Join us  

तुम्ही चिडचिडे-कटकटे आहात, सतत रागात असता? तुमची मुलं कधीच आनंदी होणार नाहीत कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2024 6:55 PM

मुलं आनंदी आणि यशस्वी व्हावी असं वाटत असेल तर आधी आईबाबांना बदलावं लागतं.

ठळक मुद्देआपल्याला लहानग्यांना मोठं करायचं आहे. त्यासाठी उत्साही राहण्याचं काम आपलं आपल्यालाच करावं लागणार आहे.

डॉ. श्रुती पानसे (मेंदूविषयक अभ्यास तज्ज्ञ)

आनंदी आणि उत्साही मुलं असावीत असं सगळ्याच आईबाबांना वाटत असतं. लहान मुलं निसर्गत:च आनंदी, उत्साही असतात. सतत नाविन्याच्या शोधात असतात. पण अशा मुलांचे आईबाबा कसे असतात? असतात का ते ही आनंदी, उत्साही? आपल्या मुलांसारखेच?आपल्या मुलांचं सगळं छान करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण कधी कधी ते अजिबात जमत नाही. काही ना काही अडचणी येतात. आणि आपल्या उत्साहात खोडा घालतात. आपण पुन्हा अस्वस्थ होतो, दु:खी होतो, निराशा मनात दाटून येते.

या सगळ्याची कारणं प्रत्येकानुसार वेगवेगळी असतात. पण त्यावर मात करून स्वत:ला उत्साही ठेवायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील. त्या प्रयत्नांचे मार्ग आहेत.

१. सर्वप्रथम एक गोष्ट ठरवावी लागेल ती म्हणजे, भूतकाळात रेंगाळत राहायचं नाही. ही एवढी गोष्ट ठरवली आणि खरोखर कृतीत आणली तर हीच उत्साही राहाण्याची सुरु वात असू शकते. छान वर्तमानकाळ आपल्या हातात आहे आणि भविष्यही! कालची काळजी मात्र मन पोखरून टाकते. आनंदी आणि उत्साही होऊच देत नाही. म्हणून ती आपल्यासोबत नको.२. जगात एकच गोष्ट चिरंतन असते. ती म्हणजे बदल. सतत आणि सगळ्या गोष्टीत बदल घडून येत असतो. कोणतीही गोष्ट स्थिर नसते. कधी अपयश मिळतं. कधी यश मिळतं, कधी गोष्टी आपल्याला हव्या तशा घडतात, कधी नाही घडत. असं झालं की लगेच आपल्याला काळजी वाटायला लागते. काळजी करण्यापेक्षा अपयशातून आपण काय शिकलो्, हे तपासायला घेतलं तर अनुत्साह कमी होतो. मन शांत होतं.३. जेव्हा आपण शारीरिक दृष्ट्या थकतो, तेव्हा आपल्याला काही करावंसं वाटत नाही. उर्जेची पातळी पूर्णपणो खालावलेली असते. आपल्याला उत्साही वाटत नाही याचं कारण शारीरिक आहे का हे बघावं. जर तसं असेल तर योग्य आहार आणि व्यायाम करून आपला थकवा जाईल आणि पुन्हा उत्साही वाटायला लागेल.

४. आपल्या मनात किंवा आपल्या जवळपास जी माणसं आहेत, त्यांच्या मनात अस्वस्थता, राग, छोट्या छोट्या हक्कांसाठी भांडणं, हव्यास, लोभ, मत्सर, कुटील कारस्थानं, भीती अशा नकारात्मक भावना असतील, तर आपणही आपल्या जगण्यातला उत्साह विनाकारणच हरवून बसतो.या नकारात्मक भावनांना मनात जोपासत बसलं, त्यांना सांभाळून ठेवलं तर मनातलं सगळं चैतन्य निघून जातं. कोणतीही गोष्ट करायची तर त्यात चैतन्य, आनंद, उत्साह हवाच, तो नसेल तर विचारही चांगला करू शकत नाही, तर प्रत्यक्ष काम कसं करणार?५. आपल्याला दिवसभरात जितक्या गोष्टींचा, माणसांचा त्रस होतो, त्या मागे आपली पूर्वग्रहदूषित मतं आहेत का? हे तपासून स्वच्छता करायला हवी. फारच गरजेचं असतं ते. मनात उत्साह असेल तर, चांगल्या गोष्टी निर्माण व्हायला स्फूर्ती निर्माण होते. चांगलं घडेल याची आशा आणि त्याला साजेलसा आत्मविश्वास या सकारात्मक भावनांच्या शिवाय आपण खरोखर काहीच करू शकत नाही. सकारात्मक हेतूनं केलेल्या कामाचे सकारात्मक निष्कर्ष मिळतात. आपला दृष्टिकोन कसा आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.

६. आपल्या आसपासच्या माणसांबद्दल गैरसमज निर्माण करण्यानं उत्साहच नाही तर जगण्यातला रसही संपतो. त्यापेक्षा बोलून, दुसऱ्यांना क्षमा करून अतिशय हलकं आणि प्रसन्न वाटतं. जर आपलं मन उगाचच नको त्या आठवणींमध्ये गुंतून राहत असेल आणि त्यामुळे खोल खोल जातंय असं वाटत असेल तर वेळीच रोखा. स्वत:ला वेळीच सावरणं हे फक्त आपल्याच हातात आहे. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल समाधानी असायला हवं. कृतज्ञ असायला हवं. राग आणि निराशा अशा गोष्टी स्वत:पाशी मुळीच जपून ठेवायच्या नसतात. ज्या गोष्टी अजिबात बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणं सोडून द्यायला शिकायला हवं. हे लगेच जमत नाही, पण हळूहळू जमू शकतं. आपल्याला लहानग्यांना मोठं करायचं आहे. त्यासाठी उत्साही राहण्याचं काम आपलं आपल्यालाच करावं लागणार आहे. 

टॅग्स :पालकत्वमानसिक आरोग्यलहान मुलं