Join us  

लहान मुलांना सर्दी झाल्यावर केळं द्यावं की नाही? डॉक्टर सांगतात नेमकं काय बरोबर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2023 12:03 PM

Is it fine to give banana to child during cough and cold : एक वेळचा आहार म्हणून केळं अतिशय हा अतिशय उत्तम असा पर्याय असतो.

सर्दी, खोकला आणि ताप या लहान वयातील मुलांना उद्भवणाऱ्या अतिशय सामान्य समस्या आहेत. हवा बदल झाला, खूप धुळीत गेले, सर्दी झालेल्या इतर लहान मुलांशी संपर्क झाला किंवा नवीन विषाणूशी त्यांचा संपर्क आला की मुलांना सर्दी-खोकला होतो. आजुबाजूला असलेल्या वातावरणाशी आणि विषाणूंचे प्रतिविषाणू शरीरात तयार होण्यासाठी अशाप्रकारचा ताप येणे चांगले असते असे डॉक्टरांचे म्हणणे असते. पण एरवी घरभर हुंदडणारी मुलं यामुळे एकदम शांत आणि मलूल होऊन जातात आणि मग घर अचानक खूप शांत वाटायला लागते. सर्दीमुळे बरेचदा मुलं नीट खात नाहीत, झोपेतही श्वास न घेता आल्याने किंवा खोकल्याने त्यांना आणि आपल्यालाही सतत जाग येत राहते. घरगुती उपाय आणि डॉक्टरांची औषधे यांनी ही सर्दी बरी होण्यासाठी पालक म्हणून आपण प्रयत्न करतच असतो. पण मुलांना सर्दी झाली की आपण काही चुका करतो कारण आपल्या मनात त्याविषयी गैरसमज असतात (Is it fine to give banana to child during cough and cold). 

(Image : Google)

दूध, केळं, भात वरण हे लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या आहारातील काही महत्त्वाचे घटक आहेत. केळं सगळ्याच वयोगटातील मुलं अतिशय आवडीने खातात. केळं कुठेही सहज उपलब्ध होणारी गोष्ट आहे. दात न आलेल्या बाळांनाही स्मॅश केलेले केळं सहज खाता येऊ शकते. तसेच केळं खाल्ल्यावर मुलांचे पोट भरण्यासही मदत होते, त्यामुळे एक वेळचा आहार म्हणून केळं अतिशय हा अतिशय उत्तम असा पर्याय असतो.  एरवी आपण मुलांना नियमित केळं देतो. पण सर्दी किंवा कफ झाल्यावर आपण केळं देणं बंद करतो. आता असं करणं योग्य आहे की अयोग्य याबाबत काहीही माहिती नसताना केवळ मोठे सांगतात म्हणून किंवा केळ्याने कफ वाढतो असं कुठेतरी ऐकल्याने आपण हा निर्णय घेतो.  लहान मुलांचे डॉक्टर असलेले डॉ. पार्थ सोनी याबाबतच महत्त्वाची गोष्ट आपल्याशी शेअर करतात.

केळं द्यावं की नाही? 

सर्दी किंवा कफ झाला की मुलांना केळं देऊ नका असं सामान्यपणे सांगितले जाते. पण केळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर्स, खनिजे आणि इतरही आरोग्यासाठी पोषक असे घटक असतात. त्यामुळे केळं लहान मुलांसाठी एक उत्तम असा पोषक आहार आहे. म्हणूनच कफ आणि सर्दी असेल तरी मुलांना केळं देणं अजिबात बंद करु नये. कारण अशाप्रकारचा कोणताही अभ्यास उपलब्ध नसल्याने हा गैरसमज वेळीच दूर करायला हवा. आधीच मुलं सर्दी झालेली असताना खायला कुरकुर करतात, त्यात त्यांना नियमित सवय असलेल्या केळ्यासारख्या गोष्टी दिल्या नाहीत तर ते काहीच खात नाहीत आणि मग अंगात ताकद नसल्याने इन्फेक्शन बरे व्हायला जास्त वेळ लागतो. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंआरोग्यकेळी