सायली कुलकर्णी
मेधा. ७ वर्षांची आपल्या हाताने जेवत नाही, वय वर्षे ९ असणाऱ्या अनयला शूज घालण्यासाठी कोणाची तरी मदत लागते, ८ वर्षांची ओवी आपले कपडे आपणहून घालू शकत नाही. अर्णव वय वर्षे ६, आपली स्कूल बॅग पाठीवर अडकवू शकत नाही. ही सारी उदाहरणे आपल्याच आजूबाजूला वावरणाऱ्या सर्वसामान्य मुला-मुलींची आहेत. समुपदेशनासाठी येणाऱ्या बऱ्याच केसेस मध्ये पालक आपल्या मुलांबाबतच्या या अशा अडचणी व्यक्त करतात. मुले ६-७ वर्षांची झाली की बऱ्याच पालकांना या समस्या प्रकर्षाने जाणवू लागतात. या पालकांशी झालेल्या संवादातून पुढील काही गोष्टी जाणवल्या. का बरं मुलं त्यांना वयाला झेपतील अशी कामं करत नाहीत?
मुलं ‘स्वावलंबी’ का होत नाहीत?
१. बरेचदा प्री प्रायमरीच्या म्हणजेच ३ ते ६ वयाच्या मुलांना स्वतःच्या हाताने गोष्टी करू दिल्या जात नाहीत.
२. प्री प्रायमरीला लहान असणारी मुले पहिली दुसरीत गेल्यावर पालकांना अचानक मोठी वाटू लागतात.
३. 'तुला जमणार नाही' चे रूपांतर आपसूकच 'तू आळशीपणा करतोस/ करतेस' यामध्ये होते.
४. मग याच 'सो कॉल्ड' मोठ्या झालेल्या मुलांकडून पालकांना हव्या असणाऱ्या गोष्टी करण्याची, स्वयंशिस्तीची, स्वावलंबनाची अपेक्षा केली जाते.
५. उशिरा जाग आलेल्या या पालकांकडे पाहिल्यावर नेहमीच मनात येते की, प्री प्रायमरीच्या पालकांनाच योग्य, योग्यवेळी आणि नेमके असे मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे.
पालकांना काय माहिती हवे?
मुळात प्री- प्रायमरीच्या पालकांना आपले मूल काय करू शकते याची माहिती असणे आवश्यक आहे. या वयाच्या मुलांना शरीराचा तोल त्यांना सांभाळता येतो. आपल्या हालचालींवर नियंत्रण आणि त्यांमध्ये सुसूत्रता राखता येते. बघणे, ऐकणे,स्पर्श यांच्यासोबत समन्वय साधून हालचाली करता येतात. ५ ते ६ वर्षें वय असणाऱ्या सामान्य मुला-मुलींना, कोणाच्याही मदतीशिवाय, आपल्या शारीरिक हालचालींबाबत काय काय करता येते हे समजून घेऊयात..
१. या मुलांना वेगाने चालता येते. तसेच ते बरेच अंतरही चालू शकतात ( नेमके किती अंतर याबाबत विविध मते आहेत.)
२. चढ चढता व उतरता येतो.
३. ३ ते ४ किलो पर्यंत वजन उचलता येते.
४. पटापट व उंच उड्या मारता येतात.
५. दोरीच्या सहाय्याने उड्या मारता येतात.
६. आधाराशिवाय पायऱ्या चढता वा उतरता येतात.
७. शरीराचा तोल सांभाळता येतो त्यामुळे एका पायावर डोळे बंद करून थोड्या वेळासाठी उभे राहता येते.
८. साधारण १ मीटर अंतरापर्यंत लहान चेंडू फेकता येतो तर मोठा चेंडू झेलायला जमतो.
९. वेगाने धावणे,उलटे चालणे, लंगडी घालणे, दोरीवर चढणे, शिडी चढणे,लोंबकळणे, अडथळे ओलांडणे यांसारख्या कृती करता येतात.
१०. वेगाने सायकल चालवता येते आणि हवी तेव्हा थांबवता म्हणजेच नियंत्रित करता येते.
११. पायऱ्या वगळून खाली उतरता येते.
१२. दोरीच्या गाठी मारता येतात तसेच सोप्या गाठी सोडवताही येतात.
१३. सुरीच्या मदतीने मऊ पदार्थ कापता येतात.
१४. कात्रीच्या सहाय्याने कागद कापता येतात.
१५. बोटाच्या चिमटीने वस्तू पकडून विविध कृती करता येतात. जसे की, मध्यम आकाराचे मणी ओवता येणे.
१६. पाण्यासारखे पातळ पदार्थ मध्यम आकाराच्या तोंडाच्या भांड्यात भरता येतात.
१७. आपापले कपडे घालता येणे, बटणे- हूक- चेन लावता येते.
अजून लहान आहे किती!
पण कळत नकळत 'लहान आहात' च्या नावाखाली मुलांना बऱ्याच अनुभवांपासून वंचित ठेवले जाते. याच कारणामुळे मुलांचे स्वावलंबन,आत्मनिर्भरता हरवून जाते. हो हरवूनच जाते! कारण निसर्गतः जमू शकणाऱ्या, करता येऊ शकणाऱ्या गोष्टी 'नको', 'नाही', ' काहीतरी होईल' (लागेल, कापेल, पडेल..) या अट्टाहासापायी मुलांना करूच दिल्या जात नाहीत. ज्यामुळे मुले मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या दुबळी बनतात.
