आपलं मूल डावरं आहे, डाव्या हातानं खातं हे समजलं की आधी पालकांना धक्का बसतो. मग सुरु होतो त्याच्यामागे लकडा उजव्या हातानं जेव. काही मुलांना जमतं, काहींना नाही. काहीजण दोन्ही हातानं खात निभावून नेतात. खरी परीक्षा शाळेत जायला लागलं की होते. तिथं आता अनेक शाळा हॅण्ड प्रेफरन्स चेक करतात. त्यातून मुलं उजव्या हातानं लिहिणार की डाव्या हे कळतं. मात्र अजूनही अनेक पालक आग्रह धरतात की आपल्या मुलांनी उजव्याच हातानं लिहावं. मूल डावरं आहे हे कळलं की त्यांना टेंशनच येतं. त्यामुळे तुमचंही मूल जर डावरं असेल, लेफ्टी असेल तर उगीच घाबरुन मुलाला हात बदल करायला सांगण्यापेक्षा आपण त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी सोप्या करु शकतो? हे पाहणं आणि त्या करणं जास्त सोयीचं ठरेल.
(Image : google)
वेगळं काही नाही..आपलं मूल डावरं असणं यात वेगळं काही नाही. जगात बहूसंख्य माणसांचा हॅण्ड प्रेफरन्स उजवा असतो म्हणजे ते उजव्याच हातानं कामं करतात म्हणून डाव्या हातानं काम करणं, डावरं असणं काही वेगळं किंवा निसर्गनियमाहून वेगळं नाही. त्यामुळे आपलं मूल डावरं आहे याचा पालकांनी बाऊ करू नये, त्यांच्यावर कसलेही प्रेशर आणू नये.. उलट जितक्या लवकर पालक आपल्या मुलाचं/मुलीचं डावरं असणं स्वीकारतील तेवढं उत्तम.विशेषत: मुलींचं. मुली डाव्या हातानंच कामं करतात, जेवतात हे अनेक घरात चालत नाहीत. ते मुलींना वळण लावायचं म्हणत तिचं डावरं असणं नाकारतात. शिक्षा देतात हाताला, उजवाच हात वापर असा आग्रह धरतात. तसे अजिबात करू नये.
प्रोत्साहनडावऱ्या मुलांनाही कळतं की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत. त्यांचे मित्रमैत्रिणी ज्या हातानं कामं करतात तोच हात आपला का चालत नाही म्हणत मुलं खंत करतात. त्यांना शाळेत डाव्या हातानं लिहिणं अवघड होतं. अनेक शब्द, अक्षरं उलटी लिहिली जातात. त्यामुळे त्यांना डावरं असणं हे काही चुकीचं नाही म्हणत तो हात वापरायला प्रोत्साहन द्या. त्यांचा आत्मविश्वास वाढवा.
जमवून घ्यायला मदतनवीन लिहायला शिकतात तेव्हा या मुलांना मदत लागते. त्यामुळे त्यांना मदत करा, धीर धरा. कदाचित त्यांना लिहायला, लेस बांधणे, वेणी घालणे या कामांना वेळ लागू शकतो.
(Image : google)
काय करता येईल?१. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डावऱ्यांसाठी असलेली खास कात्री, सुऱ्या विकत घ्या. त्याने कापायचा सराव मुलांना करू द्या. थोडे महाग वाटले तरी ते विकत घेणं फायद्याचं.२. डाव्या हातानं काम कसं पटपट करायचं याचे युट्यूबवर व्हिडिओ आहेत ते पहा. डाव्या हातानं ते उत्तम काम करत असतील तर त्यासाठी प्रोत्साहन द्या.३. त्यांचं डावरं असणं सेलिब्रेट करा. म्हणजे कौतुक हवं पण अतीच सोहळाही नको.