Join us  

एकट्या बाबानं मूल सांभाळणं सोपं नसतं!- तुषार कपूर सांगतोय एकल बाबाच्या पालकत्वाचा आनंदही-आव्हानही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2022 6:13 PM

सिंगल पॅरेंटींग वाटतं तितकं सोपं नाहीच, पण दुसरीकडे आनंददायीही असल्याचं तुषार कपूरचं मत

ठळक मुद्दे ६ वर्षात मुलाच्या येण्याने आपल्या आयुष्यात झालेल्या बदलांची तुषार आवर्जून नोंद करतो. एकट्याने मुलाला वाढवणं हे खूप आनंद देणारं नक्कीच आहे पण काही पातळ्यांवर तितकंच आव्हानात्मकही आहे

सिंगल पॅरेंट ही संकल्पना आता काही प्रमाणात रुजली असली तरी सिंगल पॅरेंट ही आई असू शकते पण बाबा हे सिंगल पॅरेंट कसे होऊ शकतात असा प्रश्न आपल्याला आजही पडतो. मात्र तुषार कपूरसारखे काही पुरुष सिंगल पॅरेंटची भूमिका अतिशय उत्तमरितीने सांभाळत असल्याचे दिसते. हे काम काहीसे आव्हानात्मक असून तुम्हाला स्वत:च्या अनेक गोष्टींना मुरड घालावी लागत असल्याचे तुषार म्हणतो. ही जबाबदारी दिसते तेवढी सोपी नक्कीच नसते. तर तुम्हाला दिवसभरातील असंख्य गोष्टी मॅनेज करत मुलांना सांभाळावे लागते हे सांगताना तुषाल लक्ष्य या आपल्या मुलासोबतचे आपले शेड्यूल कसे असते हेही सांगतो. 

(Image : Google)

तुषारने सिंगल पॅरेंटींगविषयीचे एक पुस्तकही लिहीले असून त्याचे नाव बॅचलर डॅड असे आहे. यामध्ये तुषारने आपले पॅरेंटींगविषयीचे अनुभव शेअर केले आहेत. तुम्ही वडिल म्हणून मुलांची जबाबदारी घेता तेव्हा तुम्हाला केवळ धाक लावणारे किंवा लाड करणारे वडील होऊन चालत नाही तर तुम्हाला प्रसंगी माया करणाऱ्या आईची भूमिकाही पार पाडावी लागते. इतकंच नाही तर सिंगल पॅरेंट म्हणून तुम्हाला आर्थिक गणितंही अतिशय योग्य पद्धतीने सांभाळावी लागतात. कारण तुम्ही एकटेच कमावणारे असल्याने मुलाची काळजी घेणे आणि नोकरी करणे अशी तारेवरची कसरत होऊ शकते. पुरुष एकटे राहतात म्हणजे ते बेशिस्तपणे राहण्याची शक्यताच जास्त असते. पण तुमच्यासोबत जेव्हा एक मूल वाढत असते तेव्हा त्याला शिस्त लागण्यासाठी तुम्ही शिस्तीने वागायला हवे. लहान वयात मुलांना शिस्त लावली तरच ते मोठेपणी चांगले वागू शकतील असेही तुषार सांगतो. 

(Image : Google)

लक्ष्य सकाळी ९ वाजता शाळेत जातो, तर तुषार त्याला शाळेत सोडून ९ वाजता जिमला जातो आणि ११ वाजता त्याला घेऊनच घरी येतो. त्यानंतरही त्याच्या शेड्यूलनुसार आपण आपली कामं अॅडजस्ट करत असल्याचं तुषार म्हणतो. एकट्याने मुलाला वाढवणं हे खूप आनंद देणारं नक्कीच आहे पण काही पातळ्यांवर तितकंच आव्हानात्मकही आहे असं तुषारचं म्हणणं आहे. टाईम मॅनेजमेंट, शिस्त, प्रेम अशा सगळ्या गोष्टी मुलाला देण्यासाठी तुमच्या मनाची आणि एकूणच तयारी लागते असंही तुषार सांगतो. गेल्या ६ वर्षात मुलाच्या येण्याने आपल्या आयुष्यात झालेल्या बदलांची तुषार आवर्जून नोंद करतो. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं