्त्वाचं मूल्य आपल्या देशाच्या संविधानानेही मान्य केलं आहे. त्याचा खरा अर्थ मुलांपर्यंत कसा पोचवता येईल?
स्वातंत्र्याचं सगळ्यात उत्तम आणि लगेच डोळ्यात भरणारं उदाहरण म्हणजे आकाशात मुक्तपणे उडणारे पक्षी!
पक्षी कुठंही संचार करू शकतात. त्यांना कोणतीच आडकाठी नसते.
पण मुक्त आकाश मिळालं आहे म्हणून ते कसेही कुठंही जातील असं नसतं. त्यांचा एक दिनक्रम असतो, एक शिस्त असते, त्यानुसार ते वागत असतात. कधी एकटे, कधी दुकटे तरी कधी थवा बनून.
कधी तरी असा एखादा पक्षी माणसाच्या तावडीत सापडतो. माणूस त्याला पिंजऱ्यात ठेवतो. पक्ष्याच्या आवडीचं खायला देतो. पक्ष्याला बसल्या जागी सगळं मिळतं. पण पिंजऱ्यात त्याला पाहिजे तिथं जायचं, उडायचं, मित्रांबरोबर राहायचं स्वातंत्र्य नसतं. त्यामुळं माणसानं कितीही प्रेम केलं, लाड केले तरी पिंजरा उघडा राहिला की पक्षी उडून जातो. कारण स्वतंत्र असणं ही नैसर्गिक प्रेरणा आहे.
हीच गोष्ट माणसांची असते. स्वतंत्र असणे ही इतर प्राण्यांप्रमाणे माणसाचीसुद्धा आदिम प्रेरणा आहे.
पण माणसासाठी आसपास बरेच पिंजरे असतात. हे पिंजरे त्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालत असतातच, त्याचबरोबर त्याची विचारशक्ती, सदसद्विवेकबुद्धी नष्ट करायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळं आपण सतत सजग राहायची नितांत आवश्यकता असते.
सदसद्विवेकबुद्धी जागृत असणे हे ‘माणूस’ असण्याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. कितीही प्रलोभनं आली तरी चांगलं आणि वाईट, खरं आणि खोटं यातला फरक आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि नेहमी चांगल्या आणि खऱ्या गोष्टींची साथ दिली पाहिजे.
वेगवेगळी आमिषं दाखवून, प्रसंगी धमकी देऊन, धाक दाखवून माणसांना मोहाच्या, भीतीच्या, प्रेमाच्याही पिंजऱ्यात बंद केलं जातं आणि बंद करणारा त्यांना आपल्या मर्जीप्रमाणे वागवू बघतो.
हे असे अनेक पिंजरे जगण्यात येऊ शकतात. ते ओळखले पाहिजे. त्यापासून लांब राहणं शिकलं पाहिजे. आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवलं पाहिजे.
स्वातंत्र्य आणि जबाबदारी
१. मात्र स्वातंत्र्य कधी एकटं येत नाही. त्यासोबत जबाबदारी आणि स्वयंशिस्त या गोष्टीही येतात. आपल्या निर्णयामुळे दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला बाधा येणार नाही हे बघणंही गरजेचं आहे.
२. आपण स्वतंत्रपणे घेतलेल्या निर्णयांची आणि त्यांच्या परिणामांची जबाबदारी घेणं आहे.
३. आपण आपलं स्वातंत्र्य जपतो त्याचवेळी दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या आड आपण येत नाही याचं भान ठेवलं पाहिजे.
४. गम्मत म्हणजे आपण माणसं फक्त आपल्या स्वातंत्र्यासाठीच जागरूक असतो. आपल्याभोवती इतर अनेक जीव आहेत, प्राणी, पक्षी, झाडं, किडे !
स्वत:च्या करमणुकीसाठी माणसं बऱ्याचदा प्राणी, पक्षी पाळतात. आपण सांगू तसंच त्यांनी वागलं पाहिजे, असं आपण समजतो. त्यांना ‘वळण’ लावायचा प्रयत्न करतो. त्यांच्या शी-शूच्या वेळा सुद्धा आपण ठरवतो.
५. नैसर्गिक अधिवासात प्रत्यक्ष शिकार करून कुत्री, मांजरी आपलं अन्न मिळवत असतात, त्यापासून त्यांना वंचित ठेवून माणसानं बनवलेलं काही अन्न त्यांना खायला लावतो. लहानपणापासून पाळीव प्राण्यांना असं वागवत जातो आणि त्यांच्या नैसर्गिक क्षमता मारतो, त्यांचं खच्चीकरण करतो आणि त्यांना आपलं गुलाम करून टाकतो.
६. तोच प्रकार झाडांबद्दलसुद्धा असतो. काही झाडं चांगली आणि काही वाईट, तण असं आपण आपल्या सोयीने ठरवून टाकलं आहे.
७. निसर्गात चांगलं-वाईट असं काही नसतं. पण आपण माणसं आपल्या फायद्याचाच फक्त विचार करतो.
८. प्रत्येक विभागाची एक जैवविविधता असते, परस्परपूरकत्व असतं. त्याचा आपण आदर करतो का? या सगळ्यांच्या स्वातंत्र्याचा आपण विचार करतो का ?
९. स्वातंत्र्याबरोबर समता, बंधुता, करुणा आणि प्रेमसारखी मूल्यंही येतात. ती आपण अंगीकारतो का?
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे?
या सगळ्या गोष्टी मुलांपर्यंत कशा पोचवायच्या?
१. मुलं शिकतात ते निरीक्षण, अनुभव आणि अनुकरणातून.
२. आपण स्वातंत्र्याबद्दलचे हे सगळे शब्द त्यांच्यापुढं मांडले तर मुलं फक्त शब्दच शिकतील.
३. मुलांमध्ये ही शाश्वत जीवनमूल्ये भिनली पाहिजेत, असं वाटत असेल तर आपण मोठ्यांनी आधी हे सगळं समजून घेतलं पाहिजे, आचरणात आणलं पाहिजे आणि त्यातूनच मुलांसमोर उदाहरणं ठेवली पाहिजेत.
४. मुलांमध्ये ही मूल्यं आपल्या चांगल्या वागणुकीतून रुजवायची जबाबदारी त्यांच्या कुटुंबांची आणि पर्यायानं समाजाची आहे.
dranjana12@gmail.com