आता मला अगदी प्रामाणिकपणे सांगा बरं, की अश्या करू न दिलेल्या गोष्टी अचानक पहिली दुसरीच्या वयात मुलांना कशा काय करता येतील ? ती स्वावलंबी, आत्मनिर्भर कशी काय होतील ?
म्हणूनच मला ठामपणे असे वाटते की, ३ ते ६ वयाच्या मुलांना घरात छोट्या छोट्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या पाहिजेत. ज्या मुलांना लहानपणी जबाबदाऱ्या दिल्या जात नाहीत अशी मुले मोठी होऊन बेजबाबदार झालेली दिसून येतात. मोठया माणसांनी जबाबदाऱ्या घ्यायच्या असतात तर लहान मुलांना किमान सुरुवातीला तरी त्या द्याव्या लागतात.
जबाबदारी बरोबरीने कोणाच्याही मदतीशिवाय, स्वतंत्रपणे काम करण्याची संधीही त्यांना द्यायला हवी. अर्थातच या वयातील मुलांना बरेचदा देखरेखीची म्हणजेच सुपरव्हिजनची गरज असते, हे विसरून चालणार नाही. काळाची गरज म्हणून, बऱ्याच घरामध्ये मुलांना सांभाळण्यासाठी मावशी नेमल्या जातात किंवा त्यांना डे केअर मध्ये ठेवले जाते. अश्या प्रकारची मुलांसाठी वापरली जाणारी सपोर्ट सिस्टीम मुलांसाठी कुबड्या न ठरता त्यांना खऱ्या अर्थाने स्वावलंबी करण्यास मदत करणारी आहे ना हे नक्की तपासून घ्या.
मुलांना स्वावलंबी करण्यासाठी काय काय करता येईल?
पालक म्हणून या वयातील मुलांची घरातील कोणकोणत्या कामात मदत घेता येईल? मुलांना 'स्वावलंबी' वाढवण्यासाठी त्यांना कोणकोणत्या जबाबदाऱ्या व संधी देता येतील?
१. मुलांना त्यांच्या हाताने खाऊ द्या.
२. खाताना चमच्याचा वापरही करायला शिकवा.
३. पिण्यासाठी भांड्यात पाणी ओतणे, बाटलीचे झाकण लावणे व काढणे हे करायला द्या.
४. जेवणासाठी ताट वाटी घेणे. पोळी, पापड असे पदार्थ वाढायला सांगा.
५. रुमालासारख्या छोट्या आकाराच्या कपड्यांच्या घड्या घालायला द्या.
६. घडी घातलेले कपडे एकावर एक असे कपाटात नेटकेपणाने ठेवायला सांगा.
७. आपल्या दप्तरात डबा, पाण्याची बाटली ठेवायला, दप्तर बंद करायला सांगा ( दप्तराची चेन लावणे..).
८. तुमच्या मदतीने पांघरुणाची घडी घालू द्या.
९. मुलांना त्यांचे दात घासू द्या. ते स्वच्छ कसे घसायचे हे नेमकेपणाने शिकवा.
१०. त्यांना आपापले कपडे घालायला व काढायला द्या. (टी- शर्ट काढताना मुलांना मदत लागते)
११. शर्टची पुढची बटणे लावायला द्या.
१२. पायमोजे , सँडेल, शूज आपापले घालायला सांगा.
१३. कंगव्याने केस विंचरायल द्या. (केसांचा भांग पाडणे, केस बांधणे इ.. नेटकेपणाने करणे जमेलच असे नाही)
१४. घरात एकत्र बसून गप्पा मारत पालेभाज्या, मटार यांसारख्या भाज्या निवडा.
१५. फ्रिजमधून भाजी काढणे, ठेवणे यासाठी त्यांची मदत घ्या.
१६. तुम्ही सोबत असताना, तुमच्या मदतीने कुलूप, लॅच लावायला व काढायला द्या.
१७. मुलांना दाराची कडी, लॅच काढायला व लावायला आवर्जून शिकवा.
१८. खेळणी, स्कूल बॅग,चप्पल,बूट अशा आपापल्या वस्तू जागेवर ठेवायला सांगा.
मला कल्पना आहे की या यादीत अजून अनेक गोष्टी येऊ शकतात. पण किमान या गोष्टी तरी मुलांना नक्की करू द्या. हे सारे करण्यासाठी, पालकांकडे किती वेळ आहे, मुलांना किती वेळ देण्याची त्याची तयारी आहे हा वेगळाच मुद्दा आहे म्हणा ! तरी पण मुलांना ही सारी कामे करू देण्यासाठी पालकांमध्ये शिस्तीच्या बरोबरीने संयम म्हणजेच पेशन्स असण्याची जास्त गरज आहे असे मला वाटते. तर मग घाई न करता मुलांना विविध अनुभव घेण्याची संधी देणार ना?
(लेखिका मानसशास्त्रज्ञ व शैक्षणिक सल्लागार आहेत.)