लहान मुलांना दात येणं ही एक महत्त्वाची प्रक्रिया असते. मूल जसं मोठं होतं तसा त्याचा एक एक अवयव विकसित होत असतो. दात येणे हे त्यापैकीच एक असून हे दात येताना मुलांना काहीबाही त्रास होतात. अनेकांच्या हिरड्या शिवशिवत असल्याने त्यांना सतत काहीतरी चावावेसे वाटते. दात येताना ताप येतो, जुलाब होतात अशा आपल्याकडे काही समजुती आहेत. मात्र दात येणे आणि जुलाब होणे यांचा खरंच काही संबंध असतो का हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. लहान मुलांचे डॉक्टर असलेले डॉ. पार्थ सोनी याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती देतात. ते सांगतात, लहान मुलांना जुलाब झाल्यानंतर पालक ३ ते ४ दिवस घरगुती उपाय करत राहतात. त्यानंतरही जुलाब थांबले नाहीत आणि मुलांच्या अंगातले त्राण कमी व्हायला लागले की मग पालक मुलांना डॉक्टरांकडे घेऊन जातात (Is Teething and loose Stool are Connected).
अशावेळी मूल जुलाबाने पूर्ण डीहायड्रेट झालेले असते. उपचारासाठी मुलाला वेळेत का घेऊन आला नाहीत असं विचारलं की त्याला दात येत आहेत त्यामुळे जुलाब होत असतील आणि ४ दिवसांत ते बरे होतील असं वाटल्याने आणलं नाही असं अगदी सहज पालक सांगतात. मात्र जुलाब होऊन २ ते ३ दिवस गेलेले असल्याने या मुलाला अॅडमिट करण्याशिवाय पर्यायच नसतो. मूळात मुलांना दात येतात तेव्हा त्यांना खूप इरीटेशन होत असते. अशावेळी मुलं आसपास दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी, हाताची बोटं सतत तोंडात घालत असते. या गोष्टी तोंडात घालून चावल्यावर मुलांना नकळत रिलिफ वाटतो.
या वस्तूंवर असणाऱ्या घाणीतून मुलांच्या शरीरात जंतू जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे त्यांना इन्फेक्शन होऊ शकते. याच जुलाबामुळे किंवा इन्फेक्शनमुळे अनेकदा मुलांना तापही येण्याची शक्यता असते. सर्दी आणि कफ होणे, उलट्या होणे असेही होऊ शकते. पण हे सगळे दात येतात म्हणून होत नाही तर दात येताना सगळ्या वस्तू तोंडात घातल्याने इन्फेक्शनमुळे हे होत असते हे लक्षात घ्यायला हवे. आता असं होत असेल तर नेमकं काय करायला हवं असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर साहजिकच त्यासाठी काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी.
१. मुलांना ७-८ महिन्याचे झाल्यावर पहिला दात येतो तेव्हापासून मुलांच्या हिरड्या आणि हा दात नियमितपणे स्वच्छ करायला हवा.
२. मुलं ज्या खेळण्यांशी दिवसभर खेळत असतात ती खेळणी दिवसातून किमान २ ते ३ वेळा स्वच्छ करायला हवीत.
३. मुलांचे हातही सतत लिक्विड सोप किंवा नुसत्या पाण्याने सतत धुवत राहा. म्हणजे त्यांच्या हाताला काही घाण असेल तर ती त्यांच्या पोटात जाण्यापासून त्यांचा बचाव होऊ शकेल.
४. मुलं ज्याठिकाणी वावरतात तिथे खूप जास्त धूळ, घाण नसेल याची काळजी घ्या. त्यादृष्टीने घराचीही स्वच्छता करायला हवी.