कोरोनाची भीती कमी झालेली असली, तरी अजूनही शाळा सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे सगळी मुलं अजूनही घरीच आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आहे. त्यामुळे मुलांना वेगवेगळे क्लासेस लावायलाही पालक घाबरत आहेत. त्यामुळे २४ तास घरात असलेली मुले असं चित्र सध्या बहुतांश घरांमध्ये पाहायला मिळत आहे. अर्थातच दिवसभरातून एक- दोन तास मुलं शेजारच्या मुलांशी खेळतात, पण त्याव्यतिरिक्त त्यांचा अन्य वेळ मात्र घरातच जातो.
याशिवाय ऑनलाईन क्लासची आता मुलांना सवय झाली असली, तरी तो पर्याय मुलांना नाईलाजाने स्विकारावा लागला आहे. त्यामुळे ऑनलाईन क्लासचा तणाव, घराबाहेर कुठेही न जाणे, शाळेतल्या सवंगड्यांची आठवण येणे, अशा अनेक त्रासातून सध्या लहान मुले जात आहेत. याचा परिणाम म्हणजे मुलांच्या स्वभावात झालेला बदल. काही मुलांचा स्वभाव हट्टी, हेकेखोर झाला आहे, तर काही जणं खूपच भावनिक झाले आहेत. मुलांच्या या स्वभावाचा त्रास आता आईलाही होऊ लागला आहे. अनेक घरात असं चित्र आहे की बाबा ऑफिसमध्ये आणि आई व मुलगा किंवा मुलगी एवढे दोघेच दिवसभर घरात. याशिवाय अनेक आईंना तर घरुनच त्यांचे ऑफिसचे कामही सांभाळावे लागत आहे. यामुळे दोघांचीही एकमेकांवर सतत चिडचिड, एकमेकांवर रागवणे, ओरडणे असे चित्र काही घरांमध्ये दिसून येत आहे. मुलांची शाळा कधी सुरु होईल, याकडेही अनेक आयांचे लक्ष लागून राहिले आहे. तुम्हीही याच तणावातून जात असाल आणि मुलांवर तुमची प्रचंड चिडचिड होत असेल, तर या काही टिप्स नक्की फॉलो करा...
१. रागावर कंट्रोल ठेवायला शिका
मुलांवर चिडचिड किंवा ओरडणे हा पर्याय अयोग्य आहे. त्यामुळे सगळ्यात आधी तुमचा राग कंट्रोल करायला शिका. यासाठी जेव्हा केव्हा खूप राग येईल, तेव्हा थोडं शांत बसा. जे होत आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. दिर्घ श्वसन करा आणि
डोळे मिटून काही काळ स्वस्थ बसा.
२. रागात कोणतीही गोष्ट करु नका
बऱ्याचदा मुले काहीतरी खोडी करतात. ते पाहून आपला संताप होतो. अशावेळी एकदम मुलांशी बोलायला जाऊ नका. त्यांना ते करण्यापासून थांबवा पण लगेच काही बोलू किंवा त्यांना समजून सांगण्याच्या भानगडीत पडू नका. कारण जेव्हा आपल्याला खूप राग आलेला असतो, तेव्हा आपण कोणतीही गोष्ट शांतपणे समजावून सांगू शकत नाही. म्हणूनच आधी तुमचा राग कंट्रोल करा. राग शांत झाला की, मुलांकडे जा आणि मग त्यांना त्यांची झालेली चूक समजावून सांगा.
३. मुलांना मारू नका
कधी कधी मुलं काही तरी चुकीचे करतात. त्यामुळे त्यांच्या पाठीत एक धपाटा घालावा, असे अनेक आईंना वाटते. काही जणी तर राग अनावर झाल्यावर मुलांना एक- दोन फटकेही मारतात. पण मुलांना मारणे अतिशय चुक आहे. यामुळे मुलेही अधिक चिडचिडी होतात, त्यांना एकतर पालकांचा खूप राग येतो किंवा पालकांविषयी त्यांच्या मनात भीती बसते. त्यामुळे चुकूनही मुलांना मारू नका.
४. नियम बनवा आणि मुलांना वेळ द्या
मुलांचा पसारा किंवा त्यांना कोणत्याही गोष्टीत शिस्त नसणे ही बहुसंख्य पालकांची तक्रार असते. मुले शिस्त, नियम पाळत नाहीत आणि त्यामुळेच मग पालकांचा राग अनावर होऊ लागतो. म्हणून घरात टीव्ही बघण्याचे, जेवणाचे, वस्तू जागच्या जागी ठेवण्याचे काही नियम बनवा. मुलांना वेळ द्या. लगेच ते ऐकणार नाहीत, कारण कितीही झालं तरी ते लहान आहेत, हे तुमच्या मनात पक्के बसवा. पण हळूहळू तुमचे पाहून त्यांना सवय लागेल. एखादी वस्तू मुलांनी उचलली नाही, तर त्यांना तशी सूचना द्या. त्यांनी ती वस्तू तेथून उचलेपर्यंत वाट बघा. आपोआपच त्यांना त्यांची चूक उमगेल आणि तुमचा रागाचा पाराही वाढणार नाही.
५. चांगले वागल्याचे बक्षिस द्या
जेव्हा आपल्याला एखाद्या कामाचे बक्षिस मिळते, तेव्हा पुढे आपण आणखी जोमात काम करतो. मुलांना पण हेच अपेक्षित असते. मुलांनी तुमचे ऐकले, तुमची शिस्त पाळली, ते शहाण्यासारखे वागले की त्यांना त्यांच्या आवडीचा छोटासा खाऊ किंवा एखादी लहानशी वस्तू देत जा. काहीच देणे शक्य नसेल, तर फक्त तोंडभरून त्यांचे कौतूक करा. यामुळेही मुलांना आपोआपच चांगलं वागण्याची, चांगले काम करण्याची शिस्त लागेल आणि तुमच्यावर चिडचिड करण्याची मुलांना रागे भरण्याची वेळच येणार नाही.